कोल्हापूर, 24 जुलै: मागील तीन दिवसांपासून कोल्हापरसह (Kolhapur) सांगली आणि कोकणात पावसानं थैमान (Heavy rainfall) घातलं आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे पुल वाहून गेले आहेत. तर बऱ्याच जणांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मागील दोन दिवसांत हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. तर पुराच्या पाण्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. अशा भीषण अवस्थेत कोल्हापूरकरांवर आणखी एक संकट उभं ठाकलं आहे.
पुढील आठवडाभर कोल्हापूरात पिण्याच्या पाण्याची टंचाई (Drinking water shortage) निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण पिण्याचं पाणी पुरवठा करणारी यंत्रणाचं पाण्याखाली गेल्यानं महापालिकेनं पाण्याचा उपसा करणं थांबवलं आहे. परिणामी कोल्हापूरकरांची पाणी ओसरेपर्यंत म्हणजेच किमान पुढील आठवडाभर कोल्हापूरात पिण्याच्या पाण्यासाठी कोल्हापूरकरांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. एककीडे शहराला पुराच्या पाण्यानं वेढा दिला असताना, दुसरीकडे शहरवासीयांची पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-कोल्हापूर महापुराचा फटका रुग्णालयांना; बोटीतून रुग्णांचे स्थलांतर, पाहा VIDEO
कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पंचगंगा आणि भोगावती नदीपात्रात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. पण ही सर्व यंत्रणाचं महापुराच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे महापालिका देखील काहीच करू शकत नाही. 2019 मध्ये देखील आलेल्या पुरामुळे अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तब्बल 22 दिवस शहरासाठी पाणी पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे यावेळी देखील किमान एक आठवडा पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.
असं असलं तरी, दरम्यानच्या काळात महापालिकेच्या वतीनं टँकरद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे आठ टँकर आहेत. आणखी 25 खाजगी टँकरची मदत घेतली जाणार आहे. सांगली, सातारा, मिरजहूनही पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Rain flood