नवी दिल्ली , 22 जानेवारी : भारताने कोरोना प्रतिबंधासाठी जगातील सर्वांत मोठा लसीकरण कार्यक्रम (Vaccination Programme) गेल्या आठवड्यात सुरू केला आहे. आरोग्य क्षेत्रात, तसंच युद्धपातळीवर काम करणाऱ्या आघाडीच्या लाखो कार्यकर्त्यांना आतापर्यंत लस देऊन झाली आहे; मात्र तरीही या लशी सुरक्षित आहेत की नाहीत, त्या किती प्रभावी आहेत, याबद्दल लोकांच्या मनात अजूनही अनेक शंकाकुशंका आहेत. कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींना (Vaccines) अत्यंत वेगाने संमती देण्यात आली. त्यावरून काही शंका घेतल्या जात आहेत. तसंच, या लशींबाबत काही अफवा आणि खोट्या गोष्टीही पसरवल्या जात आहेत. त्यामुळे आपण लस घेऊ नये, अशी भावना अनेक लोकांमध्ये आहे. काही जण लशींबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत, ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी गुरुवारी व्यक्त केलं.
या लशींसंदर्भातले काही गैरसमज दूर करण्यासाठी, तसंच वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे दर्शविण्यासाठी न्यूज 18ने काही प्रश्नांना दिलेली ही उत्तरं...
लस घेणं बंधनकारक आहे का?
आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांत कोरोना योद्धे म्हणून काम करणारे कार्यकर्ते, 50 वर्षांवरील वयाच्या व्यक्ती आणि काही विकार असलेल्या 50 वर्षांखालील व्यक्ती अशा एकूण 30 कोटी नागरिकांना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तरीही कोविड-19 प्रतिबंधक लस घेणं बंधनकारक नाही. ही लस घेणं ऐच्छिक आहे. तरीही सरकारने पहिल्या टप्प्यातील लसीकरणाच्या संभाव्य लाभार्थ्यांना कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी लस घेण्याचा सल्ला दिला आहे.
लस घेतल्यामुळे वंध्यत्व (Infertilty) येईल का?
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींना सध्या भारतात परवानगी देण्यात आली आहे. या लशी घेतल्यानंतर पुरुष किंवा स्त्रियांमध्ये वंध्यत्व निर्माण होत असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे.
एखाद्याला अॅलर्जी (Allergy) असली, तर त्यांनी लस घ्यावी का?
एखाद्या व्यक्तीला अॅलर्जीचा इतिहास असेल, तर त्यांनी लस घ्यावी असा सल्ला दिला जात नाही. या दोन्ही लशी विकसित करणाऱ्या कंपन्या अर्थात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी अॅलर्जीच्या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute of India) त्यांच्या फॅक्ट शीटमध्ये सांगितलं आहे, की अन्नपदार्थ, औषधं किंवा लशी आदींना अॅलर्जिक असलेल्या व्यक्तींनी लस घेण्यापूर्वी त्याबद्दलची माहिती देणं आवश्यक आहे.
भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने असं म्हटलं आहे, की कोणाला अॅलर्जी असेल, त्यांनी लस न घेण्याचा सल्ला दिला जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना हे कळवलं आहे, की अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी लस घेऊ नये.
गर्भवती महिला, स्तनदा माता आणि विकार असलेल्या व्यक्तींनी लस घ्यावी का?
कोविड-19 प्रतिबंधक लसनिर्मितीनंतर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये गर्भवती महिला, तसंच स्तनदा मातांना सहभागी करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आत्ता लस घेऊ नये. गंभीर आजारी असलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलेल्या रुग्णांनी बरं होऊन चार ते आठ आठवडे होईपर्यंत लस घेऊ नये, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे.
ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांना ताप आहे, ज्यांना रक्तस्रावाच्या व्याधी आहेत, तसंच ज्यांची आजारपणासाठी नियमित औषधं सुरू आहेत अशा व्यक्तींनी लस घेऊ नये, असं सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी म्हटलं आहे.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर मास्क (Mask) घालणं आवश्यक आहे का?
हो. आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर शरीरात रोगप्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात; मात्र संरक्षण करून शकतील एवढ्या प्रमाणात अँटीबॉडीज विकसित होण्यासाठी दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवडे लागू शकतात. पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे मास्क घालणं, गर्दीच्या जागा टाळणं, सोशल डिस्टन्सिंग राखणं, हात-तोंड धुणं आदी बाबी पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही सुरूच ठेवाव्या लागणार आहेत.
हे देखील वाचा - ठरलं! दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री घेणार लस
ज्यांना अगोदर कोरोनाची लागण होऊन गेलीय, त्यांनी लस घ्यावी का?
ज्यांना अगोदर कोरोनाचा संसर्ग होऊन गेलाय, त्यांनी प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी लस घ्यावी. तसंच, ज्यांना कोरोनाचा संसर्ग आत्ता झालेला असेल, त्यांनी त्यातून बरे होऊन चार ते आठ आठवडे झाल्याशिवाय लस घेऊ नये, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
लस घेतल्यानंतर जाणवणारे दुष्परिणाम कोणते?
लसीकरणानंतर काही अनपेक्षित रिअॅक्शन्स (Reactions) येऊ शकतात. त्या लसीशी किंवा लसीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित असतीलच असं नाही. वेदना, इंजेक्शनच्या जागी सूज, थोडा ताप, अंगदुखी, थकवा, रॅशेस उठणं, नॉशिया (Nausea) अशी काही सौम्य लक्षणं दिसू शकतात, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Covid19, Vaccine