नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : कोरोना महामारीनंतर (Corona Pandemic) लोकांचा आयुर्वेदावरील (Ayurveda) विश्वास मजबूत झाला आहे. कोरोनामुळं रोगांशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) चांगली असणं खूप महत्त्वाचं असल्याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. यामुळंच कोरोनादरम्यान आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि निसर्गोपचारांअंतर्गत आयुष मंत्रालयाकडून (Ministry of Ayush) मार्गदर्शक तत्त्वं समोर येत आहेत. त्याचबरोबर, आजारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आयुषद्वारे विशेष खाद्य पाककृती (Ayush Food Recipe) सुरू करण्यात आल्या आहेत.
आयुष मंत्रालयानं आयुष फूड रेसिपी अलीकडेच सुरू केली आहे. या पाककृती बनवण्याची पद्धत देखील या पुस्तिकेत सांगितली आहे, जेणेकरून लोक या पाककृती त्यांच्या घरी बनवू शकतील. या पाककृतींचा आहारात समावेश केल्यानं रोगप्रतिकारशक्ती चांगली होईल आणि रोगांना प्रतिबंध होईल, असं मंत्रालयानं म्हटलंय. आयुर्वेदाच्या निकषांनुसार फळं, भाज्या किंवा मसाले पारंपरिक खाद्यपदार्थांच्या पाककृतींमध्ये वापरले गेलेत.
हे वाचा - T20 World Cup नंतर कॅप्टन कोहलीच नाही तर टीम इंडियाचे खेळाडूही बदलणार; यांना मिळणार संधी!
आयुषनं एकूण 26 प्रकारच्या फूड रेसिपीज लॉन्च केल्या आहेत. यामध्ये अमलकी पनाका, आवळा स्क्वॅश, गुलकंद, बीटरूट हलवा, बेसन-रवा पॅनकेक, तीळ चटणी, रागी आणि केळी स्मूदी, पेया, आलेपाक, मधुका लेहा, रसाला, युषा, खलम, कुळीथ, रसम, टाकरा, नायजर सीड्स लाडू, आप्पम यांचा समावेश आहे. पाककृतींमध्ये खजूर लाडू, भोपळा आणि बिग बीन्स स्वीट पॅनकेक, गुसबेरी स्टिर फ्राय, मम्सा रसम, लाजरड्राका आदींचा समावेश आहे.
लोकांना या पदार्थांच्या पारंपारिक खाद्यपदार्थांची माहिती मिळावी, म्हणून या पाककृती सुरू करण्यात आल्या आहेत, असं आयुषतर्फे सांगण्यात आलंय. याचा वापर केल्यामुळं रोग बरे होण्यास तसंच रोग होण्यापूर्वीच त्यांना प्रतिबंध करण्यास उपयुक्त घटक शरीराला मिळण्यास मदत होईल, असं आयुष मंत्रालयानं म्हटलंय. या पाककृतींची एक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. सर्व राज्य सरकारांना अशा प्रकारच्या पारंपरिक पाककृतींना प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आलंय.
हे वाचा - अयोध्येतील राम मंदिर आणि नव्या संसद भवनासाठी होणार या खास मौल्यवान दगडांचा वापर…पाहा PHOTOS
कोविड महामारी पसरल्यापासून आयुषतर्फे सतत लोकांना ‘आयुष फूड’ खाण्यासाठी आवाहन केलं जातंय. यात अनेक प्रकारच्या पारंपारिक खाद्यपदार्थांचा समावेश आहे. मात्र, लोकांनी कोणताही पदार्थ, मसाला किंवा कोणताही पदार्थ आयुर्वेदिक औषध मानून वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरू नये, असा स्पष्ट इशारा देखील आयुषकडून देण्यात आला आहे. कारण, त्याचे काही तोटेही असू शकतात. आयुर्वेदानुसार, प्रमाणाचं संतुलन अत्यंत महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Health