Home /News /lifestyle /

कोरोनावर मात म्हणजे लढा संपला नव्हे; त्यापेक्षाही भयंकर आहेत POST COVID COMPLICATION

कोरोनावर मात म्हणजे लढा संपला नव्हे; त्यापेक्षाही भयंकर आहेत POST COVID COMPLICATION

कोरोनावर (CORONAVIRUS) मात केलेल्या बड्या नेत्यांचा याच POST COVID COMPLICATION ने जीव घेतला आहे.

    मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) मात केली, कोरोनाला हरवलं, कोरोनाविरोधात यशस्वी लढा जिंकला... बहुतेक कोरोना रुग्णांनी हे करून दाखवलं. मात्र कोरोनामुक्त होणं म्हणजे कोरोनाविरोधातील लढा पूर्णपणे जिंकणं असं नाही, असंच गेल्या काही महिन्यांपासून दिसून येतं आहे. कारण कोरोनावर विजय मिळवला तरी खरी लढाई सुरू होते ती त्यानंतर. कारण कोरोनाशी झुंज देताना जितका त्रास होतोय त्यापेक्षाही भयंकर त्रास होतो आहे ती कोरोनावर मात केल्यानंतर. कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्भवणारे पोस्ट कोव्हिड कॉम्प्लिकेशन (POST COVID COMPLICATION) खूपच भयावह आहेत. Post covid complications किती डेंजर आहे यासाठी इतर कोणत्या जर्नलमधील अभ्यासाचा पुरावा देण्याची गरज नाही. कारण भारतातच ही भयावह परिस्थिती समोर आली. कोरोना अक्षरश: फुफ्फुस पोखरून काढतो आहे. त्यामुळे फायब्रोसिससारख्या फुफ्फुसाच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाविरोधात युद्ध जिंकलेल्या बड्या नेत्यांनी पोस्ट कोव्हिड कॉम्पिलकेशनमुळेच आपला जीव गमावला आहे. तर काही सध्या याच परिस्थितीशी झुंजत आहेत. राष्ट्रवादी आमदार भारत भालकेंचा कोरोनानंतरच्या गुंतागुंतीमुळे मृत्यू 27 नोव्हेंबरला शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  भारत भालके (Bharat bhalke) यांचं पुण्यातील रुग्णालयात निधन झालं. त्यांना काही दिवसांपूर्वी Coronavirus ची लागण झाली होती. या विषाणूवर मात करत ते बरेही झाले होते. पण कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसात झालेला संसर्ग वाढला आणि गुंतागुंत निर्माण झाली. त्यांच्यावर रूबी रुग्णालयात उपचार सुरू होते. 'पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली असल्याची आणि प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुबी हॉलचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली होती. तरुण गोगाईंचं मल्टिऑर्गन फेल्युअर याआधी 23 नोव्हेंबरला आसामचं मुख्यमंत्रिपद भूषवणारे काँग्रेस नेते तरुण गोगोई (Tarun Gogoai) देखील याच कारणामुळे आयुष्याची लढाई हरले. गोगोई यांची प्रकृती गेल्या महिन्याभरात खालावली होती.  त्यांना कोरोना व्हायरसची (Covid-19) लागण झाली होती. प्लाझ्मा थेरपीसुद्धा त्यांच्यावर केली गेली. त्याला प्रतिसाद मिळाला आणि कोरोनावर त्यांनी मात केली. या विषाणूविरुद्धची लढाई जिंकून त्यांना 25 ऑक्टोबरला रुग्णालयातून सोडण्यातही आलं होतं. पण त्यानंतर महिन्याभरात त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. या आठवड्यात त्यांना पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाला हरवल्यानंतर लाइफ सपोर्टवर होते एसपी बालासुब्रमण्यम तर 25 सप्टेंबरला याच पोस्ट कॉम्प्लिकेशनमुळे मनोरंजन विश्वानंदेखील एका गायक गमावला. एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात केली होती. त्यातून ते बरे होत असताना त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झाली होती, श्वास घ्यायला त्रास होत होता, शारीरिक शक्तीही नव्हती, अशी माहिती त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी दिली होती. त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही लढा हरले 31 ऑगस्टला देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (pranab mukherjee died) यांचंही दीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांच्यावर 10 ऑगस्ट रोजी मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवस ते व्हेंटिलेटरवरच होते. आता सचिन पायलटही देत आहेत झुंज आता तर कोरोनाविरोधात युद्ध देणारा आणखी एक बडा नेता अशाच कोरोना संक्रमणानंतर उद्भणाऱ्या परिस्थितीशी झुंज देतो आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) 12 नोव्हेंबरला ते कोरोना पॉझिटिव्ह होते. 