Home /News /india-china /

अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये चीनचा डाव उघड, या 2 कारणांसाठी भारतासोबत निर्माण केला तणाव

अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये चीनचा डाव उघड, या 2 कारणांसाठी भारतासोबत निर्माण केला तणाव

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबतची योजना तयार केली होती. यात जवानांचा मृत्यू होण्याचीही शक्यता होती हे त्यांना माहिती होतं.

    वॉशिंग्टन 02 डिसेंबर: गेल्या जवळपास वर्षभरापासून भारत आणि चीनच्या सीमेवर (Indo-China Border) तणाव आहे. चीनने (China Government) हा तणाव का निर्माण केला हे आता स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या एका महत्त्वाच्या आयोगाने चीनचा खरा डाव उघड केला आहे. विशिष्ट उद्दीष्ट समोर ठेवून चीन सरकारने जाणीवपूर्वक भारतासोबत तणाव निर्माण केल्याचं या अहवालात म्हटलं आहे. केवळ भारतासोबतच नाही तर जपानसह अनेक देशांसोबतच्या सीमांवर चीनने आक्रमक धोरण स्वीकारत वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लडाख जवळच्या गलवान (Galwan) खोऱ्यात घटनेची हिंसक घटना ही त्याचाच एक प्रकार असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. अमेरिका-चीन आर्थिक आढावा आयोगाच्या अहवालात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबतची योजना तयार केली होती. यात जवानांचा मृत्यू होण्याचीही शक्यता होती हे त्यांना माहिती होतं. मात्र त्यांनी ती योजना तयार करून त्याची अंमलबजावणीही केली. अमेरिकेच्या संसदेसाठी हा रिपोर्ट तयार करण्यात आला होता. गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कराने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. त्यात चिनी लष्कराचेही नुकसान झाले होते. भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून सीमेवर मोठ्या प्रमाणात पायभूत सुविधांचं जाळं निर्माण करायला सुरुवात केली आहे. या निर्माण कार्याला खिळ घालणं आणि अमेरिकेकडे झुकत असलेल्या भारताला इशारा देणं या दोन गोष्टींसाठी चीनने ही खोडी काढल्याचं त्या अहवालात म्हटलेलं आहे. मात्र चीनचे हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत असं मतही या अहवालात नोंदविण्यात आलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या