मुंबई, 20 मार्च: मार्च महिना सुरू झाला असून सध्या शाळा-कॉलेजांमध्ये परीक्षांचा माहोल आहे. त्यानंतर शाळा-कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. सुट्टीत वेळ घालवण्यासाठी पत्ते खेळणं हा अनेकांचा ठरलेला कार्यक्रम असतो. एप्रिल-मे महिन्यात बाहेर कडक ऊन पडल्यामुळे दुपारच्या वेळी घरात बैठे खेळ खेळण्यास प्राधान्य दिलं जातं. त्यातही सध्याच्या मोबाईल गेम्सच्या काळातही पत्त्यांची लोकप्रियता अबाधित आहे. आता तर ऑनलाईनसुद्धा पत्त्यांचा खेळ खेळता येतो. पण 52 पत्त्यांच्या या कॅटमध्ये एका राज हा बिन मिशांचा का दाखवलेला असतो? त्याचं कारण नेमकं काय आहे? असा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. चला तर, या प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेऊ. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
52 पत्त्यांच्या कॅटमध्ये इस्पिक, किल्वर, बदाम आणि चौकट या चिन्हांची प्रत्येकी 13 पानं असतात. या खेळातील राजा, राणी आणि जोकर यांचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. एका संपूर्ण कॅटमध्ये चार राजे असतात. मात्र, या चार राजांपैकी तिघांना मिशा आहेत, आणि एकाला मिशी नाही. हा राजा लाल बदामाचा असून ज्याला ‘किंग ऑफ हार्ट’ असेही म्हणतात. या राज्याला मिशी नसण्यामागे कारणही मोठं रंजक आहे.
देवीची मूर्ती व कलश चुकूनही या दिशेला ठेवू नका, जाणून घ्या यामागचे कारण
कोणत्या राजाचं कोणतं कार्ड?
खरं तर, पत्त्याच्या कॅट मधील 52 कार्डांपैकी चार राजांची कार्ड हे इतिहासातील काही महान राजांसंबंधी आहेत, असं म्हटलं जातं. यामध्ये इस्पिक राजा हा प्राचीन काळातील इस्रायलचा राजा डेव्हिड, किल्वर राजा मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट, चौकट राजा हा रोमन राजा सीझर ऑगस्टस, तर बदाम राजा अर्थात ज्याला किंग ऑफ हार्ट्स म्हणतात तो फ्रान्सचा राजा शार्लेमेन असल्याचं म्हटलं जातं.
म्हणून नसते बदामच्या राजाला मिशी
पत्त्यांच्या कॅटमध्ये बदामाच्या राजाला मिशी नसण्यामागे अतिशय रंजक कारण आहे. असं म्हणतात की, सुरुवातीला या सर्व राजांना मिशा होत्या; पण ज्यावेळी हे पत्ते पुन्हा डिझाईन करण्यात आले तेव्हा डिझायनर हा ‘किंग ऑफ हार्ट’ म्हणजेच लाल बदामाच्या राजाला मिशी काढण्याचे विसरला. विशेष म्हणजे यानंतरही ही चूक सुधारली गेली नाही. त्यावेळेपासून लाल बदामाच्या पानाचा राजा बिनमिशीचाच आहे. आता ती चूक न सुधारण्याचे कारणही सांगितलं जातं. ते म्हणजे, ‘किंग ऑफ हार्ट’ हा फ्रेंच राजा शार्लेमेनच्या प्रतिमेचा आहे. हा राजा अत्यंत देखणा आणि प्रसिद्ध होता. त्यानं स्वतःच्या मिशा काढल्या होत्या. कार्डमधील बदामाचा राजा हा या राजाची प्रतिमा असल्यानं त्याला मिशा दाखवल्या जात नाही.
दरम्यान, पत्त्याच्या कॅटमधील पानांबाबत अनेक रंजक कथा आहेत. अशीच कथा बदामाच्या राजाला मिशी नसल्याबाबत असून ती सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.