मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोना काळात मुक्या जीवांची भयंकर अवस्था; धक्कादायक माहिती समोर

कोरोना काळात मुक्या जीवांची भयंकर अवस्था; धक्कादायक माहिती समोर

कोरोना परिस्थितीचा माणसं आणि त्यांच्यामार्फत जनावरांना भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे.

कोरोना परिस्थितीचा माणसं आणि त्यांच्यामार्फत जनावरांना भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे.

कोरोना परिस्थितीचा माणसं आणि त्यांच्यामार्फत जनावरांना भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे.

  मुंबई, 08 एप्रिल : कोरोना लॉकडाऊनचा (Corona lockdown) परिणाम फक्त माणसांवर झाला असं नाही तर मुक्या जीवांवरही झाला आहे. लॉकडाऊनमध्ये प्राण्यांना भयंकर परिणामांना सामोरं जावं लागतं आहे आणि ते म्हणजे माणसांकडून होणारा अत्याचार. यंदाच्या (2021) पहिल्या दोन महिन्यांचा विचार करता मुंबईत दररोज 8 प्राण्यांवर अत्याचाराच्या (Cruelty to animals) घटनांची नोंद होत आहे, अशी धक्कादायक माहिती एका स्वयंसेवी संस्थेन दिली आहे. तर पोलिसांकडील नोंदीनुसार एप्रिल 2020 म्हणजेच लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात लोकांनी जनावरांवर अत्याचार केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

  प्राणी मित्र आणि स्वयंसेवी संस्थांच्या मते पाळीव जनावरांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून लॉकडाऊननंतरच्या कालावधीत या घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.

  28 मार्चला पश्चिम गोरेगावमधील नया नगर येथे एका व्यक्तीने भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली नाही. 11 मार्चला डीएन नगर पोलिसांनी एका सीरिअल डॉग रेपिस्टला अटक केली. या व्यक्तीने आठ कुत्रींवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ पोलिसांना सादर केला असता पोलिसांनी ही कारवाई केली. 4 मार्च रोजी चांदिवली येथे पाच वर्षांच्या कुत्र्याला लोकांच्या समुदायाने मारहाण केली. त्यानंतर साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतर कोणाही व्यक्तीला अटक करण्यात आली नाही. विशेष म्हणजे या हिंसक कृत्याचा व्हिडीओ समोर येऊनही कारवाई झाली नाही. 20 आक्टोबर 2020 ला एका नऊ वर्षांच्या मादी कुत्र्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकडी दांडके घालून तिला गंभीर जखमी करण्यात आलं. त्यानंतर पवई येथील हिरानंदानी गार्डनमधील गॅलेरिया मॉलजवळ तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन नंतरच्या कालावधीतील या प्राण्यांवरील अत्याचाराच्या मन विषण्ण करणाऱ्या घटना म्हणता येतील.

  हे वाचा - दिल्लीतल्या डॉक्टरांचं धक्कादायक निरीक्षण; लहान मुलांना लक्ष्य करतोय नवा कोरोना

  हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, याबाबत बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्स आणि बॉम्बे सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रूएल्टीटू अ‍ॅनिमल (BSPCA) या स्वयंसेवी संस्थेचे विजय मोहनानी म्हणाले की, "2018 आणि 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार असं दिसून येतं की 2021 च्या पहिल्या दोन महिन्यात मुंबईत दररोज किमान 8 प्राण्यांवर अत्याचार झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. 2019 मध्ये ही संख्या 3 ते 4 होती. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या कालावधीत 886 प्रकरणांची नोंद झाली असून सप्टेंबर 2020 नंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यात नोंदवलेल्या 480 प्रकरणांपैकी 266 केसेस या अपघात आणि हिट अॅण्ड रनच्या (Hit And Run)आहेत. तर उर्वरित घटना निघृण खून,बलात्कार,प्राणघातक हल्ला आणि छळवणुकीच्या आहेत"

  "लॉकडाऊनपूर्वी हिट अँड रन आणि अपघाताच्या 2 ते 3 तक्रारी दाखल होत होत्या. परंतु लॉकडाऊननंतर दिवसभरात 7 ते 8 केसेसची नोंद होऊ लागली. पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही लोक प्राण्यांना लाथा मारणे, त्यांचा छळ करणे, प्राण्यांवर अॅसिड टाकणं किंवा त्यांच्यावर उकळतं पाणी टाकणे, शारिरीक इजा करणं, चाकू किंवा तत्सम वस्तूंनी हल्ला करणं याला एक खेळ मानतात. बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे आलेल्या नैराश्यातून अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात", असं मोहनानी म्हणाले.

