Home /News /kolhapur /

जयंत पाटलांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रात खरंच दंगल-अराजकता माजणार?

जयंत पाटलांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रात खरंच दंगल-अराजकता माजणार?

राज्यात अराजकता माजविण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.

  ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 20 एप्रिल : महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गोपनीय अहवालाचा उल्लेख करत राज्यात 3 मे नंतर विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभू शकतो, अशा प्रकारचं विधान केलं आहे. आगामी परिस्थितीला तोंड देण्यासाठी गृह विभाग अलर्ट (Maharashtra Home Ministry on alert) झालं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आगामी परिस्थितीसाठी पोलीसही सज्ज आहेत. अराजकता घडवणाऱ्या दोषींवर कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला असताना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज कोल्हापुरात अशाचप्रकारचं विधान केलं आहे. राज्यात अराजकता माजविण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. "सर्व प्रयत्न झाल्यानंतर आता राज्यात अराजकता माजविण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत. त्यासाठीच आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना सूचित करतोय, असं आम्ही त्यावेळी विधान केलेलं होतं. कारण या राज्यात अराजकता माजावी, दंगल घडावी अशी भावना काही लोकांची आहे. मी त्यांचे नाव घेत नाही. त्या सर्व लोकांपासून खबरदारी घेण्याची आज गरज आहे", असं जयंत पाटील म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काही मुस्लिम संघटना नाराज आहेत. तसेच राज ठाकरेंना त्यांच्या मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या भूमिकेमुळे त्यांना अनेक धमकीचे देखील फोन येत आहेत. मात्र तरीही राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भोंग्यावरुन सुरु असलेलं राजकारण पाहता राज्यातील गृह विभाग सतर्क झालं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून राज्याच्या पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही सध्याच्या या परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या घडामोडी पाहता पोलीस कामालाही लागले आहेत. राज्यात 3 मे नंतर भोंगे लावण्यासाठी पोलिसांची परवानगी लागणार आहे. परवानगी घेतली नाही तर पोलीस कारवाई करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्व सुरळीत व्हावं, अशीच आशा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. (भाजप नेते गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, पोलिसांच्या टीमकडून विविध ठिकाणी शोध सुरू) दरम्यान, राज ठाकरे यांच्या भूमिकेवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. "राज ठाकरे आता अयोध्येला चालले आहेत. ते तिथे जातील. पण ते तिथे नेमके कशासाठी जात आहेत ते माहिती नाही. दर्शनासाठी जात आहेत की भोंगे वाजवायला जात आहेत, याबाबत त्यांचा कार्यक्रम काय ते मला माहिती नाही. पण राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाच्या हातातील बाहुलं बनून काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांची सर्व सुसज्य व्यवस्था तेथील योगी सरकारने केलेली दिसत आहे", अशी टीका जयंत पाटलांनी केली. "आम्ही आमच्या घरात गणपती बसवतो. सर्व टीव्ही चॅनलने ते लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेनं पाहिलंय की आमच्या घरी गणपती बसतो. आमच्या पक्षातील लोकं देवधर्म करतात. त्यावेळी त्याचं दर्शन होतंच. पण आम्ही लोकांपुढे मत मागायला धर्माची भूमिका घेऊन जात नाही. हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. आम्ही सुद्धा हिंदूच आहोत. उलट त्यांच्यापेक्षा आमच्या घरात हिंदू धर्म जास्त कडकपणाने पाळला जात असेल. पण याचा अर्थ आम्ही आमचं हिंदुत्व घेऊन रस्त्यावर फिरावं आणि दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा अशी भूमिका नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की, ठराविक डेसिबलच्या आत तुमच्या भोंग्याचा आवाज असेल त्याला मान्यता आहे. भारतात सर्व मशिदींवरील ठरविलेल्या आवाजाच्या पातळीत जर भोंगे वाजवले गेले तर त्याला विरोध करायचा अधिकार नाही. कारण कोर्टानेच ते ठरवलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये मशिदींवरचे भोंगे बंद आहेत का? ते राज ठाकरेंनी जाऊन बघावं. एखाद्या मशिदीजवळ जाऊन बसावं. तिथले भोंगे किती वेळ चालतात ते बघावं. गुजरात, मध्य प्रदेशमध्येही जावून बघावं. भाजपची ज्या राज्यांमध्ये सत्ता आहे तिथे भोंगे बंद केले नसतील तर महाराष्ट्रात तशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार नाही", असंदेखील जयंत पाटील यावेळी म्हणाले.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Chetan Patil
  First published:

  Tags: Jayant patil, MNS, NCP, Raj Thackeray

  पुढील बातम्या