रोम, 16 जुलै : गरोदर महिलांना (pregnant woman) कोरोना (coronavirus) झाल्यास त्यामुळे गर्भातील बाळाला (baby in womb) कोरोनाचा धोका आहे का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.अशात आता नुकतंच फ्रान्समध्ये एका कोरोनाग्रस्त महिलेपासून तिच्या बाळाला गर्भातच कोरोनाची लागण झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
फ्रान्सच्या (france) एका रुग्णालयात एका बाळाचा जन्म झाला. या बाळाच्या आईला कोरोनाची लागण झाली होती मात्र तिच्यामध्ये लक्षणं नव्हती. बाळालादेखील कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. जन्मानंतर 24 तासांनी बाळामध्ये लक्षणं दिसायला सुरुवात झाली. त्याच्या मेंदूला सूज आली होती आणि प्रौढ व्यक्तींमध्ये कोरोनाची मेंदूसंबंधी जी लक्षणं दिसत आहेत ती लक्षणं त्याच्यामध्ये दिसत होती.
पॅरिसजवळील अँटोइन बिक्लेरे हॉस्पिटलचे डॉक्टर आणि या संशोधनाचे अभ्यासक डॅनिअल दि लुका म्हणाले, "कोरोनाग्रस्त आईपासून तिच्या गर्भातील बाळाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असल्याचं आतापर्यंत सांगितलं जात होतं. मात्र या प्रकरणावरून आता पुरावे मिळाले आहेत"
मात्र या बाळावर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याच्यातील लक्षणं हळूहळू कमी झाली. तीन आठवड्यात बाळं आपोआप पूर्णपणे बरं झालं आणि लक्षणं नसलेली त्याची आई तीन महिन्यांनी बरी झाली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
हे वाचा - 3 बहिणी एकत्र झाल्या आई आणि मावशी; एकाच रुग्णालयात एकाच दिवशी झाली डिलीव्हरी
मार्चमध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या 20 गरोदर महिलांचा संशोधकांनी अभ्यास केला. त्यावेळी प्लेसेंटामध्ये SARS-CoV-2 चं प्रमाण जास्त असल्याचं संशोधकांना दिसून आलं.
प्रेग्नन्सीच्या शेवटच्या आठवड्यात गरोदर महिलेच्या बाळाला प्लेसेंटाच्या माध्यमातून कोरोनाव्हायरसचं संक्रमण होऊ शकतं. प्लेसेंटामधून नाळेच्या माध्यमातून बाळापर्यंत हा व्हायरस पोहोचतो. याच मार्गाने बाळाला कोरोनाची लागण होते, असं डॉ.लुका म्हणाले.
त्यामुळे आईचं रक्त, अॅमनिओटिक फ्ल्युइड, बाळाचं रक्त आणि प्लेसेंटा इत्यादीची तपासणी करणं गरजेचं आहे, मात्र कोरोनाच्या आपात्कालीन परिस्थिती हे सर्व नमुने मिळणं सोपं नाही. त्यामुळेच ते सिद्ध करता येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
हे वाचा - अरे बापरे! फक्त एका लिफ्टमुळे एकट्या महिलेनं नकळत 71 जणांना केलं कोरोना संक्रमित
गेल्या आठवड्यात इटलीतील संशोधकांनी कोरोनाग्रस्त 31% गरोदर महिलांच्या अभ्यास केल्यानंतर गर्भातील बाळाला कोरोनाग्रस्त महिलेकडून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली होती. तर मार्चमध्ये जामा जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टमध्येदेखील असाच निष्कर्ष काढण्यात आला होता.
"आईपासून गर्भातील बाळाला कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र जगाच्या लोकसंख्येचा विचार करता हे खूपच दुर्मिळ आहे. कोरोनाची लागण झालेल्या हजारो महिलांच्या पोटी जन्माला आलेल्या बाळांपैकी फक्त एक किंवा दोन बाळांनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणंही कमी आहेत", असं युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या मॅटरनल अँड चाइल्ड पॉप्युलेशन हेल्थच्या प्राध्यापिका मरियन नाइट म्हणाल्या.
गरोदर महिलांनी आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी हेच खूप महत्त्वाचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.