नवी दिल्ली 14 डिसेंबर : अर्धा डिसेंबर महिना उलटून गेला आहे. आणखी 15 दिवसांनी नवीन वर्षाला म्हणजे 2022ला सुरुवात होईल. कोविड महामारीच्या समस्येमुळं सरतं वर्ष काही प्रमाणात तणावात आणि ओढाताणीतच गेलं आहे. अद्यापही कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. मात्र, लसीकरणामुळं आणि संसर्गाच्या मंदावलेल्या वेगामुळं काहीसा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळं अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवीन वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी सर्वजण तयारी करत आहेत. प्रत्येकजण ख्रिसमस (Christmas) आणि न्यू ईयर इव्ह (New Year's Eve) अविस्मरणीय कशी करता येईल, यादृष्टीनं काहीना काही नियोजन करण्यात व्यस्त आहे.
काही जणांना एखाद्या नयनरम्य ठिकाणी जाऊन नवीन वर्षाची सुरुवात करायला आवडतं. यासाठी आपल्या देशाच्या आसपास काही उत्तम ठिकाणं आहेत. ज्याठिकाणी जाऊन माफक बजेटमध्ये तुम्ही नवीन वर्षाची पाहिजे तशी सुरुवात करू शकता. ‘हरजिंदगी’ वेबसाइटनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मॉरिशस
मॉरिशस (Mauritius) हा सुंदर तलाव आणि धबधब्यांच्या सौंदर्यानं परिपूर्ण असलेला देश आहे. हे एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आयुष्यात एकदातरी नक्की गेलं पाहिजे. या देशामध्ये अनेक हिरवीगार जंगलं आणि ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मॉरिशसमध्ये बेल्ले मेयर प्लेज बीच, चामरेल, ब्लॅक रिव्हर गॉर्जेस नॅशनल पार्क आणि ग्रँड बेसिन सारखी प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. येथे जाण्यासाठी अंदाजे 35 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंतचा माफक खर्च येतो. त्यामुळं भारतीयांच्या सर्वात आवडत्या ठिकाणांमध्ये या देशाचा समावेश होतो. यावर्षी जर तुम्हाला परदेशात जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याची इच्छा असेल तर मॉरिशसचा हा चांगला पर्याय ठरू शकतो.
श्रीलंका
भारताच्या दक्षिणेला असलेलं पाचूप्रमाणं हिरवगार बेट, अशी श्रीलंकेची आपल्याला ओळख आहे. अगदी पौराणिक काळापासून श्रीलंका आणि भारताचे संबंध आहेत. श्रीलंका (Sri Lanka) हा फिरायला जाण्यासाठी सर्वात जास्त पॉकेट फ्रेंडली (Pocket friendly) ऑप्शन आहे. लंकन राजधानी कोलंबोमध्ये अतिशय सुंदररित्या न्यू ईयर इव्ह साजरी केली जाते. याशिवाय तुम्ही एला, नुवारा इलिया, पिन्नावला एलिफंट अनाथाश्रम, पोलोनारुवा आणि दांबुला केव्ह यासारख्या ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणांचाही आनंद घेऊ शकता. एका श्रीलंका ट्रिपसाठी (Sri Lanka Trip) तुम्हाला साधारण 18 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. एका परदेशवारीचा विचार केल्यास हा खर्च अतिशय नगण्य आहे.
नेपाळ
आपला अतिशय जवळचा शेजारी असलेला नेपाळ (Nepal) हा देश स्वस्त इंटरनॅशनल ट्रिपसाठी चांगला ऑप्शन आहे. तुम्ही रस्त्यांचा आणि हवाईमार्गाचा वापर करून नेपाळला जाऊ शकता. भारताच्या सीमांना अगदी लागून असल्यामुळं न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी (New Year celebration) 4 ते 5 पाच दिवसांची नेपाळ ट्रिप आरामात प्लॅन करता येऊ शकते. नेपाळमधील काठमांडू शहर, चितवन नॅशनल पार्क आणि पोखरा सरोवरासारखी अनेक ठिकाणं पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्र आहेत. तुम्हीदेखील त्या ठिकाणी जाऊन मौजमजा करू शकता. नेपाळला जाण्यासाठी साधारण 20 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो.
भूतान
भारताच्या शेजारी आणि हिमालयाच्या कुशीत वसलेला सुंदर देश म्हणजे भूतान (Bhutan). याठिकाणी असलेलं निसर्ग सौंदर्य कुणाच्याही मनाला सहजपणे भूरळ घालतं. हिवाळा असो किंवा उन्हाळा कोणत्याही ऋतूमध्ये येथील निसर्ग सौंदर्य कमी होत नाही. त्यामुळं मनसोक्त आनंद लुटून नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भूतान हा चांगला पर्याय आहे. येथे येऊन अतिशय जवळून बौद्ध संस्कृतीबद्दल (Buddhist culture) जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळेल. भूतानमधील बुद्ध पुतळा, टायगर नेस्ट मठ, राजधानीचं शहर थिम्फु, पुनाखा जोंग आणि डोचुला पास ही ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र आहेत. 25 हजार ते 35 हजार रुपये खर्च करून तुम्ही भूतानवारी करू शकता.
वरील सर्व देश भारतापासून जवळ आहेत. त्यामुळं त्याठिकाणी जाण्यासाठी वेळ आणि खर्च दोन्हीही कमी लागतो. जर तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यास इच्छुक असाल तर या पॉकेट फ्रेंडली ट्रीप (Pocket friendly trip) ऑप्शन्सचा विचार करण्यास हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Celebration, New year