मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /प्रदूषित हवा उठलेय गर्भातल्या बाळांच्या मुळावर; भारतातल्या गर्भपाताची धक्कादायक कारण उघड

प्रदूषित हवा उठलेय गर्भातल्या बाळांच्या मुळावर; भारतातल्या गर्भपाताची धक्कादायक कारण उघड

गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपाताची (Miscarriages) संख्या वाढण्यामागे हवेतली विषारी घटक जबाबदार असल्याचं कारण उघड झालं आहे. Lancet या आंतरराष्ट्रीय जर्नलने प्रसिद्ध केलेली माहिती धक्कादायक आहे.

गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपाताची (Miscarriages) संख्या वाढण्यामागे हवेतली विषारी घटक जबाबदार असल्याचं कारण उघड झालं आहे. Lancet या आंतरराष्ट्रीय जर्नलने प्रसिद्ध केलेली माहिती धक्कादायक आहे.

गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपाताची (Miscarriages) संख्या वाढण्यामागे हवेतली विषारी घटक जबाबदार असल्याचं कारण उघड झालं आहे. Lancet या आंतरराष्ट्रीय जर्नलने प्रसिद्ध केलेली माहिती धक्कादायक आहे.

नवी दिल्ली, 8 जानेवारी : गेल्या काही वर्षांत भारतात आणि अन्य दक्षिण आशियायी देशांत मृत बाळ जन्माला येणं किंवा गर्भपाताचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याचं कारण विषारी हवा हे असल्याचं एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे. प्रदूषित हवा गर्भातल्या बाळाच्या जिवावर उठल्याचं हे धक्कादायक संशोधन एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे.  प्रदूषणामुळे (Air Pollution) हवेत असलेल्या विषारी वायूंचा (Toxic Air) गर्भावर परिणाम होतो आणि त्यामुळे गर्भपात (Miscarriages) वाढले असल्याचं यातून सांगण्यात आलं आहे.

दी लॅन्सेट (The Lancet) या वैद्यकीय शास्त्रविषयक प्रसिद्ध जर्नलमध्ये याबद्दलच्या संशोधनावरील लेख प्रसिद्ध झाला आहे. 2000 ते 2016 या कालावधीत दक्षिण आशियात गर्भपात (Miscarriage) किंवा बाळ जन्मतःच मृत (Stillbirth) असल्याच्या जेवढ्या घटना घडल्या, त्यापैकी प्रति वर्षी सुमारे साडेतीन लाख एवढ्या घटनांचा संबंध वाढलेल्या वायू प्रदूषणाशी होता. अशा एकूण घटनांपैकी सात टक्के घटना वायू प्रदूषणाशी (Air Pollution) संबंधित असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. तसंच, जगभरात या कारणाने गर्भपात होण्याचं प्रमाण दक्षिण आशियात सर्वाधिक असल्याचंही अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

पेकिंग युनिव्हर्सिटीतील ताओ क्स्यू हे या लेखाचे प्रमुख लेखक असून, त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रदूषणाच्या घातक पातळीशी दोन हात करण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज आमच्या संशोधनातून अधोरेखित झाली आहे.

गेल्या महिन्यात लॅन्सेटमध्ये (Lancet) प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, भारतात हवेच्या प्रदूषणामुळे 2019मध्ये 16.70 लाख मृत्यू झाले. त्या वर्षी देशात झालेल्या एकूण मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण 18 टक्के एवढं होतं. 2017मध्ये वायुप्रदूषणाशी निगडित कारणांमुळे 12.40 लाख जणांचा मृत्यू झाला होता. यावरून दोन वर्षांत हे प्रमाण किती वाढलं आहे, हे लक्षात येतं.

प्रदूषणामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज होतो. श्वसनमार्गाला संसर्ग (Infection) होतो. तसंच फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयविकार, झटका, मधुमेह, मोतिबिंदू आणि नवजात बालकांमधले आजार (Neonatal Diseases) आदींची कारणंही प्रदूषणाशी निगडित आहेत.

गर्भपाताचा प्रदूषणाशी संबंध असल्याचं आढळलेल्या ताज्या अभ्यासादरम्यान, चीनमधल्या शास्त्रज्ञांच्या चमूने दक्षिण आशियातल्या 34 हजार 197 महिलांचा माहितीचं विश्लेषण केलं. या महिलांचा किमान एकदा गर्भपात झालेला होता किंवा मृत बाळाचा जन्म झाला होता आणि त्यांना किमान एक जिवंत मूल होतं. त्यापैकी तीन चतुर्थांश महिला भारतातल्या होत्या, तर उर्वरित महिला पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या होत्या.

पीएम 2.5 (PM 2.5) अर्थात प्रदूषित हवेत आढळणारे धुळीचे कण, धूर इत्यादींच्या संपर्कात या महिला किती काळ आल्या असतील, याचा अभ्यास करण्यात आला. हे कण फुफ्फुसात अडकतात आणि रक्तप्रवाहातही प्रवेश करतात.

वर्षभरात भारतात होणाऱ्या गर्भपातांपैकी 7.1 टक्के गर्भपात प्रदूषणामुळे होत असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

चायनीज अॅकेडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे तियानजिया ग्वान हेदेखील या लेखाचे सहलेखक आहेत. गर्भपात किंवा मृत बाळाचा जन्म यांमुळे महिलांवर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दुष्परिणाम होतात. असे प्रकार कमी झाले, तर लिंगसमानतेच्या दिशेने एक पाऊल टाकले जाऊ शकेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारताची राजधानी नवी दिल्ली ही जगातील सर्वांत जास्त प्रदूषित राजधानी आहे. उद्योग, वाहनातून बाहेर पडणारा धूर, कोळशावर आधारित विद्युतनिर्मिती प्रकल्प, बांधकाम सुरू असलेल्या स्थळांवरील धूळ आणि पिकांचे अवशेष जाळणं ही भारतातल्या प्रदूषित हवेची मुख्य कारणं आहेत.

First published:

Tags: Air pollution, Health