Home /News /heatlh /

मासिक पाळीवेळच्या रक्ताचा रंग देतो अनेक आजारांचे संकेत, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मासिक पाळीवेळच्या रक्ताचा रंग देतो अनेक आजारांचे संकेत, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार, दररोज जगभरातील सुमारे 80 लाख महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळीदरम्यान ज्या रंगाचा रक्तस्राव होतो, तो रंग आरोग्याविषयी आणि संभाव्य आजारांबद्दल तुम्हाला सांगत असतो.

नवी दिल्ली, 24 मे :  पीरियड्स (periods) ही महिलांच्या शरीरातील महत्त्वाची नैसर्गिक प्रक्रिया असते. पीरियड्स म्हणजे मासिक पाळी (Menstrual Cycle) महिलांसाठी जेवढी महत्त्वाची तितकीच ती काही जणींसाठी वेदनादायी असते. मासिक पाळीदरम्यान पोटदुखी, पाठदुखी, पाय दुखणं असे अनेक त्रास होतात आणि या त्रासांबद्दल सर्वांना माहीतदेखील आहे. या मासिक पाळीबद्दल काही गोष्टी अशाही आहेत, ज्या कित्येक महिलांना माहिती नाहीत. यातील एक गोष्ट म्हणजे, मासिक पाळीदरम्यानच्या रक्तस्रावाचा रंग (Menstrual Blood Colour) आणि आजार यांचा संबंध. मासिक पाळीदरम्यान ज्या रंगाचा रक्तस्राव होतो, तो रंग आरोग्याविषयी आणि संभाव्य आजारांबद्दल तुम्हाला सांगत असतो. वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार, दररोज जगभरातील सुमारे 80 लाख महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळीवेळी होणाऱ्या रक्तस्रावाचा रंग बॅक्टेरियल इन्फेक्शन (Bacterial Infections), सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजचे (Sexually Transmitted Diseases) संकेत देत असतो. मासिक पाळीतील रक्तस्रावाचा रंगांबद्दल आणि त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल आम्ही माहिती देणार आहोत. अज तकने दिलेल्या एका वृत्तानुसार, आयु हेल्थ हॉस्पिटलच्या (Ayu Health Hospital) एमबीबीएस डॉक्टर अनन्या आर. (MBBS Doctor Ananya R.) यांनी मासिक पाळीतील रक्तस्रावाच्या रंगाबद्दल माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, "मुलीला मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या काही वर्षांत रक्तस्त्रावाचा रंग बदलणं सामान्य बाब आहे. या काळात रक्ताचा रंग लाल ते तपकिरी रंगात बदलू शकतो. मासिक पाळीदरम्यान रक्ताच्या रंगात बदल होऊ शकतो. जसं की, रक्ताचा रंग सुरुवातीला गडद लाल रंगापासून सुरू होतो आणि वयाच्या नंतरच्या टप्प्यावर मासिक पाळीच्या शेवटी रस्टी ब्राउन, तपकिरी रंगापर्यंत जाऊ शकतो. सुरुवातीला, त्याचा रंग तपकिरीदेखील असू शकतो आणि हळूहळू तो लाल रंगात बदलू शकतो." त्या पुढे म्हणाल्या, "जर तुमच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंग नेहमीपेक्षा अधिक फिकट होत चालला असेल. तर ही चिंतेची बाब आहे. काही प्रकरणांमध्ये रक्ताचा रंग गडद जांभळा लालदेखील असू शकतो. ज्या स्त्रियांना त्यांच्या पूर्वायुष्यात फायब्रॉइड्स (Fibroids) किंवा एंडोमेट्रिओसिस (Endometriosis) झालेला असेल, त्यांच्यामध्ये असं होणं सामान्य आहे. ज्या महिलांच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंग गडद लाल असतो त्यांना गर्भधारणेमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो आणि रक्त गोठण्याची समस्यादेखील असते. या रक्त गोठण्याच्या समस्येमुळे गर्भधारणेदरम्यान प्लेसेंटाला हानी पोहोचते. अनेक लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा." मीलन फर्टिलिटी हॉस्पिटल बेंगळुरू (Milan Fertility Hospital Bangalore) येथील डॉक्टर स्नेहा डी. शेट्टी (Dr. Sneha D Shetty) म्हणाल्या, ‘मासिक पाळी स्त्रियांच्या आरोग्याविषयी बरीच माहिती देते. मासिक पाळी किती दिवस चालते, या काळात रक्तस्राव कसा असतो, रक्ताचा रंग आणि त्याची लक्षणं स्त्रीच्या आरोग्याविषयी बरंच काही सांगतात.’ त्या म्हणाल्या, "बहुतेक महिलांना दोन ते पाच दिवस मासिक पाळी येते, पहिल्या दोन ते तीन दिवसांत हलका रक्तस्राव होतो. मासिक पाळीतील रक्ताचा रंग हॉर्मोन अ‍ॅक्टिव्हिटी, मासिक पाळीचा कालावधी, इन्फेक्शन, वैद्यकीय स्थिती यांसारख्या अनेक घटकांची माहिती देत असतो. या घटकांची वेळीच तपासणी करून उपचार घेतल्यास आपल्याला अनेक आजार टाळता येऊ शकतात." गडद लाल रंग मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये रक्ताचा रंग गडद लाल असू शकतो. गडद लाल रंग फायब्रॉइड यूटेरस, गर्भपात, एक्टोपिक प्रेग्नन्सीचे संकेत दर्शवू शकतो. तपकिरी किंवा काळा तपकिरी रंग मासिक पाळीतील रक्त सुरुवातीला गडद लाल रंगाचं असतं आणि हळूहळू ते तपकिरी किंवा काळसर तपकिरी होतं. गर्भाशयाचं लायनिंग हळूहळू शेड झाल्यामुळे असं होऊ शकतं. मासिक पाळीतील रक्ताचा रंग राखाडी, पिवळा, केशरी, हिरवा दिसत असेल किंवा रक्तातून दुर्गंधी येत असेल तर हे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा एसटीडीचं लक्षण असू शकतं. पाळीचा प्रवाह जास्त असणं, गोठलेलं रक्त येणं, मासिक पाळी सात ते आठ दिवसांपेक्षा जास्त काळ येणं, किंवा मासिक पाळी खूप लवकर किंवा खूप उशिरा येणं या परिस्थिती तुमच्यासाठी धोकादायक असू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Woman

पुढील बातम्या