स्पॅनिश फ्लू, कॅन्सर आणि दोनदा कोरोना; सर्वांना पुरून उरल्या 102 वर्षांच्या आजी

स्पॅनिश फ्लू, कॅन्सर आणि दोनदा कोरोना; सर्वांना पुरून उरल्या 102 वर्षांच्या आजी

या आजींनी कोरोना महासाथीआधी (coronavirus), स्पॅनिश फ्लूच्या (spanish flu) महासाथीचाही सामना केला आहे. कोरोना, कॅन्सर (cacner) असे शब्द ऐकले तरी मनात धडकी भरते. मात्र या 102 वर्षांच्या आजींनी (102 year old woman) त्यावरही मात केली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 03 डिसेंबर : आधी स्पॅनिश फ्लू (spanish flu), मग कॅन्सर (cancer), त्यानंतर कोरोनाव्हायरस (coronavirus) आणि पुन्हा कोरोनाव्हायरस... फक्त वाचूनच आपल्याला मोठा धक्का बसला. मात्र या सर्वांवर मात केली आहे, ती 102 वर्षांच्या आजींनी.  साधा सर्दी, खोकला, ताप आला तरी आपल्याला जीव नकोसा होतो आणि एखादा मोठा आजार झाला तर मग पायाखालची जमीनच घसरते. त्याच्याशी लढणं तर दूरच त्याआधीच कित्येक जण जगण्याची आशाच सोडतात. आता आपलं मरण अटळ आहे, असं बहुतेकांना वाटतं. अगदी तरुणांच्या मनातही अशी भीती असते. मात्र या  102 वर्षांच्या आजींच्या हिमतीला दाद द्यायला हवी. त्यांनी आधी दोन आजार आणि त्यानंतर दोनदा कोरोनालाही आपल्यावर भारी पडू दिलं नाही.

जगभरात ज्याठिकाणी सर्वाधिक कोरोनाची प्रकरणं आहेत त्याच अमेरिकेतील या आजी. अँजेलिना फ्रिडमॅन (Angelina Friedman) असं त्यांचं नाव.  मार्च 2020 मध्ये त्यांना कोरोना असल्याचं निदान झालं. त्यांचं वयही जास्त त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक होता. मात्र अँजेलिना यांनी कोरोनाशी लढा दिला आणि त्यांनी त्यावर मात केलीच. 20 एप्रिलला त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली.

अँजेलिना आपलं आयुष्य छानपणे जगू लागल्या आणि पुन्हा त्यांना कोरोनानं आपल्या विळख्यात घेतलं. ऑक्टोबरमध्ये त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले. जिथे अगदी तरुणांनाही एकदा कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची काय अवस्था होते आहे, हे आपण पाहत आहोत. अशात शंभरी पार अँजेलिना यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्यानं तर जगण्याची आशाच सोडली असती. मात्र अँजेलिनानं दुसऱ्यांदाही कोरोनाला हरवलं. 17 नोव्हेंबरला त्यांचा रिपोर्ट निगिटेव्ह आला आहे.

हे वाचा - कोरोनावर मात म्हणजे लढा संपला नव्हे; त्यापेक्षाही भयंकर POST COVID COMPLICATION

कोरोना महासाथीआधी अँजेलिना यांनी स्पॅनिश फ्लूच्या महासाथीचाही सामना केला आहे. त्यावेळी अगदी बाळ असतानाही त्यांनी आजाराला आपल्यावर भारी पडू दिलं नाही. सीएनएनच्या रिपोर्टनुसार 1918 साली त्यांचा जन्म झाला, ज्यावेळी स्पॅनिश फ्लूचा उद्रेक झाला होता. त्यांचं कुटुंब इटलीहून न्यूयॉर्कला जहाजातून प्रवास करत होतं, तेव्हा जहाजातच त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचा त्यादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या दोन बहिणींनी त्यांचा सांभाळ केला. त्या अमेरिकेतील ब्रुकलिनमध्ये राहू लागल्या. लग्नानंतर त्यांना आणि त्यांच्या पतीलाही कॅन्सर झाला. त्या कॅन्सरमधूनदेखील बऱ्या झाल्या आणि ज्या वयात कोरोनाचा सर्वाधिक धोका होता त्या वयातही त्यांनी कोरोनाला आपल्यासमोर नमायला भाग पाडलं.

हे वाचा - खूशखबर! यूकेपाठोपाठ भारतातही लवकरच कोरोना लशीला मंजुरी; AIIMSने दिली मोठी माहिती

अँजेलिना यांना नीट ऐकू येत नाही, त्यांना नीट दिसतही नाही. अशा परिस्थितीतही त्यांनी भयंकर अशा आजारांना नमवलं आणि आयुष्य आनंदानं जगत आहेत. इच्छा असेल तर काहीही शक्य आहे, हे या आजींनी दाखवून दिलं आहे. या आजी म्हणजे अनेकांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत.

Published by: Priya Lad
First published: December 3, 2020, 4:29 PM IST

ताज्या बातम्या