नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : वाघाची (Tiger) मावशी कोणाला म्हणतात, हे सर्वांनाच माहिती आहे. मांजराला (Cat) वाघाची मावशी म्हटलं जातं. यामागे कोणतंही वैज्ञानिक कारण नाही; मात्र काही जुन्या काल्पनिक कथांमुळे मांजराला वाघाची मावशी असं म्हणणं प्रचलित झालं. वाघ आपल्या नवजात पिल्लाला मांजरीकडे कौशल्य शिकण्यासाठी पाठवतो, असं या कथेत म्हटलं आहे. मांजर वाघाच्या पिल्लाला झाडावर चढण्याव्यतिरिक्त सर्व कौशल्य शिकवते आणि यामुळे ते वाघापासून आपला बचाव करू शकतं. त्यामुळे मांजराला चलाख मावशी असंही संबोधलं जातं; मात्र वाघाप्रमाणेच सापालाही (Snake) मावशी असते, हे तुम्हाला माहीत आहे का?
होय, हे खरंय. सापालाही मावशी असते. सापासारखा दिसणारा एक जीव सापसुरळी (Skink) म्हणून ओळखला जातो. इंग्रजीत या जिवाला स्किंक या नावाने ओळखलं जातं. हा जीव सरिसृप वर्गातलाच (Reptile) आहे. जसं मांजराला वाघाची मावशी समजण्यामागं कोणतंही वैज्ञानिक कारण नाही; तसंच सापसुरळीला सापाची मावशी समजण्यामागे कोणताही वैज्ञानिक पैलू नाही. सापसुरळी दिसायला सापासारखी असल्यानं तिला सापाची मावशी म्हणतात.
भारीच! फक्त कोबी, ब्रोकोली काढण्यासाठी 63 लाख पगार; कंपनीने ऑफर केला ड्रिम जॉब
सापसुरळी दिसायला पाल (Lizard) आणि सापाप्रमाणे असते; मात्र तिला छोटे पाय असतात, ते सापाला नसतात. याच गोष्टीमुळे तिला सापाची मावशी म्हटलं जातं. सापसुरळीची त्वचा सापांच्या तुलनेत खूप मऊ आणि चमकदार असते. घर किंवा मैदानात सापसुरळीचं दर्शन सहजपणे होतं; मात्र तिच्यापासून कोणताही धोका नसतो. हा जीव सापांप्रमाणे विषारी (Venomous) नसतो. तसंच तो खूप लाजाळू असतो. त्यामुळं पालींच्या तुलनेत सापसुरळीला लपून राहायला आवडतं.
भारतात आढळतात सापसुरळीच्या 62 प्रजाती
2020 मध्ये झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (ZSI) भारतातल्या सापसुरळीच्या प्रजाती शोधून काढण्याची जबाबदारी स्वीकारली. `झेडएसआय`नं दिलेल्या माहितीनुसार, भारतात सापसुरळीच्या 62 प्रजाती शोधून काढण्यात त्यांना यश आलं आहे. यापैकी 57 टक्के म्हणजेच सुमारे 33 प्रजाती या केवळ भारतातच आढळतात. पर्यावरण, वनं आणि हवामानबदल मंत्रालयानं याबाबतचा अहवाल मागील वर्षी प्रसिद्ध केला आहे. स्किंक प्रजातींबाबतचा हा भारतातला पहिला अहवाल ठरला.
नराशिवाय पिल्लांना देऊ शकते जन्म
आश्चर्यकारक बाब म्हणजे, पिल्लांना जन्म देण्यासाठी सापसुरळीला नराची गरज भासत नाही. कॅनडातल्या मॅक्वायर युनिव्हर्सिटीत झालेल्या एका संशोधनानुसार, मादी सापसुरळी प्रजननानंतर नराचे शुक्राणू (Sperm) जमा करून ठेवते. त्यामुळे एका वर्षापेक्षा जास्त कालावधीत ती नराशिवाय पिल्लांना जन्म देऊ शकते. याबाबतचं संशोधन जर्नल ऑफ हेरिडिटीमध्ये प्रसिद्ध झालं आहे. डलहौसी युनिव्हर्सिटीतल्या डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजीच्या डॉ. ज्युलिया रिले यांनी सांगितलं, की `मादी सापसुरळीनं जोडीदाराव्यतरिक्त प्रजनन केल्यास तिचा जोडीदार तिला कायमस्वरूपी सोडून देतो. त्यामुळं सापसुरळी अन्य नरासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही. याच कारणामुळे ती साठवून ठेवलेल्या शुक्राणूंच्या मदतीनं पिल्लांना जन्म देते.`
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.