Home /News /lifestyle /

कर्तव्यनिष्ठेला सलाम! शनिवारी घेतली बैठक आणि रविवारी दिला बाळाला जन्म

कर्तव्यनिष्ठेला सलाम! शनिवारी घेतली बैठक आणि रविवारी दिला बाळाला जन्म

महिलांना निसर्गानं कमालीचं सक्षम बनवलं आहे. याच शारीरिक आणि भावनिक क्षमतेचा प्रत्यय एका महिला अधिकाऱ्यानं दिला आहे.

    इंदौर, 13 जानेवारी : स्त्रीशक्ती असा शब्दप्रयोग आपण नेहमीच लिहिण्याबोलण्यात करत असतो. इंदौरच्या एका अधिकाऱ्यांनी या स्त्रीशक्तीचा प्रत्यय आपल्या कृतीतून दिला आहे. इंदौर महापालिकेच्या आयुक्त प्रतिभा पाल यांची शहरात चर्चा आहे. एरवी ही चर्चा कार्यक्षम अधिकारी म्हणून असते. आता मात्र एका अनोख्या कारणासाठी त्या चर्चेत आहेत. झालं असं, की शनिवारी सायंकाळपर्यंत त्यांनी अधिकाऱ्यांची कामकाजासंदर्भात बैठक घेतली. आणि रविवारी हॉस्पिटलमध्ये जात मुलाला जन्म दिला. इंदौर शहराची सगळीकडं एक स्वच्छ शहर म्हणून ख्याती आहे. सलग चारवेळा इंदोर स्वच्छतेबाबत पहिल्या क्रमांकावर राहिलं आहे. आता पाचव्या वेळीही हे शहर विजेतेपदाचं प्रबळ दावेदार बनलं आहे. आयुक्त प्रतिभा पाल यांनी आधी वॉटर प्लस-प्लस सर्व्हेमध्येही कमालीची सक्षम कामगिरी केली. त्यानंतर कचरा शुल्काचीही ३१ डिसेंबरपर्यंत जवळपास ९० टक्के वसुली करण्यात आली. विशेष म्हणजे सगळ्या पालिका अधिकाऱ्यांनीही आपापल्या घरचं कचरा शुल्क व्यवस्थित भरलं. यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही पूर्ण सहकार्य केलं. आता इंदौर महापालिकेला सेवन स्टार रेटिंग मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आणि हे रेटिंग मिळालं तर इंदौर महापालिका अशी पहिली महापालिका असेल जिच्या आयुक्तांनी नदी-नाल्यांमधील आऊटफॉल्सला स्वतः लक्ष घालत बंद केलं. शिवाय त्या सतत दौरेही करत राहिल्या. अगदी शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांचं काम सुरू होतं. यात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रात्री होणाऱ्या साफसफाईबाबत सूचना दिल्या आणि रात्रीही त्या मोबाईलच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी संपर्कात होत्या. दुसऱ्याच दिवशी दुपारी त्यांनी मुलाला जन्म दिला. एकाही दिवसाची सुट्टी न घेता त्या सतत कार्यमग्न राहिल्या. त्यांच्या या कार्यनिष्ठेचं जनसामान्य भरभरून कौतुक करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Indore, Inspiring story, Small baby, Success stories

    पुढील बातम्या