मुंबई, 28 ऑक्टोबर : धूम्रपान असो अथवा मद्यपान, कोणतंही व्यसन आरोग्यासाठी घातक असतं. या गोष्टीची जाणीव असतानादेखील काही लोक धूम्रपान किंवा मद्यपान करतात. अतिप्रमाणात मद्यपान केल्याने नशा चढते. नशा उतरवण्यासाठी आणि चक्कर येऊ नये या साठी काहीजण उलट्या करतात. यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो. तसेच काही लोक नशा चढल्यानंतर झोपण्याचा प्रयत्न करतात. अतिमद्यपान केल्यानंतर जाणीवपूर्वक उलट्या करणं किंवा झोपण्याचा प्रयत्न करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अर्थात यामागे नेमकी कोणती आहेत ते जाणून घेऊया.
जास्त प्रमाणात दारू प्यायल्यानंतर लोक उलट्या करतात. खरं तर मद्यपान केल्यानंतर उलटी होणं हा कोणताही आजार नाही. आपल्या शरीरातली संरक्षक यंत्रणा अल्कोहोलला विष मानून ते शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर शरीरात अल्कोहोल गेल्यानंतर लिव्हर सर्वांत प्रथम त्याचे अॅसिटअल्डिहाइड या विषारी रसायनात रुपांतर करतं. हे रसायन आरोग्यासाठी हानीकारक मानलं जातं. यानंतर लिव्हर अॅसिटअल्डिहाइडचं रुपांतर अॅसिटेटमध्ये करतं. त्यानंतर ते पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइडच्या स्वरूपातून शरीराबाहेर पडतं. लिव्हरची स्वतःची एक क्षमता असते. जर अॅसिटअल्डिहाइडचं प्रमाण निश्चित प्रमाणापेक्षा जास्त झालं तर शरीर अतिरिक्त रसायन उलटीवाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. तसंच अल्कोहोल आपल्या पोटातील एन्झाइम सिस्टीमच्या संपर्कात आल्याने विषारी रसायनं मोठ्या प्रमाणात तयार होतात. ही रसायनं शरीराबाहेर टाकण्यासाठी उलटया होणं हे नैसर्गिक मानलं जातं.
अतिप्रमाणात मद्यपान केलेल्या लोकांना उलट्या केल्यावर दिलासा मिळेल, नशा लवकर उतरेल असं वाटतं. पण ही बाब पूर्णतः बरोबर नाही. कारण उलटी केल्यानंतर पोटात असलेलं अल्कोहोल बाहेर पडतं, पण रक्तात मिसळलेल्या अल्कोहोलचं प्रमाण कमी होत नाही. अल्कोहोल शरीरात गेल्यानंतर काही प्रमाणात अल्कोहोलचं लिव्हरच्या माध्यमातून पचन होऊन ते युरिनद्वारे बाहेर पडतं. तसंच काही प्रमाणात अल्कोहोल रक्तात मिसळतं. यामुळे मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला नशा जाणवते. ही प्रक्रिया फार वेगात होते. त्यामुळे उलट्या केल्यानंतर काहीसा दिलासा मिळत असला तरी अल्कोहोलमुळे आलेली नशा उतरत नाही.
मद्यपान केल्यानंतर जाणूनबुजून उलट्या करण्याचा प्रयत्न कदापि करू नये. कारण यामुळे पोटाच्या स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते. तसंच मद्यपान केल्यानंतर झोपण्यापूर्वी सामान्य वाटेपर्यंत थोडावेळ वाट पाहावी. त्यानंतर झोपण्यापूर्वी किमान एक ग्लास पाणी प्यावं. यामुळे अल्कोहोलमुळे शरीरात होणारं डिहायड्रेशन टाळता येतं. तसंच रात्रीच्यावेळी पुन्हा पाणी पिण्यासाठी झोपताना जवळ पाण्याची बाटली भरून ठेवावी. अनेकदा खूप तहान लागल्याने लोक झोपेतून जागे होतात, पण आळस आल्याने पाणी पिणं टाळतात. तसंच झोपताना जवळ एखादी बादली, कचऱ्याचा डबा किंवा मोठं भांडं ठेवावं. उलटी होत असेल तर अशावेळी या गोष्टीचा वापर करावा. तसंच मद्यपान केल्यानंतर कोणतंही औषध सेवन करू नये.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अतिमद्यपान केल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात आणि त्यामुळे डोपामाइन, हिस्टामाइन, सिरोटोनिनसारखी रसायनं रिलीज होतात. या रसायनांमुळे डायफ्रॅम आणि पोटाचे स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे उलट्या होतात आणि शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्ती मिळाल्याने समाधान जाणवतं. उलट्या झाल्यानंतर शरीरात एंडोरफिन्स नावाचं केमिकल रिलीज होतं. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त तणाव आणि त्रास जाणवतो.
काही लोक अतिमद्यपान केल्यानंतर झोपण्याचा प्रयत्न करतात. मद्यपान केल्यानंतर लवकर झोप येणं स्वाभाविक असलं, तरी ते चांगलं नसतं. झोपल्यानंतर रक्तात अल्कोहोलची पातळी वाढते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जास्त नशा असताना झोपण्याचा प्रयत्न करणं जीवघेणं ठरू शकतं. वास्तविक अल्कोहोलच्या प्रभावामुळे श्वास घेण्यास प्रतिसाद देणारी शरीरातील यंत्रणा मंदावते. झोपेतही उलट्या होण्याची शक्यता असते. अशावेळी गळा चोकअप होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
रात्री मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादी पेनकिलर घेऊ शकता. तसंच भरपूर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची शक्यता निर्माण होत नाही. तसंच व्हिटॅमिन आणि मिनरल्सयुक्त अनेक स्पोर्ट्स ड्रिंक उपलब्ध आहेत. तीदेखील तुम्ही पिऊ शकता. थोडीशी ब्लॅक कॉफी घेऊ शकता. डोकेदुखीचा त्रास जास्त जाणवत असेल तर बर्फानं शेकू शकता. काही लोक उतारा म्हणून अल्प प्रमाणात दारू प्यायल्यास हॅंगओव्हर कमी होतो, असा सल्ला देतात. पण हा सल्ला चुकीचा आहे. असा प्रकार कटाक्षाने टाळावा. याशिवाय कमी तेलकट आणि तिखट पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे देखील तुम्हाला चांगला फरक जाणवेल आणि आराम वाटेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol