Home /News /india-china /

चीन भारताला सर्व बाजूंनी घेरतोय, शरद पवारांनी मोदी सरकारला दिला इशारा!

चीन भारताला सर्व बाजूंनी घेरतोय, शरद पवारांनी मोदी सरकारला दिला इशारा!

माजी संरक्षण मंत्री राहिलेल्या शरद पवार यांनी चीन विषयावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांना बैठकीला बोलावून

    मुंबई 03 सप्टेंबर:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार हे कोरोनाच्या काळातही अतिशय सक्रिय आहेत. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी राज्यातल्या अनेक शहरांना भेटी दिल्या होत्या. आता चीन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांनी मुंबईत तज्ज्ञांना आमंत्रित करून त्यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारला मोलाचा सल्लाही दिला आहे. ट्विट वरून पवारांनी या बैठकीची माहिती दिली आहे. माजी परराष्ट्र सचिव आणि चीन विषयीचे तज्ज्ञ समजले जाणारे विजय गोखले आणि हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांना पवारांनी आपल्या निवासस्थानी चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. चीन विषयाचे तज्ज्ञ असल्याने गोखले यांनी आपले अनुभव सांगत सध्याच्या परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं. तर भूषण गोखले यांनी संरक्षणाची बाजू सांगितली अशी माहिती पवारांनी दिली आहे. तर 1990च्या दशकांमध्ये चीन दौऱ्यात आलेले अनुभव आपण सांगितले असंही पवारांनी म्हटलं आहे. दक्षिण चीन समुद्रात वाढत असलेलं चीनचं वर्चस्व हे गंभीर आहे. त्याच बरोबर श्रीलंका आणि नेपाळच्या धोरणांवरही अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. चीन भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत करत आहे असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारताला घेरण्यासाठी आणि जगभर दबदबा निर्माण करण्यासाठी चीन भारता सभोवतालच्या 12 देशांमध्ये तळ उभारत असल्याची माहिती उघड झाली आहे. अमेरिकेच्या पेंटागॉनने यासंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. Military and Security Developments Involving the People's Republic of China (PRC) 2020' हा अहवाल पेंटागॉनने काँग्रेसला सादर केला आहे. पाकिस्तान, म्यानमार आणि श्रीलंका या भारताला लागून असलेल्या देशांमध्ये चीनने लष्करी तळ बनवले आहेत. तर थायलँड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमीरात, केनिया, सेशल्स, तंजानिया, अंगोला आणि तजाकिस्तानमध्ये लष्करी तळ बनविण्यासाठी चीन तयारी करत आहे. भारतावर वचक ठेवण्याबरोबरच जगभर आपला दबदबा निर्माण करण्यासाठी चीन हे तळ उभारत आहे. त्याचबरोबर समुद्र मार्गावरही वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचंही अमेरिकेने म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sharad pawar

    पुढील बातम्या