मुंबई, 19 नोव्हेंबर : 2020 वर्ष प्रत्येकासाठी वाईट ठरलं. या वर्षात जगभरात कोरोनाव्हायरसनं (coronavirus) थैमान घातलं. कित्येकांना या आजारानं विळखा घातला आणि कित्येकांचा बळी घेतला. ज्यांना कोरोनाव्हायरस झाला नाही, त्यांच्यावरही याचा परिणाम झाला. कारण कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. कित्येक महिने लोकांना घरात बसून राहावं लागलं, नोकऱ्या गेल्या, आर्थिक चणचण निर्माण झाली. त्यामुळे कधी एकदाचं हे 2020 वर्ष सरतं असं प्रत्येकाला झालं आहे. मात्र ज्या 2021 वर्षाची आपण वाट पाहत आहोत त्या वर्षातही नवं संकट आ वासून उभं आहे. 2020 पेक्षाही 2021 वर्ष महाभयंकर असणार अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
2020 मध्ये कोरोनाव्हायरस तर 2021 मध्ये उपासमारीची (hunger) समस्या अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) फूड प्रोग्राम (WFP) संस्थेला या वर्षी नोबेल पुरस्कार दिला गेला. ही गोष्ट खरं तर या गोष्टीचा संकेत आहे की, पुढील वर्षी 2021 मध्ये या संस्थेला आणखीन कठीण आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. एकीकडे अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे तर पुढील वर्षी वाढत्या महासाथीच्या स्थितीत उपासमारीची समस्या अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार या एप्रिलमध्ये 13.5 कोटी लोक भुकेले होते आणि या वर्षीच्या अखेरीस आणखीन 13 कोटी लोक उपाशी राहतील.
जगातील बड्या देशांकडून एखाद्या मोठ्या संकटाची दखल घेतली गेली नाही तर एक भयानक संकट आपल्यासमोर उभं राहील, असा इशारा WFP चे प्रमुख डेव्हिड बिस्ले यांनी दिला आहे. बिस्ले यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या वर्षी covid-19 चा उद्रेक होत असताना त्वरित या दिशेने पावलं उचलली गेली पाहिजेत. मात्र त्यावर अद्याप काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणूनच उपासमार ही एक महासाथ बनणार आहे. काही देशांनी पॅकेजेस आणि कर्जमाफी सारख्या उपाययोजना करून या वर्षी उपासमारीची समस्या थोडी कमी करण्यात यश मिळवलं आहे. पण आता 2021 मध्ये हे संकट आणखीन मोठे होणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण covid-19 मुळे पुढील कुठल्या भयानक संकटांना सामोरे जाणार आहोत आणि कुठली कठीण परिस्थिती आपल्यासमोर येणार आहे याचा अंदाज आपण लावू शकतो.
हे वाचा - फक्त 30 सेकंदातच कोरोनाव्हायरसचा नाश करतो MOUTHWASH; संशोधकांचा दावा
बिस्ले यांच्या म्हणण्यानुसार या वर्षी देशाच्या निधीत काहीशी रक्कम होती. मात्र या साथीच्या आजारामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी पैशाचं संकट उभं राहील. तसंच कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये आर्थिक पेचप्रसंगाचं संकट ओढावेल. म्हणूनच covid-19 च्या पुढील लहरींमुळे पुन्हा लॉकडाऊन आणि शटडाऊनचा सामना करणार्या देशांना विशेष जागरूक राहावं लागणार आहे. कोरोना विषाणूंमुळे विस्थापन, बेरोजगारी आणि दारिद्र्य वाढल्यामुळे सुमारे 36 देशांमध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी डब्ल्यूएफपीकडे पुरेसे पैसे असणं गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक अर्थव्यवस्था ही अत्यंत सावकाश वेगानं सुधारणार आहे. तसंच जागतिक मंदीची दुसरी लाट पुढच्या वर्षी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 2021 मध्ये अनेक देशांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे आणि ती परिस्थिती अतिशय भीषण असेल.
जरी covid-19 ची लस आली तरी ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूपच वेळ लागणार आहे. तसंच प्रत्येक देशाला ती विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे तितका पैसा असणंही गरजेचं आहे. म्हणूनच अत्यंत गरीब देशांना या सर्व गोष्टी खूपच कठीण जाणार आहेत.
हे वाचा - बिकनी मॉडेलच्या हॉट फोटोवर पोप फ्रान्सिस यांचं LIKE; सोशल मीडियावर उडाली खळबळ
पुढील दीड वर्षात ज्याप्रकारे अन्नाचे संकट उद्भवणार आहे, त्यानुसार वर्ल्ड फूड प्रोग्रामला पुढच्या वर्षी उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी पाच अब्ज डॉलर्स आणि संस्थेने जागतिक कार्यक्रम चालवण्यासाठी आणखी दहा अब्ज डॉलरची आवश्यकता असेल. त्यासाठी निधी जमवावा लागेल.या महासाथीच्या काळात ज्यांनी अब्जावधींची कमाई केली असे उद्योगपती देणगीदार म्हणून या मिशनमध्ये सामील होतील, अशी आशा बिस्ले यांनी व्यक्त केली आहे. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर प्रत्येक जण या संस्थेला भेट देण्याची इच्छा ठेवत असल्याचंही बिस्ले यांनी सांगितलं.