नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : लडाख (Ladakh) वरील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) गेल्या नऊ महिन्यांपासून भारत – चीनचं सैन्य एकमेकांच्या समोर उभं होतं. दोन देशांमधील तणाव आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चीनी सैन्य अत्यंत वेगानं LAC वरुन मागं सरकत आहे. चीन आणि भारत यांच्यात झालेल्या सहमतीनुसार चीननं पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन माघार घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसात चीननं या भागातून 200 रणगाडे हटवले असल्याचं वृत्त आहे.
‘पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन सैन्य मागं घेण्याबाबत भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे,’ अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेत दिली होती. या चर्चेमध्ये भारतानं काहीही गमावलं नसल्याचं त्यांनी सांगितले होते. चीनबरोबर झालेल्या सहमतीनंतर दोन्ही देश नियोजनबद्ध पद्धीतीनं आणि परस्परातील समन्वयातून या भागातील सैन्य मागं घेतील, असं सिंह यांनी स्पष्ट केलं होतं.
भारत आणि चीन यांच्या सीमेवर गेल्या नऊ महिन्यांपासून सुरु असलेल्या तणावानंतर हे यश मिळालं आहे. मात्र पूर्व लडाख परिसरातील सैन्याच्या टेहाळणीबाबत अजूनही काही मुद्दे प्रलंबित असून त्यावर दोन्ही देशांमध्ये यापुढेही चर्चा सुरु राहणार आहे.
भारतीय लष्करानं (Indian Army) एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये पँगाँग तलावाच्या परिसरातून चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) तीन रणगाडे आणि भारतीय सैन्याचा एक रणगाडा माघारी फिरताना दिसत आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीचं संक्षिप्त फुटेज देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रणगाडे तसंच सैन्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य मागं घेण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. आता उत्तर किनाऱ्यावरील सैन्य मागं घेण्याची प्रक्रिया राबवली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी व्हावा यासाठी सप्टेंबर 2020 पासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर पहिल्यांदाच सैन्य मागं घेण्याच्या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, India china, Indian army, Ladakh