कोल्हापुरात 'शुभमंगल कबुल है', बालपणीच्या मित्रांनी घालून दिला अनोखा आदर्श

कोल्हापुरात 'शुभमंगल कबुल है', बालपणीच्या मित्रांनी घालून दिला अनोखा आदर्श

बालपणापासूनचे मित्र... धर्म भिन्न मात्र एकमेकांनाच आयुष्यभराचा जोडीदारक बनवायचं असं त्यांनी ठरवलं... कुटुंबीयांची परवानगीही घेतली... आणि मग काय दोघांचे 'शुभमंगल कबुल' झालेदेखिल...

  • Share this:

कोल्हापूर, 3 एप्रिल : बालपणापासूनचे मित्र... धर्म भिन्न मात्र एकमेकांनाच आयुष्यभराचा जोडीदारक बनवायचं असं त्यांनी ठरवलं... कुटुंबीयांची परवानगीही घेतली... आणि मग काय दोघांचे 'शुभमंगल कबुल' झालेदेखिल... एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी अशी ही घटना कोल्हापुरात प्रत्यक्षात घडली आहे. अनेक बाबतीत वेगळा ठसा उमटवलेल्या कोल्हापुरानं यावेळीही सर्वांसमोर एक असाच आदर्श ठेवलाय.

जगासमोर हा अनोखा आदर्श ठेवणाऱ्या जोडप्याचे नाव आहे सत्यजित यादव आणि मारशा मुजावर. दोघेही कोल्हापुरच्या प्रसिद्ध असलेल्या रंकाळा परिसरात राहणारे. लहानपणापासूनचे मित्र असलेल्या सत्यजित आणि मारशा दोघांनीही उच्चशिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनची ही मैत्री आयुष्यभर राहावी यासाठी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारायचे असे दोघांनी ठरवले. पण दोघांचेही धर्म भिन्न होते. मात्र असं असलं तरी सत्यजित आणि मारशा यांनी ती कधी अडचण वाटलीच नाही. दोघांची मैत्री जुनी असल्यानं त्यांच्यामध्ये धर्माचा अडथळाच निर्माण झाला नाही. दोघांची मनाची तयारी पक्की होती आणि त्यांनी त्यासाठी कुटुंबीयांची रितसर परवानगीदेखिल घेतली. मग काय मुलगा मुलगी आणि त्यांची कुटुंबेही तयार झाल्याने समाजातून त्यांना काही अडचणी येणार नाही हे स्पष्टच होते. मग काय सगळी तयारी झाली आणि पुरोगामी विचारांचा वारसा ज्यांच्याकडून मिळाला त्या खुद्द राजर्षी शाहूंच्या नागरीत हा अनोखा सोहळा संपन्न झाला.

'शुभमंगल कबुल है'

कोल्हापूर नगरीमध्ये संपन्न झालेला हा विवाह सोहळा ठरलादेखिल अत्यंत खास. नवरदेव आणि नवरी दोघे भिन्न धर्मातील असल्याने विवाह सोहळा कशा पद्धतीनं होणार याची सर्वानाच उत्सुकता होती. पण यातही दोन्ही कुटुंबीयांनी अत्यंत समंजसपणे निर्णय घेतला आणि हिंदु तसेच मुस्लीम अशा दोन्ही पद्धतींनी विवाह सोहळा संपन्न झाला. 19 मार्च रोजी सत्यजित आणि मारशा या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. मुस्लीम पद्धतीनं कुबुल है म्हणत तर हिंदु पद्धतीनं अक्षता, सप्तपदी अशा विधिवत पद्धतीनं हा विवाहसोहळा संपन्न झाला. पुढारीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; शेजारील राज्यातून आली मोठी बातमी; पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती!

सत्यजित आणि मारशा दोघांच्याही कुटुंबीयांनी सर्वच धर्म सारखे असून सर्व धर्मांचा आदर असल्याचे सांगितले. त्यामुळेच सत्यजित आणि मारशानंही कुटुंबीयांची परवानगी घेऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. कुटुंबीय आमच्या निर्णयाचे स्वागत करतील याची खात्री असल्याने दुसरे कोणतेही विचार डोक्यात आलेच नाही, असं सत्यजित आणि मारशा यांनी सांगितलं. एकूणच शाहू महाराजाच्या विचारांची संपत्ती लाभलेल्या कोल्हापूरकरांचं यासाठी सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Published by: News18 Desk
First published: April 3, 2021, 7:51 AM IST

ताज्या बातम्या