  हे वाचा - प्राण्यांसाठी तयार झालेली जगातील पहिली कोरोना लस आहे तरी कशी?

  याबाबत पिपल फॉर अॅनिमलच्या (PFA) मुंबई विभाग प्रमुख लता परमार म्हणाल्या की, "नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जनावरांवरील हिंसाचाराच्या घटनांचा डेटा ठेवत नसल्याने सरकार आणि पोलिसांना या समस्येचे मोजमाप करताना अडचणी येतात. हा डेटा आमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या अहवालांद्वारे संग्रहित केला जातो. परंतु बरीच प्रकरणं नोंदवली जात नाहीत"

  भाजपच्या खासदार आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या तसंच पीएफएच्या अध्यक्षा मनेका गांधी यांनी अशा घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा आणि दंड करण्याची मागणी केली आहे. प्राण्यांविषयी असलेली असंवेदनशीलता आणि कायद्याचं दुर्लक्ष यामुळे अशा घटना वाढत असल्याचं परमार म्हणाल्या. अनेकांना कायदा माहिती नाही. तसेच प्राण्यांना इजा केल्यास होणाऱ्या शिक्षेची माहिती नसल्याने अनेकजण निर्भयपणे असं कृत्य करतात,असं त्यांनी नमूद केलं.

  हे वाचा - Corona चे भयावह चित्र! महिलेचा मृतदेह नेण्यास नव्हती रुग्णवाहिका, अखेर...

  पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हिंसाचारात बळी पडलेल्या प्राण्यांचा कोणताही स्वतंत्र डेटा उपलब्ध नाही. 2010 ते 2020 या कालावधीत सुमारे 20,000 प्रकरणांची नोंद स्वयंसेवी संस्था आणि प्राणीमित्रांच्या सहकार्याने झाली आहे. परंतु त्यापैकी फार कमी प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (झोन 10) नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, या प्रकरणांमध्ये आम्ही गुन्हा नोंदवून तपास देखील करतो, तसंच गुन्हेगारास अटक केली जाते.

  प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा 1960 नुसार प्राण्यांवरील हिंसाचाराच्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा होते परंतु दंडाची रक्कम केवळ 10 ते 100 रुपये इतकीच असते. "जनावरांसंदर्भातील गुन्हे पोलीस (Police) पेंडीग ठेवताना दिसतात. याचा अर्थ प्राणी हिंसाचाराच्या घटना पोलीस गांभीर्याने घेत नाहीत", असं पशुवैद्यक डॉ.राधा चौधरी यांनी सांगितलं.

  हे वाचा - कोरोना लशीमुळेच रक्ताच्या गुठळ्या होतायेत? EU Drug Regulator ने दिली मोठी माहिती

  मोहानी यांनी सांगितलं, "एखाद्या बचाव करणाऱ्या व्यक्तीला जखमी प्राणी आढळला आणि त्याने बीएमसीच्या हेल्पलाईनवर कॉल केला तर त्यास उत्तर दिलं जात नाही. तर उलट त्या व्यक्तीस जवळच्या एनजीओ किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधण्यास सांगितलं जातं. तसंच बचाव करणाऱ्या व्यक्तीस जखमी प्राणी परळ किंवा अन्य ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी खर्च करावा लागतो. मुंबईत जनावरांसाठी केवळ एकच शासकीय हॉस्पिटल आहे. तिथंही मोफत उपचार होत नाहीत. ज्या व्यक्तीने गुन्ह्याचा अहवाल दिला, त्या व्यक्तीकडून जखमी किंवा अत्याचार झालेल्या प्राण्याच्या उपचाराचं बिल घेतलं जातं. जर हा जखमी प्राणी वाचला तर त्याच्या उपचारांचा खर्च किंवा प्राणी मृत्यूमुखी पडला तर त्याच्या अंत्यसंस्काराचा खर्चही संबंधित बचावकर्त्या व्यक्तीस करावा लागतो. त्यानंतर या व्यक्तीस पोलिसांत तक्रार देण्यासाठी आपला वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो"

  लॉकडाऊनदरम्यान पाळीव प्राण्यांना सोसायटीच्या परिसरात दररोज फिरायला नेता यावं, यासाठी परवानगी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांना निवासी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संघर्ष करावा लागला. प्राण्यांना लॉकडाऊन समजत नाही. त्यांना स्वतःला आराम देण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु अनेक निवासी सोसायट्यांनी या प्राण्यांच्या फिरण्यावर बंदी घातली होती. याविरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रारी केल्याचे मोहनानी म्हणाले.

  First published:
  top videos

   Tags: Corona, Lockdown, Other animal, Pet animal, Wild animal