मी छत्रपती आहे, कसा मॅनेज होईन? आरक्षण आंदोलनाबाबत संभाजीराजेंचा सवाल, भान बाळगण्याचा सल्ला

मी छत्रपती आहे, कसा मॅनेज होईन? आरक्षण आंदोलनाबाबत संभाजीराजेंचा सवाल, भान बाळगण्याचा सल्ला

मी छत्रपती आहे. मी कसा मॅनेज होईन? असा सवाल करत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना सामाजिक परिस्थितीचं भान बाळगणं गरजेचं आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 27 जून : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन उभं करणारे कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठा समाजातील समन्वयकांसोबत हितगुज (Discussion) करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोल्हापूरमधील भवानी मंडपात दोन दिवस ही संवादाची प्रक्रिया पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील तमाम नेते आणि समन्वयक (Maratha leaders and coordinators) या हितगुज कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सर्वांनी एकत्रितपणे कायदेशीर बाबींचा (Legal aspects) विचार करून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणं गरजेचं असल्याचं यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय.

मराठा आरक्षणासाठी दोन आंदोलनं झाल्यावर संभाजीराजेंनी समाजातील सर्व घटकांना एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं चित्र दिसत आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, ही केवळ आपल्या एकट्याची भूमिका नसून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचीदेखील तीच भूमिका होती, असं ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं, हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचं ध्येय आहे असं सांगत हे आंदोलन मॅनेज असल्याच्या चर्चांनाही त्यांनी उत्तर दिलं. मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईल, असा सवाल करतानाच त्यांनी सर्वांना परिस्थितीचं भान बाळगण्याचाही सल्ला दिला.

स्टंटबाजीला विरोध

ज्यावेळी मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय आला, त्यावेळी वातावरण तणावपूर्ण न करता शांततेची भूमिका आपण घेतली, असं ते म्हणाले. त्यावेळी सगळेजण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले होते. मात्र मूळ मुद्द्यावर कुणीच बोलत नव्हतं, याकडं लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आरक्षण मिळवण्यासाठी वातावरणात तणाव निर्माण करण्याची किंवा स्टंटबाजी करण्याची गरज नसून कायदेशीर मार्गाने आणि सनदशीर पद्धतीने हे काम पूर्णत्वाला नेणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - नदीचे पाणी वाहत असलेल्या पुलावरुन कोल्हापूरकरांचा जीवघेणा प्रवास,धक्कादायक VIDEO

मोर्चे काढा, पण परिस्थिती पाहा

कोल्हापुरात काढण्यात आलेल्या ठोक मोर्चावरही त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आंदोलनं करा, मोर्चे काढा, पण आजूबाजूची परिस्थितीही बघा, असं आवाहन त्यांनी मोर्चेकऱ्यांना केलं. देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गर्दी न करता आणि कोरोनाबाबतच्या नियमांचं कुठलंही उल्लंघन न करता आपला लढा चालू ठेवण्याचं मोठं आव्हान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - ‘श्वास’ चित्रपटातील हा चिमुकला आठवतोय का? पाहा तो सध्या काय करतोय

पुढील धोरण

दोन दिवस मराठा समाजाच्या सर्व समन्वयकांसोबत चर्चा केल्यानंतर आपल्या आंदोलनाची पुढची दिशा संभाजीराजे छत्रपती जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यात छत्रपतींनी उभारलेला हा लढा पुढील काळात लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. आता संभाजीराजे काय भूमिका जाहीर करतात आणि मराठा आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्या रिव्हिव्ह पिटीशन आणि क्युरेटिव्ह पिटीशन असे दोन कायदेशीर मार्ग उपलब्ध असल्याचं सांगत याव्यतिरिक्त इतर काही मार्गांचाही विचार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Published by: desk news
First published: June 27, 2021, 6:18 PM IST

ताज्या बातम्या