महाराष्ट्रातून वैष्णो देवीला निघाल्या सायकलस्वार आजी; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, 'जय माता दी'

महाराष्ट्रातून वैष्णो देवीला निघाल्या सायकलस्वार आजी; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, 'जय माता दी'

68 वयाच्या या आजी वैष्णो देवी (vaishno devi) दर्शनासाठी महाराष्ट्र ते जम्मू असा तब्बल 2200 किमी प्रवास सायकलवरून (cycle) करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • Share this:

बुलडाणा, 22 ऑक्टोबर : 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक म्हणत' जंगली प्राण्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी भल्यामोठ्या भोपळ्यात बसून जंगली मार्गातून आपल्या लेकीकडे जाणारी गोष्टीतील आजी (old woman) आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. या गोष्टीतील आजीने जी डेअरिंग आणि हुशारी दाखवली आहे, त्याचं आपल्याला कौतुकच वाटतं. आज प्रत्यक्षात असंच काहीसं डेअरिंग करणाऱ्या महाराष्ट्रातल्या (maharashtra) आजींची सध्या सोशल मीडियावर (social media) चर्चा सुरू आहे. या आजी चक्क सायकलवर (cycle) स्वार होऊन महाराष्ट्रातून जम्मूतील वैष्णो देवीच्या (vaishno devi) दर्शनाला निघाला आहेत.

महाराष्ट्राच्या बुलढाण्यातील एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वय वर्षे 68. खामगावमध्ये राहणाऱ्या रेखा देवभानकर नवरात्रीच्या या दिवसांमध्ये चर्चेत आल्या आहेत. याचं कारण म्हणजे खामगावमधून जम्मूतील वैष्णो देवीच्या दर्शनाला त्या निघाल्या आहेत. कोणतं विमान, ट्रेन, बस किंवा खासगी गाडीने नाही बरं का! तर चक्क सायकलने. सायकलवर एकट्याच स्वार होऊन त्या जवळपास 2200 किमी दूर वैष्णो देवीला जात आहेत. असं सांगून तुम्हाला विश्वास बसणार तुम्ही हा व्हिडीओच प्रत्यक्षात पाहा, तेव्हाच तुमचा विश्वास बसेल.

काय व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसला ना. अगदी तरुणांनाही लाजवेल असा या आजीबाईंचा जोश आहे. या वयातही 2200 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी निघाल्या आहेत, त्यादेखील सायकलवर बसून. त्यांचा हा निर्णय हा फिटनेस पाहून भल्या भल्यांनी तोंडात बोटं घातली आहे. इच्छा असेल तर काहीही शक्य असतं, मग त्यामध्ये वयही अडचण राहत नाही, हे या आजींनी दाखवून दिलं.

हे वाचा - फॉरनर्सला लाजवेल अशी इंग्रजी कॉमेंट्री करतात हे मुख्याध्यापक, एकदा VIDEO पाहाच

रेखा यांनी 24 जुलैला आपला प्रवास सुरू केला आहे. दिवसभरात त्या 40 किलोमीटर प्रवास करतात. रात्रीच्या वेळी त्या एखाद्या कुटुंबाच्या घरी आसरा घेतात.

अनेकांनी या आजींचा व्हिडीओ पाहिला. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तर अनेकांनी रेखा यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्या जिथं जातील तिथं  त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचं आवाहन नेटिझन्सनी केलं आहे. अनेकांनी त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.

हे वाचा - OMG! 9 महिन्यांची गर्भवती 5 मिनिटांत धावली 1.6 किमी; पाहा VIDEO

शिवाय अनेकांना या आजीमध्ये खऱ्या अर्थाने देवीचं दर्शन झालं. या आजीमध्ये देवीचीच शक्ती असल्याचं अनेक जण म्हणाले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण आजींना नतमस्तक झाला आहे आणि त्यांच्या तोंडून जय माता दी असंच निघतं आहे. आजींच्या या जिद्दीला सर्वांनी सलाम केला आहे. कित्येकांसाठी या आजी प्रेरणा बनल्या आहेत.

Published by: Priya Lad
First published: October 22, 2020, 8:11 AM IST

ताज्या बातम्या