राशीस्वामी मंगळ असलेल्या मेष राशीच्या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या आणि स्वच्छंदी असतात. मेष राशीचे लोग इतरांसाठी त्रासदायकसुद्धा ठरू शकतात पण त्यांच्या विश्वासूपणावर शंका उपस्थित करता येणार नाही. अग्नि तत्वाची राशी असल्याने या लोकांमध्ये गतिशीलता, दृढ संकल्प आणि उर्जा बघायला मिळते. जाणून घेऊया या राशीतील लोकांसाठी 2020 वर्ष कसे असेल.
2020 मध्ये मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यातही यश मिळेल. 15 मेपर्यंतचा काळ नोकरवर्गातील लोकांसाठी अनुकूल असेल. वर्षात प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळतील. जानेवारी ते मे आणि ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात तुमची आर्थिक परिस्थितीही चांगली राहिल.
वैवाहिक आयुष्यात थोडे चढ-उतार येतील. किरकोळ गोष्टीवरून वादाची शक्यता आहे. अविवाहित लोकांच्या विवाहाचे योग जुळून येतील. विवाहितांसाठी हे वर्ष चांगलं असेल. सहकाऱ्याबद्दल तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. किरकोळ कारणावरून होणारे वाद जर समजून घेऊन सोडवले तर अडचणी दूर होतील.
कौटुंबिक जीवनात या वर्षी मनासारखे घडण्यासाठी थोडे कष्ट पडतील. आई-वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल. घरात मंगल कार्य घडेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ मिळेल.
आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष मेष राशीच्या लोकांना चांगले जाईल. चांगल्या आरोग्यामुले तुम्ही मित्र आणि कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकाल. एखाद्या दीर्घ आजाराचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
उर्वरीत राशींचे राशीभविष्य थोडक्यात
वृषभ : या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष संमिश्र असं जाणार आहे. शनी आडवा आल्याने बरेच चढ-उतार बघालया मिळू शकतात. नव्या वर्षात गुंतवणुकीचा विचार करू शकता. यामुळे आर्थिक लाभाची होण्याची शक्यता आहे. कुटुंबात एकटेपणा जाणवू शकतो. वर्षाअखेरीस तुम्हाला आनंदवार्ता मिळू शकते.
मिथुन : 2020 हे वर्ष आर्थिक दृष्टीने तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. तुमचे अडकलेले पैसे किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता असून तब्येतीची काळजी घेण्याची गरज असेल. आहार-विहाराकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होतील.
कर्क - या राशीच्या लोकांसाठी नवं वर्ष आनंदाचं असणार आहे. या वर्षी तुमचा मान-सन्मान वाढेल. लग्न, नोकरी यांचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. कुटुंबात बेजबाबदारपणामुळे काही गोष्टींमध्ये तंटा होऊ शकतो. वर्षाअखेरीस आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यावं लागेल.
सिंह - नव्या वर्षात या राशीच्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी कानावर पडतील. प्रत्येक कामात यश मिळण्याचा योग आहे. या राशीचे लोक जे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कामांमध्ये कार्यरत असतील त्यांना विशेष यश मिळेल. विवाहाचा योग असून आरोग्यासाठीसुद्धा हे वर्ष चांगलं असेल.
कन्या - या राशीतील लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. वर्ष जसजसे पुढे सरकेल तसे आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होईल. अपत्य नसलेल्यांना अपत्यप्राप्ती होईल. वर्षाच्या सुरुवातीला परदेशगमनाची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराकडून निराशा पदरी पडू शकते. कोर्ट कचेरीच्या कामात थोडं सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
तुळ - आर्थिक दृष्ट्या हे वर्ष तुम्हाला फायद्याचे असणार आहे. या राशीतील लोकांना कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. मनाविरुद्ध कोणताही प्रवास करू नका. या वर्षात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वत:च्या आर्थिक परिस्थिती सुधारेल तसेच आई-वडिलांकडूनही हातभार मिळेल. नव्या उर्जेसह काम केल्यानं आर्थिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक - तुमचे कुटुंबातील सौहार्द वाढेल. तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल. प्रेमसंबंधात हे वर्ष खास असणार आहे. वर्षाच्या अखेरीस थोडा तणाव सहन करावा लागेल. मात्र, आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी खास असणार आहे. अनेक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु - या राशीच्या लोकांसाठी नव्या वर्षात चढ-उतार असतील. वर्षाच्या सुरुवातीला साडेसातीमुळे यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. तर नात्यांमध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. वर्षभर गुरूचा प्रभाव असल्याने आरोग्यावर काही परिणाम होण्याची शक्यता कमी असेल. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
मकर - प्रवासाची आवड असलेल्यांसाठी हे वर्ष अनुकूल असणार आहे. प्रवासावेळी आर्थिक लाबाची शक्यता आहे. या वर्षात तुम्हाला हट्टी स्वभावापासून थोडं दूर राहण्याची गरज आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. भाग्योदय होण्याचा योग असून तुमच्यासाठी हे वर्ष महत्त्वाचं असणार आहे.
कुंभ - काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. ज्या कामातून तुम्हाला अपेक्षा असतील त्या पूर्ण होतील. शनी तुमचा राशी स्वामी असून या वर्षात जसे काम कराल तशी फळे तुम्हाला भोगावी लागतील. त्यामुळं कोणतंही चुकीचं काम करणे टाळा. या वर्षी सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
मीन - नवं वर्ष या राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येणार आहे. कुटुंब, समाज, कार्यक्षेत्रात पद, प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि शुभ कार्य घडेल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष यशदायी असेल. विवाहाचे योगही जुळून येतील.
(वर दिलेली माहिती ही जोतिष्यशास्त्र आणि पंचागानुसार असून राशीभविष्यात करण्यात आलेल्या दाव्याशी News18Lokmat सहमत असेलच असं नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.