Home /News /lifestyle /

खोबरं, चिंच, टोमॅटोची नाही इथं लोक खातात लाल मुंग्यांची चटणी

खोबरं, चिंच, टोमॅटोची नाही इथं लोक खातात लाल मुंग्यांची चटणी

आपण अशा चटणीची माहिती घेणार आहोत जी आदिवासी मंडळी वर्षातून एकदा तरी खातात.

    रांची, 11 डिसेंबर : चटणी हा आपल्या रोजच्या आहारातला पदार्थ, जेवणाची लज्जत वाढवणारा. किती तरी प्रकारच्या चटण्या (Chutney) आपण खातो. भेळेत घातली जाणारी चटणी वेगळी, इडलीबरोबरची खोबऱ्याची चटणी निराळी आणि उन्हाळ्यातल्या कैरीच्या चटणीची तऱ्हाच न्यारी, असे एक ना अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत. तसंच काही चटण्या म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांचं वैशिष्ट्यही बनलेल्या असतात. उदाहरणार्थ सोलापूरची शेंगदाण्याची चटणी. आता आपण अशा चटणीची माहिती घेणार आहोत जी आदिवासी मंडळी वर्षातून एकदा तरी खातात. कदाचित त्या चटणीबद्दल ऐकल्यावर आपल्याला विचित्र वाटेल. ही चटणी म्हणजे मुंग्यांची चटणी. झारखंडमधील जमशेदपूरपासून सुमारे 70 किलोमीटरवर असलेल्या मटकुरवा या गावातले आदिवासी चक्क लाल मुंग्यांची चटणी खातात. या लाल मुंग्यांना काही भागांत उंबील असंही म्हणतात. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा (Energy) निर्माण करण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी (Hunger) ही चटणी खात असल्याचं आदिवासी (Tribals) सांगतात. वर्षातून एकदाच येणाऱ्या या लाल मुंग्यांची चटणी आपले पूर्वजही खायचे. त्यामुळे शरीरस्वास्थ्यासाठी आम्हीही ती चटणी खातो, असं हे आदिवासी म्हणतात, असं ‘आज तक’च्या वृत्तात म्हटलं आहे. या मुंग्यांमध्ये टेटरिक अॅसिड असतं आणि त्याचा शरीराला फायदा होतो. जमशेदपूरच्या (Jamshedpur) आसपासच्या जंगलांमध्ये (Jungles) थंडीच्या मोसमात साल, करंज अशा झाडांवर या लाल मुंग्या (Red Ants) आपलं घरटं तयार करतात. हे घरटं खूप उंचावर तयार केलेलं असतं आणि ते करण्यासाठी त्याच झाडाच्या पानांचा वापर केलेला असतो. ही घरटी तयार होण्यापूर्वी झाडांवर या मुंग्यांची ये-जा वाढली असल्याचं आदिवासींच्या लक्षात येतं. मग त्यांच्यातल्या तरुणांना लाल मुंग्यांची ही घरटी तोडून आणण्याचं काम दिलं जातं. या लाल मुंग्यांची चटणी करायची, तर त्या एकत्र करायला हव्यात ना! म्हणून मग ही सगळी घरटी एका मोठ्या हंड्यासारख्या भांड्यात झाडली जातात. त्यामुळे सगळ्या मुंग्या त्यात पडतात. त्यानंतर त्या मुंग्या पाट्यावर वाटल्या जातात. वाटताना त्यात मिरच्या, आलं, लसूण वगैरे चटणीत नेहमी घातले जाणारे पदार्थ घातले जातात. त्यामुळे चटणीचा चवदारपणा वाढतो. हे सगळं पाट्यावर बारीक वाटण्याचा कार्यक्रम साधारण अर्धा तास चालतो. ते वाटून झालं की झाली चटणी तयार. आपण चटणी खातो ती अन्य कोणत्या तरी पदार्थाला लावून; पण या आदिवासींची गोष्ट मात्र निराळी आहे. हे आदिवासी ही लाल मुंग्यांची चटणी नुसतीच खातात. चटणी तयार झाली, की साल वृक्षाची पानं आणली जातात आणि त्यावर ही चटणी घेऊन ती खातात. आबालवृद्ध म्हणजे अगदी एका वर्षाच्या बाळापासून प्रौढांपर्यंत सगळे जण ही चटणी खातात. या चटणीला कुरकू असंही म्हणतात. ही चटणी खूप छान लागते, असं गावातल्या लोकांचं म्हणणं आहे
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food, Lifestyle

    पुढील बातम्या