कोरोनापाठोपाठ आणखी एका गूढ आजाराचा धुमाकूळ, 600 जणांना बाधा

कोरोनापाठोपाठ आणखी एका गूढ आजाराचा धुमाकूळ, 600 जणांना बाधा

Coronavirus च्या पार्श्वभूमीवर हा नवीनच आजार साथीसारखा पसरल्याने आंध्रात खळबळ उडाली आहे. उपराष्ट्रपतींनी याबाबत योग्य ते उपाय करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

एलुरु (आंध्र प्रदेश), 13 डिसेंबर : कोरोनाचा (COVID 19) धोका अजून टळलेला नाही. यावर्षी आलेल्या या जागतिक महामारीमुळे घराबाहेर मोकळा श्वास घेणं सध्या अवघड आहे. कोरोनावरील लस कधी येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरानाशी लढाई सुरू असतानाच आणखी एका गूढ आजारानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

आंध्र प्रदेशमधल्या ( Andhra Pradesh) एलुरु शहरात या आजारानं थैमान घातलं आहे. या आजाराची आजवर 600 जणांना बाधा झाली आहे. चक्कर येऊन बेशुद्ध पडणं, उलट्या होणं, अशक्तपणा अशी याची लक्षणं दिसल्यामुळे या सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.  Coronavirus च्या साथीच्या पार्श्वभूमीवर हा नवीनच आजार साथीसारखा पसरल्यामुळे या भागात भीती निर्माण झाली आहे.

उपराष्ट्रपतींनी घेतली दखल

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी या प्रकरणाची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सविस्तर माहिती दिली आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 8 डिसेंबर रोजी याबाबत उपराष्ट्रपतींशी भेट घेतली होती. या भेटीनंतर आरोग्य मंत्रालयाने तीन जणांचे पथक तपासासाठी एलरुला पाठवले होते.

हा आजार कीटकनाशक किंवा डासांच्या नियंत्रणासाठी फवारण्यात येणाऱ्या औषधाच्या अॅलर्जीने होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कीटकनाशकं म्हणून किंवा डासांच्या नियंत्रणाच्या नावाखाली ऑरगॅनोक्लोरिन (Organochlorines) वापरल्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाला का? या दृष्टीने आंध्र प्रदेशमधील अधिकारी तपास करीत आहेत.

बर्‍याच देशांमध्ये organochlorine वर बंदी आहे. बऱ्याच देशांमध्ये संशोधनाअंती यामुळे कॅन्सर आणि अनेक आजार होत असल्याचे समोर आल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे. काही प्रदूषकं वर्षानुवर्षे वातावरणात राहतात आणि प्राणी आणि मानवी शरीरात चरबी वाढवतात.

कोरोना व्हायरसच्या(COVID 19) पार्श्वभूमीवर हा अज्ञात आजार समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने  त्याचा प्रसार जाणून घेण्यासाठी घरगुती सर्वेक्षण केले. तब्बल 62 गावे व प्रभाग सचिवांनी 57,863 घरांमध्ये आरोग्य सर्वेक्षण केले.  या आजाराचे गांभीर्य ध्यानात घेऊन 56 डॉक्टर, तीन मायक्रोबायोलॉजिस्ट, 66 परिचारिका, 117 एफएनओ आणि 99 एमएनओ ड्युटीवर लावण्यात आले आहेत. मागील 48 तासांत  62 वैद्यकीय शिबिरे घेण्यात आली असून  20 रुग्णवाहिका 445 बेड इलुरुच्या सरकारी रुग्णालयात व इतर चार संस्थांमध्ये उपचारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

दरम्यान गेल्या दोन दिवसांमध्ये या आजारातील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. उपराष्ट्रपतींनी आरोग्य सचिवांना परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ते उपाय करण्याची सूचना केली आहे.

Published by: News18 Desk
First published: December 13, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या