मुंबई, 13 ऑक्टोबर : कोरोनाच्या या संकटकाळात सध्या इम्युनिटी वाढवण्याची खूप गरज आहे. यामुळे सकस आणि शुद्ध जेवण करण्याची गरज आहे. यासाठी आपल्या आहारात ताज्या भाज्यांचा समावेश करावा. भाज्यांमधूनच सर्वांत जास्त संतुलित पोषण आपल्या शरीराला मिळतं. पण देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये विषारी भाज्या विकल्या जात आहेत. या भाज्यांमध्ये विष आढळून येत असून, तुम्ही या भाज्या खाल्ल्या तर तुम्हाला याचा अपाय होऊ शकतो.
भारतीय अन्न सुरक्षा मानक आणि प्राधिकरणाच्या एक रिपोर्टमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. या भाज्यांमध्ये शिसं आणि कॅडमियमसारखे विषारी धातू आढळून येत असल्याचं दिसून आलं आहे. जवळपास 9.5 टक्के भाजा या खाण्यायोग्य नसल्याचं देखील आढळून आलं आहे.
विविध राज्यांमधील नमुने यासाठी घेण्यात आले होते. यामध्ये 10 टक्के भाज्या या खाण्यायोग्य नव्हत्या. या सर्व नमुन्यांमध्ये मध्य प्रदेशातील सर्वांत जास्त नमुने नापास अर्थात खाण्यायोग्य नसल्याचं समोर आलं. जवळपास 25 टक्के भाज्या या खाण्यायोग्य नव्हत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगढ असून तेथील 13 टक्के भाज्या खाण्यायोग्य नाहीत. त्यानंतर बिहार, चंदीगड, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, पंजाब आणि दिल्लीचा क्रमांक येतो.
फळभाज्यांमध्ये शिशाचं प्रमाण 100 मायक्रोग्रॅम पेक्षा जास्त नसावं. डीएनएच्या वृत्तानुसार मध्य प्रदेशातील टोमॅटोच्या नमुन्यांमध्ये 600 मायक्रोग्राम इतकं शिसं आढळून आलं होतं. केवळ शिसंच नाही तर देशभरातील भाज्यांमध्ये कॅडमिअम, अर्सेनिक आणि मर्क्युरीसारखे जीवघेणे धातूदेखील आढळून येत आहेत.
FSSAIने या तपासणीमध्ये फळभाज्या, पालेभाज्या आणि कंदमुळांचादेखील अभ्यास केला. यामध्ये आढळून आलं आहे की, कीटकनाशकांच्या अतिवापरांमुळे भाज्यांमध्ये विषारी किटाणू आढळून येत आहेत. त्याचबरोबर विषारी पाणी भाज्यांना दिल्याने देखील विविध प्रकारचे विषारी धातू या भाज्यांमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर विविध घटक याला कारणीभूत असल्याचं देखील FSSAIने आपल्या निरीक्षणात नोंदवलं आहे.
हे असं टाळा -
तुम्ही यापासून स्वत:चा बचाव करू शकता. सेंद्रीय (organic) भाज्या वापरल्याने तुम्ही या जीवघेण्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. या भाज्या महाग आणि सर्वांनाच उपलब्ध होणाऱ्या नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या आसपास सेंद्रीय भाज्या लावू शकता. या सगळयात तुमच्याकडे जर काही पर्याय नसेल तर बाजारातून भाजी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यावी. त्याचबरोबर शक्य असेल तर भाज्या उकळून आणि उकडून घ्याव्यात. मिठाच्या पाण्यातदेखील भाज्या काही वेळ ठेवल्यास त्या प्रदूषणापासून मुक्त होतात.