Home /News /lifestyle /

जगातल्या 99 टक्के नागरिकांना घ्यावा लागतो दूषित हवेत श्वास; WHO ने सादर केला रिपोर्ट

जगातल्या 99 टक्के नागरिकांना घ्यावा लागतो दूषित हवेत श्वास; WHO ने सादर केला रिपोर्ट

WHO report on Air Pollution : या रिपोर्टनुसार, जगभरात सर्वांत मोठी समस्या सूक्ष्म कण (PM Particles) आणि नायट्रोजन डाय ऑक्साइड (Nitrogen Dioxide) ही आहे. यांच्यामुळे अस्थमासारखे श्वसनाशी निगडित अनेक आजार वाढले आहेत.

    नवी दिल्ली, 6 एप्रिल : टेक्नॉलॉजीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा मानवाला फायदा होतोच आहे; मात्र यादरम्यान नैसर्गिक संपत्तीच्या (Natural Resources) होणाऱ्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष होत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीने समृद्ध असलेल्या गाड्या घेण्याकडे आता सर्वांचाच कल वाढला आहे; मात्र गाड्यांचं हे वाढतं प्रमाण काही अंशी वायू प्रदूषणाला (Air Pollution) कारणीभूत ठरत आहे. वायू प्रदूषणाची आणखीही अनेक कारणं आहेत. या वाढत्या प्रदूषणामुळे सध्या जगातल्या 99 टक्के नागरिकांना शुद्ध हवेत श्वास घेता येत नाही आणि यामध्ये मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंगळवारी (5 एप्रिल 2022) एका रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. या रिपोर्टनुसार, जगभरात सर्वांत मोठी समस्या सूक्ष्म कण (PM Particles) आणि नायट्रोजन डाय ऑक्साइड (Nitrogen Dioxide) ही आहे. यांच्यामुळे अस्थमासारखे श्वसनाशी निगडित अनेक आजार वाढले आहेत. 117 देशांतल्या 6 हजारांपेक्षा जास्त शहरांतल्या हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली गेली. त्यानंतर आलेल्या निष्कर्षांवरून असं प्रतिपादन केलं गेलं, की पुढच्या काही काळातही वायुप्रदूषण असंच होत राहिल्यास मानवाला कायमस्वरूपी मास्क वापरावे लागतील. याबाबतचं सविस्तर वृत्त 'TV 9 हिंदी'ने प्रकाशित केलं आहे. मुंबईत आढळलेल्या भारतातील पहिल्या XE Variant Patient काय आहे अवस्था? WHO ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार हवा प्रदूषित होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यामध्ये वाहनं, इंडस्ट्रीज आणि पॉवर प्लान्टमध्ये इंधन जाळल्यामुळे निघणारा धूर हेदेखील एक कारण आहे. या धुरामुळे हवेत नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी वाढली आहे. यामुळे नागरिकांना श्वासोच्छ्वासाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागत आहे. या आजारांमुळे नागरिकांना अवेळी मृत्यूला सामोरं जावं लागत आहे. नायट्रोजन डाय ऑक्साइडची पातळी नियंत्रणात आणून ही समस्या टाळता येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या डायरेक्टर डॉ. मारिया नीरा यांच्या मते, साथीच्या रोगाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर प्रदूषणाचं संकटदेखील लक्षात घेण्याची गरज आहे. हवेच्या प्रदूषणामुळे गेल्या वर्षी 70 लाख नागरिकांचा मृत्यू झाला. हे असे मृत्यू होते, जे थांबवले जाऊ शकले असते. त्यामुळे आम्ही असं सांगत आहोत, की हवेचं प्रदूषण ही समस्या असेल तर त्याच्यावर उपायदेखील आहेत. काही गोष्टींची काळजी घेतल्यास हवा प्रदूषणाला आळा घातला जाऊ शकतो. दळणवळण व्यवस्था व्यवस्थित केली, पायी जाण्यास प्रोत्साहन दिलं आणि सायकलचा वापर वाढवला तर हवेतली प्रदूषणाची पातळी कमी केली जाऊ शकते. यामुळे हवा तर शुद्ध होईलच, शिवाय माणसांचं शरीरही सक्रिय राहील आणि त्यामुळे आजारांचा धोकादेखील कमी होईल. डॉ. मारिया म्हणाल्या, की प्रदूषित हवेचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होतो आणि यामुळे त्यांच्या कामावरदेखील परिणाम होतो. परिणामी संस्थांचंदेखील यामुळे आर्थिक नुकसान होतं. त्यामुळे वायुप्रदूषण नियंत्रित करणं आवश्यक आहे. भारतातदेखील वायुप्रदूषणाचा स्तर कमी नाही. देशात PM10 ची पातळी खूप जास्त आहे. चीनमधल्या PM2.5ने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. WHO च्या रिपोर्टनुसार, वायुप्रदूषणाचा परिणाम माणसांच्या आरोग्यासोबतच आर्थिक प्रगतीवरदेखील होत आहे. त्यामुळे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी लवकरात लवकर मोठं पाऊल उचलण्याची गरज आहे.
    First published:

    Tags: Air pollution

    पुढील बातम्या