कोल्हापूर, 04 जून: राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांनीही आपल्याच पक्षाचे असलेले राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनाही या मुद्द्यावरून लक्ष्य केल्याचं दिसलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), निलेश राणे यांच्यानंतर आता खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी संभाजीराजेंवर टीका केली आहे. नारायण राणेंच्या टीकेनंतर संभाजीराजेंनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एकप्रकारचा इशाराच दिला आहे.
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे. — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 4, 2021
संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये इशारा दिला की, छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
नारायण राणेंची टीका
गुरुवारी नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर खोचक अशी टीका केली. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्यानं ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा प्रश्न राणे यांनी काल उपस्थित केला होता. राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी इशारा देणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये संभाजीराजेंनी कोणाचंही नाव न घेता इशारा दिला आहे.
संभाजीराजेंचं FB Live
काल संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींशी फेसबूक लाईव्हच्या (FB Live) माध्यमातून संवाद साधला. शिवराज्याभिषेक दिनासाठी (Shivrajyabhishek Din) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन संभाजीराजेंनी यावेळी केलं आहे. कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालू नका. 'शिवराय मनामनांत - शिवराज्यभिषेक दिन घराघरांत' या भावनेतून घरोघरी शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्याचं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. यावेळी मराठा समाजाच्या (maratha reservation) मागण्यांवरून संभाजीराजे यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. मराठा समाजाला गृहित धरू नका आम्ही भूमिकेवर ठाम आहोत, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- VIDEO: PPE किट घालून रुग्णांच्या वॉर्डमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट'
काय म्हणाले संभाजीराजे...
संभाजीराजे छत्रपती यांनी प्रामुख्यानं शिवप्रेमींनी 6 जूनला रायगडावर शिवप्रेमींची गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची विनंती केली. 2007 पासून आपण सगळ्यांनीच शिवराज्यभिषेक सोहळ्याला उत्सवाचं स्वरुप दिलं आहे. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय उत्सव व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे. पण गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट होती म्हणून उत्सव झाला नाही, पण आपण परंपरा पाळली. गेल्यावर्षी लोकांना मी घरीच राहाण्याची विनंती केली तर लोकांनीही गेल्यावर्षी ऐकलं त्यांचे मी आभार मानतो असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. यंदाची परिस्थितीही तशीच आहे. त्यामुळं 'शिवराय मनामनांत - शिवराज्यभिषेक दिन घराघरांत' या भावनेतून घरीच हा सोहळा साजरा करण्याचं आवाहन शिवप्रेमींना संभाजीराजेंनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation, Narayan rane, Sambhajiraje chhatrapati