28 नोव्हेंबरला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी आपली तपासणी करून घेतली. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला पण फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं आहे. पोस्ट कोव्हिडच्या त्रासामुळे कोरोना टास्क फोर्सचे प्रमुखही विश्रांतीवर कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख आणि प्रिन्स अली खान रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय ओक यांनाही कोरोनानंतर फुफ्फुसाचा फायब्रोसिस झाला. त्यांना इतका त्रास होतो आहे की रुग्णालयाच्या कामकाजातून त्यांनी जवळपास तीन महिने विश्रांती घेतली आहे. हे वाचा  - दुर्लक्ष नको! भारत, US सह अनेक देशांतील कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका डॉ. संजय ओक यांना 13 जूनला कोरोनाची लागण झाले. काही दिवसांतच त्यांनी कोरोनाला हरवलं आणि पुन्हा रुग्णालयात ते रूजू झाले. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. मुलुंड फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. 6 जुलैला ते रुग्णालयातून घरी परतले, 26 जुलैला पुन्हा रुग्णालयात कार्यरत झाले. पण नोव्हेंबरमध्ये त्यांना पुन्हा त्रास उद्भवला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. कोरोना संसर्गामुळे त्यांच्या फुफ्फुसावर जास्त परिणाम झाला आणि त्यांना फायब्रोसिस झाला. पोस्ट कोव्हिडनंतरची तपासणी महत्त्वाची त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांच्या तपासण्या होणं किती महत्त्वाचं आहे, याकडे डॉ. ओक यांनी लक्ष वेधलं आहे. "सध्या मी नियमित कामकाज करू शकत असलो तरी थोडा जरी शारीरिक ताण किंवा जिने चढलो तरी मला धाप लागते. संसर्गाचा परिणाम झालेल्या काही अंशी रुग्णांमध्ये फायब्रोसिसचा आजार होतो. मी रुग्णालयातच काम करत असल्याने मला फुप्फुसामध्ये होत असलेले बदल लगेच समजले आणि उपचार सुरू केले. मात्र सर्वच कोरोनामुक्त रुग्णांना हे बदल लवकर लक्षात येतीलच असं नाही. त्यामुळे रुग्ण कोरोनातून बरे झाले तरी तपासण्या होणं गरजेचं आहे. रुग्णांनीही कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास वेळीच उपचार होतील", असं डॉ. ओक यांनी सांगितल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं. हे वाचा  -  कोरोना महासाथीला रोखण्यात भारत अव्वल; मोदी सरकारचा ACTION PLAN ठरतोय यशस्वी शिवाय जुलैमध्येच दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीदेखील, देशातील डॉक्टरांना रुग्णांची तब्येत ठीक झाल्यानंतरही त्यांच्या शरीरातील इतर अवयवांची चाचणी करायला हवी. कोरोनामुळे त्यांच्या शरीरातील इतर अवयवांवर त्याचा परिणाम झाला की नाही हे पाहायला हवं, असा सल्ला दिला होता. फक्त भारतच नव्हे तर जगभरातील रुग्ण करत आहेत पोस्ट कोव्हिडचा सामना कोरोना व्हायरसमुळे भारताप्रमाणेच अमेरिका आणि युरोपातील अनेक रुग्णांना फुप्फुसाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इंडिया नावाच्या एका मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार तज्ज्ञांनी याला पोस्ट कोविड-19 इंटरस्टिशियल लंग डिजीस (PC-ILD) म्हटलं आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी अधिकतर मध्यम आणि कमी दर्जाच्या संसर्गाचा सामना करीत होते. यामध्ये केवळ 10 टक्के गंभीर रुग्ण होते. ज्यांना गंभीर कोविड-19 न्युमोनिया झाला आहे. मात्र 5 टक्के लोक असे आहेत ज्यांना एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) नावाच्या आजाराचा सामना करीत आहेत. म्हणजे हे 5 ते 10 टक्के लोक आहे, ज्यांना लंग फायब्रोसिसचा (Lung Fibrosis) त्रास जाणवत आहे. काय आहे लंग फायब्रोसिस? लंग फायब्रोसिस (Lung Fibrosis) आजारात फुप्फुसातील टिश्यूजना (Tissue) सूज येते. याकारणाने फुप्फुसात हवेची जागा कमी होऊ लागते. परिणामी श्वास घ्यायला त्रास होतो. ऑक्सिजनची कमतरता जाणवते. अशात शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो. यामुळे दम लागतो, थकल्यासारखं वाटतं. हृदयाचे ठोके नीट पडत नाही. मल्टी ऑर्गन फेल्युअर, हार्ट अटॅक आणि गंभीर अवस्थेत मृत्यूही होऊ शकतो, इंडिया जर्नलमध्ये यासंबंधी अभ्यास प्रसिद्ध करणारे डॉ. जरीर एफ. उदवादिया यांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या