नवी दिल्ली 29 जानेवारी : सध्याच्या 'हार्ड अँड फास्ट' युगामध्ये टेक्नॉलॉजीच्या
(Technology) वापराशिवाय आयुष्य जगणं जवळपास अशक्यच आहे. विविध गॅझेट्सशिवाय
(Gadgets) आपण एक दिवसही राहू शकत नाहीत. अशाच गॅझेट्मध्ये मोबाईल
(Mobile Phone) फोनचा समावेश होतो. डिजिटल व्यवहाराचं वाढतं प्रस्थ आणि सोशल मीडिया वापर यामुळे आपल्यापैकी अनेकजण दिवसातील कितीतरी वेळ मोबाईल पाहण्यात घालवत असतील. काहीजण तर अगदी रात्री झोपेपर्यंत मोबाईल पाहण्याचं सोडत नाहीत. रात्री-अपरात्रीपर्यंत मोबाईल वापरण्याची
(Mobile Use) ही सवय विशेषत: तरुणांमध्ये जास्त असल्याचं निदर्शनास येतं. मात्र, ही सवय आरोग्याच्या दृष्टीनं घातक ठरू शकते.
रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्यानं शरीरावर वाईट परिणाम होतात. आपल्या डोळ्यांसोबतच मानसिक आरोग्यासाठीदेखील
(Mental Health) ही सवय हानिकारक आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्यानं निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्यानं शरीरातील मेलाटोनिन हॉर्मोनची (Melatonin hormone) लेव्हल कमी होते. यामुळं व्यक्तीच्या झोपेवर
(Sleep) परिणाम होतो. रात्री मोबाईल वापरण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर निद्रानाशाची दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकते. रात्री फोन वापरण्याच्या याच सवयीमुळे ब्रेन
(Brain) हेल्थवरसुद्धा परिणाम होतो. दीर्घकाळासाठी रात्री फोन वापरल्यानं आपली मेमरी (Memory) कमकुवत होण्याची शक्यता असते. याशिवाय मेंदूशी संबंधित इतर समस्याही जाणवू शकतात.
जास्त वेळ मोबाईल वापरण्याचा सर्वांत जास्त परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत फोन पाहिल्यास डोळ्यांच्या विविध समस्या जाणवू शकतात. सतत मोबाईलमध्ये पाहिल्यास रेटिनावर (Retina) ताण येतो आणि दृष्टी कमकुवत होते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल चालवल्यानं काचबिंदूचाही (Glaucoma) धोका वाढतो. मोबाईल वापरामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम होतो. जर रात्री पुरेशी झोप घेण्याऐवजी तुम्ही मोबाईल वापरत बसलात तर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स (Dark circles) तयार होऊ शकतात. याशिवाय चेहऱ्याची त्वचादेखील ओढल्यासारखी दिसेल.
आपल्या शरीरासोबतच मानसिक आरोग्यावरही रात्र-अपरात्री मोबाईल फोन वापरण्याचा परिणाम होतो. रात्री सतत मोबाईल वापरल्यानं थकवा आणि ताण वाढतो. मेलाटोनिन हार्मोनची लेव्हल कमी झाल्यानं स्ट्रेस लेव्हल (Stress level) वाढते. याचा परिणाम एकूण शरीरीक संतुलनावरती होतो.
बदलत्या काळानुसार मोबाईलचा वापर गरजेचा आहे. मात्र, दिवसभरात किती वेळ फोन वापरायचा यावर आपण मर्यादा ठेवली पाहिजे. नाहीतर आपल्या शरीराला मोबाईलच्या अतिरिक्त वापराचे भयंकर परिणाम सहन करावे लागू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.