कोरोनासारखं लक्षण, मात्र होती हृदयाची गंभीर समस्या; वेळीच उपचारामुळे वाचले तरुणाचे प्राण

कोरोनासारखं लक्षण, मात्र होती हृदयाची गंभीर समस्या; वेळीच उपचारामुळे वाचले तरुणाचे प्राण

या रुग्णाच्या हृदयाच्या (heart) समस्येचं वेळीच निदान झालं नसतं तर परिस्थिती गंभीर होऊन मृत्यूचा धोकाही त्याला होता.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : 26 वर्षांचा राहुल रामचंद्रन. गेल्या सहा महिन्यांपासून त्याला श्वास घेताना त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत काहीच फरक पडत नव्हता. अचानक त्रास वाढू लागल्याने त्याला दम लागायला सुरुवात झाली होती. साधारणतः कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने घाबरून त्याच्या कुटुंबाने त्याला जुलै महिन्यात मिरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि चाचण्यांमध्ये त्याच्या हृदयामध्ये समस्या असल्याचं दिसून आलं.

राहुलला अँओरटिक अँन्युरिझम हा हृदयाचा आजार होता. यामध्ये हृदयाकडून अन्य अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये फुगवटा आला होता आणि त्याच्याजवळ असलेली झडप निकामी झाली होती.

रुग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव म्हणाले की, ‘‘हृदयाच्या धमनीचा तीव्र आजार हा तरुणांमध्ये क्वचितच आढळून येतो. हृदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये दोष होता. यामुळे शरीरातील अन्य अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. यामुळे हृदयाची पम्पिंग क्षमता खूपच कमी झाली होती. अशा परिस्थितीत अनेकदा धमनी फुटल्यामुळे छातीत रक्तस्त्राव झाल्यामुळे अचानक मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. हे लक्षात घेऊन तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा - आता नवं आव्हान! कोरोना लशीच्या एका डोसमध्येही व्हायरसला हरवणं अशक्य

राहुलवर वॉल्व्ह रिप्लेसमेंट आणि एओर्टिक रूट रिप्लेसमेंट सर्जरी ही गुंतागुंतीची अशी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.

"ही हृदयविकाराची एक जटिल शस्त्रक्रिया आहे. यात कृत्रिम वॉल्व्ह आणि कृत्रिम रक्तवाहिनीद्वारे एओर्टा नावाची रक्तवाहिनी बदलली जाते. या शस्त्रक्रियेत महाधमनीचा आणि झडपेचा भाग काढून टाकण्यात येतो आणि त्याजागी नवीन झडप बसवली जाते. शस्त्रक्रियेनंतर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं", असंही डॉ. भालेराव म्हणाले.

हे वाचा - वारंवार लघवीला का होते? समजून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

शस्त्रक्रियेनंतर राहुलच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला आता घरी सोडण्यात आलं आहे.

"हृदयाचा आजार असल्याचे निदान झाल्याने खूप घाबरून गेलो होतो. पण डॉक्टरांनी धीर दिल्याने मनातील भीती दूर झाली. आज फक्त डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे मला नव्याने आयुष्य मिळालं आहे", असं म्हणत रुग्ण राहुलने डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

Published by: Priya Lad
First published: August 31, 2020, 9:48 PM IST

ताज्या बातम्या