India China: CDS बिपीन रावत यांच्या अरुणाचल दौऱ्यानंतर सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांनी अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) मधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (Line of Actual Control) लष्करी तळांची पाहणी केली.
इटानगर, 4 जानेवारी: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांनी अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) मधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (Line of Actual Control) लष्करी तळांची पाहणी केली. भारत-चीन (India- China) यांच्यामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दोन दिवसांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. “भारतीय सैनिकांच्या निग्रहाबाबत मी समाधानी आहे. वेळ आली तर कोणतंही आव्हान परतवण्यास आपण सक्षम आहोत’’ असा विश्वास रावत यांनी यावेळी व्यक्त केला.
रावत यांनी अरुणाचल दौऱ्यातील पहिल्या दिवशी दिबांग खोरे, लोहित सेक्टर आणि सुबनसिरी खोरे या प्रमुख भागांचा दौरा केला. सुबनसिरी खोऱ्यात तैनात असलेल्या भारत-तिबेट सिमा पोलीस (ITBP) दलाच्या जवानांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी रावत यांनी सैन्याकडं असलेल्या शस्त्रांची पाहणी केली तसंच त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जनरल रावत यांचा CDS म्हणून एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी अरुणाचल प्रदेशातील लष्करी तळांची पाहणी केली.
लडाखमध्ये (Ladakh) चिनी सैन्यानी केलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन यांच्यामधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सैन्यानं जय्यत तयारी केली आहे. जवळपास 3, 500 किलोमीटर लांबीच्या या परिसरावर आर्मी आणि वायू सेनेच्या माध्यमातून पहारा देण्यात येत आहे. पूर्व लडाखच्या परिसरात मे महिन्यात भारत-चीन यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेतून कोणताही ठोस परिणाम निघालेला नाही.
लडाखमध्ये सध्या दोन्ही देशांचं जवळपास 50 हजार सैन्य तैनात आहे. सहा नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेच्या आठव्या फेरीत तणावाच्या परिसरातून सैन्य मागं घेण्याबाबत चर्चा झाली होती.