मुंबई, 15 सप्टेंबर- तुम्ही एखाद्या उद्देशाने कोणाची भेट घेण्याचं ठरवलं आणि भेटीचा उद्देश यशस्वी झाला नाही, तर ही भेट वेळेचा अपव्यय वाटतो. पण बऱ्याचदा अनेकजण अशा भेटीनंतर स्वतःचा मूड फ्रेश करण्यासाठी दुसऱ्या कामात स्वतःला गुंतवतात. तर काहीजण संबंधित व्यक्तीला पुन्हा भेटायचं नाही, असंही ठरवतात. मात्र, भेटीचा उद्देश यशस्वी न झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला नुकसानभरपाई मागितली असल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? कारण नुकताच असा एक प्रकार समोर आलाय. डेटिंग अयशस्वी झाल्यानंतर एका तरुणाने तरुणीला चक्क जेवण व ड्रिंक्सचं बिल पाठवलं, व वेळ वाया घालवल्याबद्दल भरपाई मागितली.
मिररच्या रिपोर्टनुसार, फियोना नावाच्या मुलीने स्वतः टिकटॉकवर व्हिडिओ टाकून याबद्दल माहिती दिली. तिने व्हिडिओमध्ये सांगितलं, ‘मी एकदा एका मुलाला डेट केलं होतं, पण ही डेट यशस्वी न झाल्याने त्या मुलाने मला बिल पाठवत 2600 रुपयांची भरपाई मागितली आहे.’ विशेष म्हणजे भरपाई मागणाऱ्या या मुलाचं लोकांना केवळ आश्चर्यच वाटलं नाही, तर अनेकांनी ही कल्पना चोरून पुढे वापरणार असल्याच्या भावनाही कमेंटमध्ये व्यक्त केल्यात.
वेळ वाया घालवल्यामुळे मागितले पैसे
टिकटॉक युजर फिओनाने सांगितले की, ‘मला एक प्रिंटेड इनव्हॉइस मिळाला आहे. डेटनंतर मी त्या मुलाला मेसेज केला होता की, त्याच्यासोबत पुढे काहीही होऊ शकत नाही. त्यानंतर संबंधित मुलाने मला एक बिल पाठवले आहे. 'एक अयशस्वी डेट' असं त्यावर लिहिलं आहे. डेटवर गेल्यानंतर जेवणासाठी 1500 रुपये आणि ड्रिंक्सचे 1100 रुपये, असा एकूण 2600 रुपयांचा खर्च झाल्याचं बिल संबंधित मुलाने पाठवलं. ही बाब पैशांची नाही, तर तत्त्वांची आहे, असंही त्याने म्हटलंय,’ असं सांगताना फियोना म्हणाली, ‘मला डेटचे पैसे द्यायचे होते, परंतु, त्या मुलाने स्वतःच मला पैसे देऊ दिले नाहीत, आणि नंतर डेट यशस्वी झाली नाही, तर मला बिल पाठवलं.’
(हे वाचा:जोडीदार शोधताना 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा होईल पश्चाताप )
कमेंट करत यूजर्स म्हणाले, ‘कल्पना चांगलीच.’
विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात त्या मुलाची वृत्ती लक्षात आली. कमेंट करताना, बहुतेक मेल युजर्सने त्याला एक हिरो म्हटलं आहे. तेदेखील ही कल्पना नक्कीच वापरतील, असंही अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलंय. तर एका युजरनी लिहिलंय की, ‘आता मी माझ्या ‘एक्स’ला वेळ वाया घालवण्यासाठी नुकसानभरपाई बिलासह पाठवणार आहे.’ मात्र, काही लोकांनी मुलाला दोष दिला आहे. उलट वेळ वाया घालवल्यामुळे संबंधित मुलीनेदेखील त्या मुलाला पैसे मागावेत, असा सल्ला या मंडळींनी दिला आहे.डेटिंग यशस्वी न झाल्यामुळे नुकसानभरपाई मागितल्याचा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत असल्यातरी या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Break up, Lifestyle, Love story