बंगळुरू, 14 ऑक्टोबर : अभिनेत्री राणी मुखर्जीच्या मेहंदी फिल्ममध्ये दिसलेला अभिनेता फराज खान (Faraaz Khan) सध्या जीवन-मृत्यूशी झुंज देतो आहे. बंगळुरूतल्या एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला आर्थिक मदतीची गरज आहे आणि त्यासाठी अभिनेत्री पूजा भट्टने (pooja bhatt) सोशल मीडियावर हात जोडून मदत मागितली आहे.
अभिनेता फिरोज खानला न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर आहे. त्याच्यावर गेल्या पाच दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या उपचारावर त्याच्या कुटुंबाने बराच पैसा खर्च केला. मात्र आता त्यांना 25 लाख रुपयांची गरज आहे. त्याचा भाऊ अभिनेता फहमान खानने लोकांसमोर हात पसरले आहेत. मदतीची याचना केली आहे. फराजसाठी क्राऊड फंडिंग सुरू करण्यात आलं आहे.
Please share and contribute if possible. I am. Would be grateful if any of you can as well. 🙏https://t.co/UZSbvA2sZb
याची माहिती होताच अभिनेत्री पूजा भट्टनेही हात जोडून त्याच्यासाठी मदत मागितली आहे. पूजा भट्टने सोशल मीडियावर ट्वीट केलं आहे. कृपया ही पोस्ट शेअर करा आणि शक्य असेल तर मदत करा, असं तिनं म्हटलं आहे.
फराजचा भाऊ फहमानने दिलेल्या माहितीनुसार, फराज एक वर्षापासून खोकला आणि छातीतील संक्रमणाने त्रस्त आहे. त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला तीनवेळा झटका आला, त्यानंतर त्याच्या मेंदूत हर्पिस संक्रमण झाल्याचं निदान झालं. त्यामुळे त्याची प्रकृती आणखी खालावली आहे.
1998 साली मेहंदी फिल्ममध्ये राणी मुखर्जीसह फराजने काम केलं होतं. त्यानंतर तो प्रसिद्ध झाला. मात्र हळूहळू तो फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाला. 2008 साली तो टीव्ही सीरिअल 'नीली आंखे'मध्ये दिसला होता.