नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : आपल्या अधूनमधून सर्दी (cold), डोकेदुखी (headaches), अंगदुखी (body aches) सारखे आजार होत असतात. बऱ्याचदा आपण डॉक्टरकडं (doctor) न जाता मेडिकलमधून (medicine) गोळ्या घेतो. तर अनेक जण डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी दाखवून औषधं घेतात. पण डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय (prescription) औषध खरेदी करताना एमआरपी (MRP) आणि एक्सपायरी डेटशिवाय (expiry date) गोळ्यांच्या पॅकेटच्या मागच्या बाजूवरील इतर माहिती वाचणारे खूपच कमी लोक असतील. सर्व औषधांवर त्या औषधाची एक्सपायरी डेट आणि किंमत असते. पण याशिवाय आणखीही एक महत्त्वाची माहिती औषधांच्या पॅकेटवर असते.
आपण मेडिकलमधून औषधे खरेदी करत असताना कधी बारकाईने पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल, की या गोळ्यांच्या पॅकेटवर पाठीमागच्या बाजूला एक लाल रंगाची रेघ असते. त्या रेघेवर Rx, NRx आणि XRx अशी इंग्रजी अक्षरे लिहिलेली असतात. या अक्षरांच्या नक्की अर्थ काय आहे हे आपण जाणून घेऊया. याबाबतचं वृत्त 'झी न्यूज हिंदी' नं दिलं आहे.
Rx
काही औषधांच्या पॅकेटवर Rx असं लिहिलेलं असतं. Rx चा अर्थ आहे की हे डॉक्टरांनी दिलेलं औषध आहे. हे औषध त्याच रुग्णाला दिलं जातं, ज्याला डॉक्टरांनी आपल्या चिट्ठीवर लिहून दिलं आहे. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत. मात्र, ही सामान्य औषधे आहेत.
NRx
ही औषधं उदासीनता, चिंता किंवा कोणत्याही वाईट व्यसनांवर मात करण्यासाठी वापरली जातात. ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येत नाहीत किंवा ती प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाऊ शकत नाहीत. अंमली पदार्थांचा वापर करून तयार केलेल्या औषधांसंबंधी लायसन्स असणाऱ्या फार्मसिस्टनाच ही औषधं विकता येतात.
XRx
मानसिक विकारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांवर XRx लिहिलेलं असतं. कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून ही औषधं प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाऊ शकत नाहीत. तसंच औषध विकल्यावर त्याला प्रिस्क्रिप्शनची प्रत 2 वर्षे ठेवावी लागते.
लाल रेघ
अँटिबायोटिक औषधांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेघ (Red line) असते. ही औषधं तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये. या औषधांसाठी डॉक्टरने चिठ्ठी दिली असेल तरच केमिस्टना ही औषधं विकण्याची परवानगी आहे. अँटिबायोटिक औषधांचा चुकीचा उपयोग होऊ नये यासाठी त्या औषधांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेषा असते. त्यामुळे ही औषधे इतर औषधांपासून वेगळी असतात हे लक्षात येतं. लाल रेघ देण्याचा उद्देश टीबी, मलेरिया, एचआयव्ही आदी गंभीर आजारांसाठी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय किंवा थेट केमिस्टकडून अॅंटीबायोटिकच्या खरेदी-विक्रीला रोखणं हा आहे.
या प्राथमिक बाबी माहिती झाल्यानंतर पुढच्यावेळी तुम्हीही औषधं विकत घेताना त्यावरीच तारीख आणि इतर चिन्ह बघून विकत घ्याल आणि सुरक्षित रहाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Medicine