मराठी बातम्या /बातम्या /heatlh /गर्भातल्या भ्रूणाचं लिंग कधी आणि कसं ठरतं? मुलगा की मुलगी कसं कळतं? वाचा सविस्तर

गर्भातल्या भ्रूणाचं लिंग कधी आणि कसं ठरतं? मुलगा की मुलगी कसं कळतं? वाचा सविस्तर

Photo: AFP_Relaxnews / vgajic / Istock.com

Photo: AFP_Relaxnews / vgajic / Istock.com

Boy or Girl : मुलगा असो किंवा मुलगी, भ्रूणाच्या वाढीची सुरुवात सारखीच असते. नंतर त्यांच्या जननेन्द्रियाच्या विकासानंतर त्यात फरक होतो.

  नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : जेव्हा एखादी स्त्री गरोदर (Pregnant) असते तेव्हा सगळ्यांना एकच उत्सुकता असते ती म्हणजे मुलगा (Boy) होणार की मुलगी (Girl)? बाळाचा जन्म होईपर्यंत 9 महिन्यांच्या कालावधीत ते आईच्या गर्भाशयात (Uterus) असतं. स्त्री बीज आणि पुरुषाचे शुक्राणू यांचं फलन होऊन भ्रूण (Embryo) तयार होण्यापासून ते पूर्ण वाढ झालेलं बाळ जन्माला येईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत उत्कंठावर्धक असते. एखाद्या छोट्याशा दाण्याच्या आकारापासून सुरुवात होऊन नऊ महिन्यात भ्रूण पूर्ण विकसित होतो. हात, पाय, नाक, डोळे, अन्य अवयव असे टप्प्याटप्प्याने विकसित होतात. होणारं बाळ मुलगा की मुलगी (Girl or Boy) हे या प्रक्रियेमध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर निश्चित होतं.

  गर्भाचं लिंग ठरवण्यात जीन्स, हॉर्मोन्स आणि शरीरातले इतर अनेक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. दोन एक्स (X-Chromosoms) गुणसूत्रं असतील तर गर्भाचं लिंग स्त्री आणि एक एक्स आणि एक वाय गुणसूत्रांचं (XY-Chromosoms) मिलन झालं असेल तर गर्भाचं लिंग पुरुष असतं. मुलगा असो किंवा मुलगी, भ्रूणाच्या वाढीची सुरुवात सारखीच असते. नंतर त्यांच्या जननेन्द्रियाच्या विकासानंतर त्यात फरक होतो. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

  वाचा : तुमचे पाय दुखत असतील तर हे 4 घरगुती उपाय करून पाहा, लगेच मिळेल आराम

  गर्भाचं लिंग ठरण्याची प्रक्रिया कधी सुरू होते? तर ही प्रक्रिया गर्भारपणाच्या सहाव्या किंवा सातव्या आठवड्यात सुरू होते. या वेळेपर्यंत गर्भाची लांबी एक सेंटिमीटरपर्यंत वाढलेली असते. त्यानंतर त्यात अंडकोष (Testis) किंवा अंडाशय (Overies) विकसित होण्याची प्रक्रिया सुरू होते. अंडकोष विकसित होतो आणि वृषण टेस्टोस्टेरॉन तयार करतात. हे हॉर्मोन्स पुरुषांच्या अवयवांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात. या हॉर्मोन्सशिवाय, व्हॅस डेफरेन्स, सेमिनल व्हेसिकल्स आणि प्रोस्टेट ग्रंथी इत्यादी घटक पुरुष अवयवांच्या विकासास कारणीभूत ठरतात. या सोबतच लिंगाचाही विकास होत राहतो आणि गर्भ मुलगा असल्याचं निश्चित होतं.

  वाचा : आठवड्यातून दोनदा नियमित मासे खाण्यानं मेंदूशी संबंधित आजार राहतात दूर; नवं संशोधन

  त्याचप्रमाणे, गर्भ स्त्रीचा असतो तेव्हा अंडाशय विकसित होतात. इथून अॅस्ट्रॅडिओल नावाचं हॉर्मोन बाहेर पडतं. मुलांच्या शारीरिक विकासात टेस्टोस्टेरॉन जी भूमिका बजावते, तीच भूमिका मुलींमध्ये अॅस्ट्रॅडिओलची असते. या हॉर्मोनमुळे मुलींच्या शरीरामधली फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय आणि योनी विकसित होतात. यामुळे गर्भ मुलीचा असल्याचं निश्चित होतं. साधारण गर्भधारणेच्या सहाव्या किंवा सातव्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरू होते. ती सर्व जननेन्द्रियांचा भाग पूर्णपणे विकसित झाल्यानंतर थांबते. यामध्ये हॉर्मोन्स किंवा अन्य घटकांमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्यास जननेन्द्रियांच्या विकासात अडचणी येतात. व्यवस्थित वाढ झाल्यानंतर गर्भाच्या इतर अवयवांची योग्य पद्धतीनं वाढ होऊन बाळाचा जन्म होतो तेव्हा ते मुलगी आहे की मुलगा हे कळते.

  First published:
  top videos

   Tags: Health, Parents and child, Pregnancy