100 कोटी वर्षांनी पृथ्वीवर असेल केवळ बॅक्टेरियाचं राज्य; तज्ज्ञांच्या निष्कर्षामागे काय आहे कारण?

100 कोटी वर्षांनी पृथ्वीवर असेल केवळ बॅक्टेरियाचं राज्य; तज्ज्ञांच्या निष्कर्षामागे काय आहे कारण?

जपान (Japan) आणि अमेरिकेतल्या (USA) शास्त्रज्ञांनी अलीकडेच केलेल्या एका संशोधनातून निष्कर्ष काढला

  • Share this:

टोकियो/अटलांटा, 6 मार्च  : शाळेत असताना आपण विज्ञानाच्या/भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं असतं, की पृथ्वीभोवतीच्या वातावरणात 21 टक्के ऑक्सिजन (Oxygen) आहे. त्यामुळेच पृथ्वीवर सगळे सजीव जगू शकत आहेत, वगैरे वगैरे... पण असा विचार कधी केलात का, की हा ऑक्सिजनचा स्तर कधी कमी होईल का? तो खरंच कमी झाला तर काय होईल?

सर्वसामान्य माणसाची विचार करण्याची शक्ती जिथे संपते, तिथे शास्त्रज्ञांची सुरू होते. म्हणूनच ते भविष्यातल्या घटनांचा वेध घेऊ शकतात. जपान (Japan) आणि अमेरिकेतल्या (USA) शास्त्रज्ञांनी अलीकडेच केलेल्या एका संशोधनातून निष्कर्ष काढला आहे, की 100 कोटी वर्षांनी पृथ्वीभोवतालच्या वातावरणातलं (Earth Atmosphere) ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी होणार आहे. 'आज तक'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

या बदलांमुळे गुंतागुंतीची शारीरिक रचना असलेले प्राणी आणि प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे (Photosynthesis) अन्न बनवणाऱ्या वनस्पती आणि सूक्ष्मजीवांवर गदा येणार आहे. अर्थात, प्राणवायूच कमी झाल्यावर दुसरं काही होण्याची अपेक्षाच करणं चूक आहे.

शास्त्रज्ञ म्हणतात, की माणसासारख्या गुंतागुंतीची शरीररचना असलेल्या जीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची (Oxygen) सर्वाधिक गरज असते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्याच्या आधी ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. ती स्थिती 100 कोटी वर्षांनी पुन्हा येणार आहे.

जपानच्या टोहो विद्यापीठातले शास्त्रज्ञ काजुमी ओजाकी आणि अटलांटाच्या जॉर्जिया इन्स्टिट्यू ट ऑफ टेन्कॉलॉजीतले क्रिस रीनहार्ड यांनी पृथ्वीवरच्या वातावरणाचं, तसंच बायोलॉजिकल आणि जिओलॉजिकल सिस्टीमचं एक मॉडेल तयार केलं आहे. त्याआधारे ते भविष्यात पृथ्वीभोवतालच्या वातावरणात होणार असलेल्या बदलांचा वेध घेत आहेत. नासाच्या (NASA) प्लॅनेट हॅबिटॅबिलिटी प्रोजेक्टअंतर्गत हा अभ्यास करण्यात आला होता.

हे वाचा - मुलाच्या नाकातून येत होता विचित्र वास; सर्जरीनंतर डॉक्टरही शॉक

त्यांच्या म्हणण्यानुसार, 100 वर्षांपर्यंत ऑक्सिजनचा स्तर आहे तसाच राहील; पण त्यानंतर मात्र त्यात लक्षणीय घट होत जाईल. वातावरणात ऑक्सिजनची उपलब्धता स्थिर नसेल. सूर्याचं वय वाढणं, हे त्यामागचं कारण असेल. सूर्याचं वय वाढत जाईल, तसतसा तो अधिकाधिक तप्त होत जाईल. त्यामुळे पृथ्वीवरचा कार्बन डाय ऑक्साइड (CO2) वायू कमी होत जाईल. त्यामुळे सूर्याची उष्णता शोषून घेण्याची पृथ्वीची क्षमताही घटत जाईल. त्यामुळे पृथ्वीभोवतीचा वातावरणाचा थर कोलमडू लागेल. कार्बन डायऑक्साइड कमी झाला, तर वनस्पतींसारखे प्रकाश-संश्लेषण करणारे सजीव जगू शकणार नाहीत.

वनस्पती जगल्या नाहीत, तर साहजिकच ऑक्सिजनचं उत्पादन घटेल. ती घट प्रचंड प्रमाणात असेल, असं क्रिस रीनहार्ड म्हणतात. तेव्हाची ऑक्सिजनची पातळी सध्याच्या तुलनेत लाखो पट कमी असेल.

या दोन शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, त्या वेळी वातावरणातलं मिथेन वायूचं (Methane) प्रमाण 10 हजार पटींनी वाढेल. या सगळ्या घडामोडी वेगाने घडतील. त्यामुळे 100 कोटी वर्षांनंतर त्यापुढच्या 10 हजार वर्षांत पृथ्वीवरचा ऑक्सिजनचा स्तर पूर्णतः नष्ट होईल.

काजुमी ओजाकी म्हणतात, की या सगळ्या बदलांमुळे पृथ्वीवरच्या पर्यावरणावर खूप मोठे बदल होतील. केवळ सूक्ष्मजीवच या परिस्थितीत पृथ्वीवर तग धरू शकतील. अॅनारोबिक म्हणजे ज्या बॅक्टेरियांना (Bacteria) जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही अशाच बॅक्टेरियांचं त्या वेळी पृथ्वीवर राज्य असेल. जमिनीवरचे, तसंच समुद्रातले मोठे प्राणी नष्ट होतील.

पृथ्वीभोवती ऑक्सिजनपासून बनलेला जो ओझोन वायूचा थर (Ozone Layer) आहे, तोही नष्ट होईल. त्यामुळे सूर्याचे अतिनील किरण (Ultra Violet Rays) पृथ्वीवर येतील, समुद्र आणि जमिनीवर सूर्याच्या तप्ततेचा दुष्परिणाम होईल.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठातल्या नॅटेली एलेन म्हणतात, की पृथ्वीवर ऑक्सिजन अनेक रूपांत उपलब्ध आहे. पृथ्वीवर जीवनाची सुरुवात झाली, तेव्हापासून पृथ्वीवर ऑक्सिजनचं अस्तित्व आहे. नव्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरच्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ शकतं. कारण त्यामागे अनेक पर्यावरणीय, वातावरणीय आणि अंतराळातली कारणं आहेत. त्यामुळे पृथ्वीवर वास्तव्य करण्यासारखी स्थिती कायम राहणार नाही.

First published: March 6, 2021, 10:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या