कोलंबिया, 30 डिसेंबर : पिझ्झा-बर्गरला जंक फूड म्हणून अनेकदा हिणवलं जातं. मात्र तरीही यांचे चाहते काही कमी होताना दिसत नाहीत. बर्गर (burger) सगळ्याच वयोगटातील लोकांना खायला आवडतं. हे फुड स्टॉल्सवरही विविध चव आणि आकारात सहज उपलब्ध असतं.
या बर्गरला आलू टिक्की, सॉस, चीज आणि विविध भाज्या टाकून खास बनवलं जातं. मात्र बर्गरबाबत ही बातमी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एका कोलंबियन रेस्टॉरंटनं (Columbia) २४ कॅरेट सोन्याचं (gold) गोल्ड बर्गर (golden burger) बनवलं आहे.
या सोन्याच्या बर्गरचं नाव ठेवलं आहे ऑरो मॅककॉय. हे ऑरो मॅककॉय २७ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. डबल मीट आणि डबल चीजसह २४ कॅरेट सोनं वापरून हे बर्गर बनलं आहे. ग्राहकांना हे बर्गर खूप आवडत आहे. अनेक लोक तर केवळ या बर्गरला पाहण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये येत आहेत. जमलेल्या गर्दीतील लोक सतत विचारत आहेत, की हे बर्गर खरोखर सोन्याचं बनलेलं आहे का?
सोशल मीडियावरही या सोन्याच्या बर्गरचे फोटो व्हायरल झालेत. लोक सोशल मीडियावर बर्गरच्या फोटोजखाली कमेंट्स करून विचारत आहेत, की या बर्गरची नेमकी किंमत काय? या बर्गरची किंमत आहे तब्बल ४१९१ रुपये!
रेस्टॉरंटची शेफ मारिया पाऊला हिचं म्हणणं आहे, की या बर्गरला आधी प्लास्टिकमध्ये लपेटलं जातं. मग त्याच्यावर सोन्याचा वर्ख लावला जातो. या बर्गरला खाण्याआधीच चाहते त्याच्या रंग-रूपावर फिदा होत आहेत.