Home /News /india-china /

चीनला टक्कर द्यायला तय्यार! आधुनिक बेड, हिटर्ससह लडाख सीमेवर उभारलं अत्याधुनिक गाव

चीनला टक्कर द्यायला तय्यार! आधुनिक बेड, हिटर्ससह लडाख सीमेवर उभारलं अत्याधुनिक गाव

नोव्हेंबरनंतर या भागात जोरदार बर्फवृष्टी होते आणि तापमान शून्याखाली 40 अंश एवढं जातं. प्रतिकूल परिस्थितीत मनोबल आणि आरोग्य नीट राहावं यासाठी भारतीय सैनिकांसाठी या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पाहा फोटो आणि VIDEO

    नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : भारत आणि चीन सीमेवर (India - China border) सध्या मोठ्या प्रमाणात तणाव आहे. चीन त्यांचं सैन्य मागे घेण्याची तयारी करत आहे, पण चिनी सैन्याचा भरवसा नाही याचा अनुभव भारताने यापूर्वी अनेकदा घेतला आहे.  त्यामुळे भारतीय लष्करानेदेखील पूर्व लडाखमध्ये मोठी तयारी सुरु केली आहे. हिवाळ्यात प्रचंड थंडी पडते तेव्हाच घुसखोरीची शक्यता लक्षात घेता सीमेवर तैनात सैनिकांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी अत्याधुनिक सोयींचं जणू गावच तिथे वसवलं आहे. हिवाळ्यात या ठिकाणी सैनिकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या असून थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि कायम तैनात राहण्यासाठी आवश्यक ठरतील अशा सर्व सोयी तिथे पुरवण्यात आल्या आहेत. 40 फूट बर्फवृष्टी आणि उणे 40 तापमान लडाखच्या पूर्व भागात चिनी सैन्याबरोबर टक्कर झाली होती त्या ठिकाणी आता कडाक्याची थंडी पडायला सुरुवात होईल. नोव्हेंबरनंतर या भागात जोरदार बर्फवृष्टी होते आणि तापमान शून्याखाली 40 अंश एवढं जातं. अशा प्रतिकूल परिस्थितीत सैनिकांचं आरोग्य आणि मनोधैर्य उत्तम राहावं यासाठी लष्कराने सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या आहेत. भारतीय सैन्याने या संदर्भातील एक व्हिडीओ रिलीज केला असून यामध्ये सैनिकांच्या तुकड्यांसाठी बेड, कपाटं आणि हिटर्सची सुविधा यामध्ये दिसून येत आहे. काही रूम्समध्ये सिंगल बेड दिसून येत असून लिव्हिंग रूममध्ये मोठे बेड ठेवण्यात आले आहेत. या संदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये बांधण्यात आलेल्या सुविधांव्यतिरिक्त सैनिकांना राहण्यासाठी अलीकडेच अत्याधुनिक सोयी, वीज, पाणी, हिटिंग सुविधा, आरोग्य आणि स्वच्छता यासाठी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. सीमेवर सर्वांत पुढे असणाऱ्या सैनिकांसाठी तंबूंमध्ये हिटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेशा नागरी पायाभूत सुविधादेखील तयार करण्यात आल्या आहेत. हिवाळ्यात तैनात असलेल्या सैन्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, भारतीय लष्कराने या क्षेत्रात तैनात असलेल्या सर्व सैनिकांसाठी निवासस्थानांची सुविधा उपलब्ध केल्याचे देखील म्हटले आहे. सैनिकी सुविधेचा एक VIDEO सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे. न्यूज 18 ने याआधी बातमी दिली  होती की हिवाळ्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराने रशियातून तंबू मागवले आहेत. कानपूरमधील दारुगोळा कारखाना हे तंबू आणणार आहे. चीनने पेंगाँग येथे आणि एलएसीवरील संघर्षजन्य ठिकाणी देखील अर्ध स्थायी व्यवस्था उभारली आहे. या भागात आधीच तयार केलेली स्ट्रक्चर उभारण्यासाठी जे कॉन्ट्रक्टर लष्कराला मदत करणार होते तेही लॉकडाउनमुळे उपलब्ध नव्हते. सायबेरिया सारख्या अतिशय थंड ठिकाणी या रशियन तंबूचा आधार घेण्यात येतो तेच या कठिणप्रसंगी सैन्याच्या निवासासाठी महत्त्वाचे ठरले. खूप कालावधीसाठी या वातावरणामध्ये तैनात असल्याने आयटीबीपीच्या जवानांना या वातावरणाची सवय असते. त्यामुळे शंकरपाळी हा उत्तर भारतीय पदार्थ जवानांसाठी तयार करण्यात आला. गव्हाच्या पिठाचं शक्करपारा किंवा आपली शंकरपाळी तेलात तळून साखरेच्या पाकात टाकली जातात. गव्हानी पोट भरतं आणि साखर तुम्हाला शक्ती देते आणि वागवायलाही हलकं असतं असं एका जवानानी सांगितलं.  या गव्हाची आणि साखरेचा शक्करपारा हा पदार्थ सैनिकांसाठी ऊर्जेचा मोठा स्रोत आहे.  दिल्लीतील सैन्य दलाच्या मुख्यालयानेही पुष्टी केली असून  'शक्करपारा' तयार करून सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे.  भारतीय सैनिक उंच भागावर असल्याने या भागात पाण्याची मोठी समस्या आहे. काही फॉरवर्ड पोस्टमध्ये भूगर्भातील स्त्रोतांमधून पाईपने पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चुशूलमधील स्थानिक नागरिक पाणी आणण्यासाठी भारतीय सैनिकांची मदत करत असतात.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: India china, Ladakh

    पुढील बातम्या