मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Cancer Treatment : कॅन्सर ट्रिटमेंटचा खरंच खूप त्रास होतो का? कसा होतो कर्करोगावर उपचार?

Cancer Treatment : कॅन्सर ट्रिटमेंटचा खरंच खूप त्रास होतो का? कसा होतो कर्करोगावर उपचार?

(प्रतीकात्मक फोटो- shutterstock.com)

(प्रतीकात्मक फोटो- shutterstock.com)

कॅन्सर हा गंभीर आजार असला तरी त्याचं पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास आणि तातडीनं उपचार सुरू झाल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो.

मुंबई, 30 जुलै : कॅन्सर (Cancer) अर्थात कर्करोग हा जीवघेणा आणि गंभीर आजार आहे. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अनियंत्रित वजन, आनुवंशिकता आदी कारणं कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याचं सांगितलं जातं. कॅन्सर म्हणजे मृत्यू (Death) असं समीकरण सर्वसामान्यपणे जनमानसात रुजल्याचं दिसून येतं; मात्र कॅन्सर हा गंभीर आजार असला तरी त्याचं पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास आणि तातडीनं उपचार सुरू झाल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो. शरीराच्या एखाद्या भागातल्या पेशींची अनियंत्रित वाढ होऊन किंवा त्यांचं अति प्रमाणात विभाजन होऊन ट्यूमर (Tumor) अर्थात गाठीची निर्मिती होते; मात्र सर्वच प्रकारचे ट्यूमर कॅन्सरचे नसतात. ट्यूमर तयार झाल्यानंतर तो ज्या भागात आहे, त्या भागातल्या पेशींना इजा झाली असेल तर असा ट्यूमर कॅन्सरचा मानला जातो. तसंच सर्वसामान्यपणे या पेशी शरीरातल्या लिव्हर, किडनी, मेंदू आदी अवयवांपर्यंत पोहोचल्या असतील तर असा कॅन्सर मेटास्टॅटिक (Metastatic) मानला जातो. पहिल्या टप्प्यात कॅन्सरच्या किंवा संबंधित अवयवातल्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास मेटास्टेसिस झाल्याचं दिसून येतं. कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत; पण भारतात ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer), सर्व्हायकल कॅन्सर (Cervical Cancer) आणि माउथ अर्थात तोंडाचा कॅन्सर (Mouth Cancer) हे प्रमुख प्रकार अधिक प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त ब्लड कॅन्सर, लंग अर्थात फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाणही दिसून येते. कॅन्सरवर उपचारांसाठी अनेक पद्धतींचा वापर केला जातो. प्रत्येक कॅन्सर हा युनिक (Unique) असल्यानं उपचारांची पद्धतदेखील निरनिराळी असते. रुग्णाची प्रकृती, कॅन्सरची स्थिती, अन्य आजार आदी गोष्टींचा विचार करून डॉक्टर कॅन्सरवरच्या उपचारांची (Treatment) दिशा ठरवतात. काही रुग्णांवर उपचारांसाठी एकाच पद्धतीचा वापर केला जातो, तर काही रुग्णांना कॉम्बिनेशन ट्रीटमेंट दिली जाते. कॅन्सरच्या उपचार पद्धतीत सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांचा प्रामुख्याने समावेश असतो. कॅन्सरवरच्या उपचार पद्धतींबाबत सविस्तर जाणून घेऊ या. कॅन्सरवरच्या उपचार पद्धतींचे प्रकार एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होतो, तेव्हा हा आजार बरा करण्यासाठी त्या व्यक्तीला विविध प्रकारचे उपचार घ्यावे लागतात. सर्वसामान्यपणे कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरवर 7 पद्धतींनी उपचार केले जाऊ शकतात. त्यात सर्जरी आणि केमोथेरपी हे उपचार सर्वश्रुत आहेत. प्रत्येक कॅन्सर हा वैद्यकीयदृष्ट्या युनिक मानला जातो. त्यामुळे उपचार पद्धतीचा वापरदेखील त्या अनुषंगाने होतो. सर्जरी, केमोथेरपीव्यतिरिक्त बायोमार्कर टेस्टिंग, रेडिएशन थेरपी, इम्युनो थेरपी, हॉर्मोन थेरपी, हायपरथेर्मिया, फोटो डायनामिक थेरपी, स्टेम सेल्स थेरपी आणि टार्गेटेड