मुजफ्फरनगर, 17 डिसेंबर : आई-वडिलांचं छत्र हरवलेली अनाथ मुलं (orphan child) हे या जगातलं एक भीषण वास्तव. अशाच एका मुलाची हृदय हेलावून टाकणारी कथा उत्तर प्रदेशातून समोर आलीय. सोशल मीडियावर (social media) या मुलाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील (UP) मुजफ्फरनगर इथली ही घटना. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका स्थानिक माणसानं फोटो काढत या निष्पाप मुलाची कथा जगासमोर आणली आहे. या फोटोतला चिमुरडा कडाक्याच्या थंडीत चक्क फुटपाथवर कुत्र्यासोबत झोपलेला दिसतो. हे फोटो सोशल मीडियावरही वेगानं व्हायरल झाले. तेव्हा कुठं ढिसाळ प्रशासनाचे डोळे उघडले आणि त्यांनी पावलं उचलली. संबंधित अधिकाऱ्यांनी या मुलाचा शोध घेतला. त्यांनी त्याला धीर देत बोलतं केल्यावर समोर आली एक हळवी कहाणी.
9 ते 10 वर्षांचा हा मुलगा त्याचं नाव अंकित असल्याचं सांगतो. मुलाच्या सांगण्यानुसार, त्याचे वडील तुरुंगात आहेत आणि आई त्याला सोडून निघून गेलीय. याव्यतिरिक्त तो मुलगा त्याच्या इतर कुटुंबीय किंवा नातेवाईकांबाबत काही सांगू शकत नाही. हा चिमुरडा कचरा वेचून किंवा चहाच्या दुकानावर काम करून आपलं पोट भरतो. रात्री शहरतल्या शिव चौक इथल्या मार्केटमध्ये कुठल्याही दुकानासमोर त्याचा मित्र झालेल्या कुत्र्यासोबत तो झोपून जातो. कुत्राही रात्रभर या मुलावर लक्ष ठेवतो.
अनेक दिवसांपूर्वी काढलेले या मुलाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले तसं एसएसपी अभिषेक यादव यांनी मुलाला शोधण्यासाठी पोलिसांच्या टीमला आदेश दिले. पोलिसांनी मुलाला शोधून काढलं. आता हा मुलगा महिला आणि बालकल्याण समितीच्या देखरेखीत असून जिल्हा प्रशासनाने त्याला चांगलं शिक्षण मिळण्याचं नियोजनही केलं आहे.
Published by:News18 Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.