मुंबई, 14 ऑक्टोबर : गेल्या 5 महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. विशेषतः लडाखमध्ये चीननी घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतानी हाणून पाडल्यानंतर तर तो आणखी चवताळला आहे. तेंव्हापासून दोन्ही देशांच्या लष्कराचे उच्चस्तरीय अधिकारी चर्चा करत आहेत. अनेकदा या चर्चांच्या फेऱ्या झाल्यानंतरही त्यावर तोडगा निघताना दिसत नाही. पण एक गोष्ट लक्षात येईल की भारतीय सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर चीननी परत घुसखोरी करण्याची हिम्मत केलेली नाही.
‘लडाखच्या भारत चीन सीमा रेषेवर (LAC) तणाव वाढवण्यामागे चीनचा मोठा कट असून त्यामुळे युद्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण जर युद्ध झालंच तर त्याला जबाबदार चीनच असेल आणि त्याचे परिणामही चीनला भोगावे लागतील,’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नुकताच चीनला इशारा दिला आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतही भारताच्या कोणत्या प्लॅनमुळे चीन आणि पाकिस्तान यांना का धडकी भरली आहे?
हे वाचा-मुजोर चीनला आणखी एक दणका, अरुणाचल प्रदेशसाठी केंद्राचा मोठा निर्णय
काय आहे आपल्या देशाचा BR प्लॅन?
चीन किंवा पाकिस्तानशी युद्ध झालं तर लष्कर आणि वायुसेनाच महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे भारताने BR प्लॅन तयार केला आहे. B म्हणजे भीष्म रणगाडा आणि R म्हणजे राफेल फायटर जेट विमान. लडाखमध्ये 15 ते 17 हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने भीष्म रणगाडे तैनात केले आहेत. चीनच्या T-63 या T-99 रणगाड्यांपेक्षा भारताचे रणगाडे जबरदस्त शक्तिशाली असल्याचंही सैन्यानं सांगितलं आहे. त्यामुळे जर चीननी युद्ध केलं तर त्यांनाच जोरदार चपराक बसेल हे भारताच्या शस्रसिद्धतेमुळे स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे या प्लॅनच्या R भागासाठी भारतीय वायुसेना राफेल फायटर जेट विमानांसह सज्ज आहे. त्यामुळे पाकिस्तान घाबरला असून त्यांचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारतानी राफेल आणल्यावरच त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली होती.
हे वाचा-भारत-चीन सीमेवरचा तणाव कायम, लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेत चीनचं फक्त आश्वासन
भारताचा प्लॅन B पण तयार
हो, भीष्म रणगाडा आणि राफेल व्यतिरिक्त भारतीय सैन्यदलांकडे अनेक आधुनिक शस्रास्र आहेत. त्याचबरोबर गेल्या महिन्यात आपण 10 क्षेपणास्रांच्या यशस्वी चाचण्याकरून आपल्या शत्रूंना युद्धसिद्धतेचा स्पष्ट संकेत दिला आहे. कोणत्याही हिंसेचं उत्तर भारत तितक्याच ताकदीनी देईल हे भारताने स्पष्ट केलं आहे.
चर्चा का अपयशी होत आहेत?
भारत आणि चीनच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत पण त्या यशस्वी झालेल्या नाहीत. चीनचा चालूपणा या चर्चा अपयशी होण्यामागे आहे. लडाखमध्ये हिवाळ्यात प्रचंड बर्फ पडतं ते पडल्यावर घुसखोरी करून भारतीय सैन्याला मागे ढकलण्याचा चीनचा मनसुबा आहे. त्यामुळेच ते चर्चा अपयशी करून हिवाळ्यापर्यंत वेळ काढत आहेत. चीननी गेल्या 15 दिवसांत लडाखमधल्या पेंगाँग तलावाच्या परिसरात आळीपाळीने आपले सैनिक तैनात केले आहेत. भारतानेही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. युद्ध झालं तर भारताचं पारडं जड आहे असं मानलं जातंय.