थेरपी या उपचारपद्धतींचा वापर कॅन्सर या आजारावर केला जातो. हे वाचा - Types of Cancer : सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात आला तर होऊ शकतो कॅन्सरवर इलाज, कर्करोगाचे प्रकार लक्षात घ्या सर्जरी (Surgery) : सर्जरी अर्थात शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णाच्या शरीरातला कॅन्सरस ट्यूमर काढून टाकला जातो. ही लोकल स्वरूपाची ट्रिटमेंट आहे. शरीराच्या विशिष्ट भागात असलेली कॅन्सरची गाठ काढून टाकण्यासाठी सर्जरी केली जाते. ब्रेस्ट, प्रोस्टेट यांसारख्या कॅन्सरच्या प्रकारात सर्जरी ही उपचारपद्धती सर्वसामान्य समजली जाते; मात्र ब्रेन आणि हार्टच्या कॅन्सरमध्ये हा उपचार काहीसा जोखमीचा ठरतो. कॅन्सरची गाठ पूर्णपणे काढून टाकणं, शरीराच्या विशिष्ट भागाला पूर्णतः हानी पोहोचणार असेल तर अंशतः गाठ काढणं, सॉफ्ट टिश्यूजवर दबाव आणणारा ट्यूमर काढून टाकून कॅन्सरची लक्षणं कमी करणं ही सर्जरीची उद्दिष्टं असतात. केमोथेरपी (Chemotherapy) : या उपचार पद्धतीबद्दल अनेकांच्या मनात खूप गैरसमज असतात. अर्थात या उपचाराचे साइडइफेक्ट्स हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. केमोथेरपीमुळे शरीरातल्या कॅन्सर पेशी आणि काही निरोगी पेशीही नष्ट होतात. केमोथेरपीमुळं कर्करोगाच्या पेशींची अनियंत्रित वाढ थांबते किंवा त्यांची कार्य करण्याची गती मंदावते. रिकरन्स टाळण्यासाठी आणि लक्षणं नियंत्रणात आणण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो. रेडिएशन थेरपी (Radiation Therapy) : कॅन्सरवरच्या उपचारपद्धतींत रेडिएशन थेरपी ही सर्वांत परिणामकारक मानली जाते. या थेरपीत कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी किंवा ट्यूमरचा आकार लहान करण्यासाठी उच्च रेडिएशनचा डोस दिला जातो. यात एक्सटर्नल आणि इंटर्नल रेडिएशन असे दोन प्रकार असतात; मात्र शरीराच्या विविध भागांत एकाचवेळी रेडिएशन देणं शक्य नसल्यानं मेटास्टॅटिक कॅन्सरमध्ये ही पद्धत वापरली जात नाही. इम्युनोथेरपी (Immunotherapy) : इम्युनोथेरपी किंवा इम्युनो-ऑन्कॉलॉजी ही मूलतः रुग्णाच्या रोगप्रतिकारशक्तीचा वापर करून कॅन्सरशी लढण्यासाठी वापरली जाते. ही एक बायोलॉजिकल (Biological) थेरपी आहे. सध्याच्या काळात सुमारे 20 टक्के रुग्ण या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असल्याचं दिसून आलं आहे; मात्र ही थेरपी काहीशी महागडी आहे. हॉर्मोन थेरपी (Hormone Therapy) : ही एक सर्वसामान्य उपचार पद्धती असून, हॉर्मोनशी संबंधित कॅन्सरच्या उपचारांसाठी या थेरपीचा वापर होतो. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, तर पुरुषांमधल्या प्रोस्टेट कॅन्सरवर उपचारासाठी ही थेरपी वापरतात. हॉर्मोन्सवर परिणाम होत नसलेल्या कॅन्सरमध्ये ही थेरपी क्वचितच वापरली जाते. रुग्णातली लक्षणं वाढू त्रास होऊ नये म्हणून मेंटेनन्स थेरपी म्हणूनही डॉक्टर ही थेरपी देऊ शकतात. बायोमार्कर टेस्टिंग (Biomarker Testing) : ही एक प्रकारची तपासणी पद्धत आहे. यात जनुकं, प्रोटीन्स आणि घटकांची तपासणी करून कॅन्सरविषयी अधिक माहिती मिळवली जाते. या टेस्टिंगमुळे डॉक्टरांना रुग्णावरच्या उपचारांची दिशा ठरवण्यास मदत होते. हे वाचा - Type 1 diabetes symptoms: डायबेटिस झाला आहे कसं ओळखावं? या लक्षणांकडे दुर्लक्ष नको कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टर रुग्णातल्या या आजाराची लक्षणं कमी करण्यासाठी विविध उपचारपद्धतींचा स्वतंत्र किंवा एकत्रित अवलंब करतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास निश्चित मदत होते.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Cancer, Health, Lifestyle

पुढील बातम्या