बीजिंग, 25 फेब्रुवारी : कोविड-19 चा उगम खरंच कुठे झाला? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. सर्वात आधी चीनमध्ये (China) कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) उद्रेक झाला, त्यानंतर इतर देशांमध्येही या व्हायरसची प्रकरण दिसून आली. त्यामुळे चीनलाच यासाठी जबाबदार धरलं जातं आहे. चीनची वुहान लॅब किंवा मीट मार्केटमधून हा व्हायरस पसरल्याचं सांगितलं जातं आहे. याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम चीनमध्ये पोहोचली. पण WHO ने चीनचीच पाठराखण केली. या दोन्ही ठिकाणाहून कोरोनाव्हायरस पसरला नसावा, असं या टीमनं सांगितलं.
चीनमधलं मच्छिमार्केट आणि वुहान प्रयोगशाळा (Wuhan Lab) या ठिकाणांमधूनच कोरोनाचा पहिला प्रसार झाल्याच्या 'थिअरीज' सध्या अस्तित्वात आहेत. अगदी गेल्या आठवड्यातही एका जर्मन शास्त्रज्ञाने 105 पानांचा अहवाल प्रसिद्ध करून त्यात कोरोना विषाणू वुहानमधल्या प्रयोगशाळेतून कसा बाहेर सोडला गेला असू शकतो, याची कारणं दिली आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या शोधकार्य करणाऱ्या टीममध्ये असलेले ऑस्ट्रेलियन डॉक्टर डॉमिनिक ड्वायर यांना मात्र तसं वाटत नाही. 'दी कॉन्व्हर्सेशन'मध्ये त्यांनी स्वतः लिहिलेल्या लेखात कोरोनाच्या उगमाच्या या दोन्ही शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
डॉमिनिक ड्वायर यांनी त्या मच्छिमार्केटला भेट दिल्यानंतरची स्वतःची निरीक्षणं नोंदवली आहेत. ते म्हणतात की, 'आम्ही त्या बंद मार्केटला भेट दिली. तिथून संसर्गाचा प्रसार नक्कीच झालेला असू शकतो. कारण जेव्हा ते मार्केट सुरू होतं, तेव्हा दिवसाला 10 हजार लोक तिथे येत असावेत. तिथून कोरोनाचा प्रसार (Transmission Cluster) नक्कीच झालेला असू शकतो; मात्र उगमस्थान तिथं असण्याची शक्यता कमी आहे.'
'तसंच त्या मार्केटमधून सापडलेल्या रुग्णांच्या शरीरातील विषाणूचे जेनेटिक सिक्वेन्सेस (Genetic Sequences) एकसारखे होते. त्यामुळे तिथून प्रसार झाला असावा, या शक्यतेला पुष्टी मिळते. मात्र काही नमुन्यांच्या सिक्वेन्सेसमध्ये फरकही होता त्यामुळे दुसरीकडूनही काही विषाणू आल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे वुहानमधलं मार्केट हे कोरोनाचा प्रसार करणारं केंद्र आहे. मात्र तिथूनच विषाणूचा उगम झालेला असेल, असं सांगता येत नाही,' असं ते म्हणाले.
हे वाचा - कालच्या विक्रमी रुग्णसंख्येनंतर आज काय आहे महाराष्ट्रातली कोरोना स्थिती?
कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून 'लीक' झाला असण्याची शक्यताही फारच धूसर असल्याचं त्यांनी सांगितलं. 'आम्ही वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (Wuhan Institute of Virology) या संस्थेला भेट दिली. ती एक चांगली संशोधन संस्था आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन काम करणारी आणि जबाबदारीने चालवली जाणारी संस्था वाटली. तिथल्या शास्त्रज्ञांशीही आम्ही बोललो. तिथल्या शास्त्रज्ञांच्या रक्ताचे नमुने वेळोवेळी घेतले जातात आणि त्यांना लागण झाली आहे का ते तपासलं जातं. त्यांच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीजही सापडल्या नाहीत. त्यांची बायोसिक्युरिटी ऑडिट्सही आम्ही तपासली. तसा काहीही पुरावा आढळला नाही,' असं ते म्हणाले.
'RaTG13 हा विषाणू SARS-CoV-2 या विषाणूला सर्वांत जवळचा आहे. तो विषाणू दक्षिण चीनमधल्या गुहांमध्ये सापडला होता. या विषाणूमुळे सात वर्षांपूर्वी काही मुलांचा मृत्यू झाला होता. त्यावर या शास्त्रज्ञांचं काम सुरू आहे. त्याचीही आम्ही पाहणी केली. त्यांनी त्या विषाणूचं कल्चर वाढवलेलं नाही. प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर नक्कीच जाऊ शकतो, मात्र तसं होणं दुर्मिळ आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता वुहानमध्येही तसं घडलेलं असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच,' असं डॉ. डॉमिनिक यांनी लिहिलं आहे.
हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचं नवं रूप; नव्या स्ट्रेनपासून कसा कराल स्वत:चा बचाव?
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनमधून पळालेल्या एका चिनी महिला विषाणू शास्त्रज्ञाने एका दावा केला की, कोविड विषाणू मानवनिर्मित असून तो वुहानच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. 'मी देश सोडण्याआधीच चिनी अधिकाऱ्यांनी आपलं श्रेय काढून घेण्याची सुरुवात केली. तसंच माझी सगळी माहिती त्यांनी डिलीट केली आणि माझ्याविषयी अफवा पसरवायला त्यांनी लोकांना सांगितलं,' असा दावाही त्या शास्त्रज्ञाने केला होता.
ऑस्ट्रेलियन बीफसारख्या कोल्ड-चेन प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून कोरोना विषाणूची सुरुवात झाली असावी, असा दावा चीनच्या सरकारने केला असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांनी त्या दाव्याला पाठिंबा दिला आहे.
चीनचं म्हणणं असं आहे की, 2019 मध्ये कोविडचा प्रसार जगभरात अनेक ठिकाणी झाला. मात्र चीनने पहिल्यांदा त्याची नोंद केली आणि त्यावर काम करायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी चीनने बांगलादेश, अमेरिका, भारत, ग्रीस, इटली, झेक प्रजासत्ताक, रशिया आणि सर्बिया इत्यादी देशांवर महासाथ पसरवल्याचा ठपका ठेवल्याचा इतिहास आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona, Coronavirus, Covid19