मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Digital Prime Time Special: तणावमुक्त आयुष्यासाठीची 'जपानी थेरेपी'

Digital Prime Time Special: तणावमुक्त आयुष्यासाठीची 'जपानी थेरेपी'

जपानमध्ये लोकप्रिय होतेय जंगल थेरपी (संग्रहित)

जपानमध्ये लोकप्रिय होतेय जंगल थेरपी (संग्रहित)

Digital Prime Time Special: आयुष्य तणावमुक्त करण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची एक खास जपानी पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India
 • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 31 ऑगस्ट: आपण सध्या वावरतोय ते 21व्या शतकात. आपल्या आजूबाजूला आधुनिकीकरणाचे वारे वाहतायत. जग अजून गतिमान होतंय. आणि या गतिमान युगात माणूसही गतिमान बनलाय. यात सगळ्यात पुढे आहेत ते विशी पंचविशीतले... तिशीतले तरुण. करिअर, उद्योगधंदा, नोकरी, स्पर्धापरीक्षा अशा असंख्य आव्हानांचा सामना हा तरुण वर्ग करतोय. त्यात कुणी यशाची शिखरं गाठतो तर कुणाच्या पदरी येतं ते अपयश. तर काहीजण यशापयाशाच्या मधल्या दोरीवर आयुष्याचा तोल सांभाळत वाटचाल करत राहतात. पण आजच्या काळात यशस्वी, अपयशी आणि मधल्यामध्ये लटकत असलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर तणाव नावाचा साप डुख धरुन बसलेला आढळतो. आणि त्याचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतोय.

यशस्वी तरुणाला कामाचा तणाव... अपयशी तरुण काम नाही या तणावात तर मधल्या वर्गातले यशापयशाची गणितं मांडून चिंतेच्या गर्तेत अडकलेले. या वयातील फार कमी असे मिळतील जे आहे त्यात समाधानी आहेत. पण हा आकडा फार कमी दिसेल. कारण आज प्रत्येक जण मोठी झेप घेण्याची स्वप्न पाहतोय. पण ती साध्य करताना त्याला बऱ्याच खस्ता खाव्या लागतायत. आणि त्यातून ताणतणाव, डिप्रेशन यांसारखे विखारी विकार वाढत चालले आहेत. आणि ती एक मोठी समस्या बनली आहे.

तणाव अनेक आजाराचं कारण

मानसिक ताणतणाव हा अनेक आजारांचं मूळ असल्याचं समोर येतंय. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत तणावाचं नियोजन करणं महत्वाचं आहे. बदलत्या काळात आपण या तणावाचे गुलाम बनत चाललो आहोत हे कधी कधी लक्षातच येत नाही. कॉर्पोरेट क्षेत्रात वावरणाऱ्या अनेकांच्या आठवड्यातले 5-6 दिवस कामातच जातात. वर्कलोड, डेडलाईन्स, नवे प्रोजेक्ट्स, सिनियर्सचा प्रेशर, मिटिंग्स अशा कित्येक गोष्टींचा ताण या दिवसात असतोच. मग उरलेले एक दोन दिवस ही मंडळी आराम करण्यात घालवतात. बाहेर फिरायला जाण्यासाठी, फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी मग स्पेशल सुट्टी काढा. त्यासाठी सिनियर्सना विनवण्या करा. मनासारखं नाही झालं तर पुन्हा त्रास. मग ऑफिसमध्ये, बाहेर आणि घरातही चिडचिड. या सगळ्याचा परिणाम अशा तरुणांच्या आरोग्यावर होतो.

ताण घालवण्यासाठी जपानी टेकनिक

जपान हा एक विकसित देश आहे. तंत्रज्ञानात हा देश आपल्या भारतापेक्षाही कितीतरी पुढे आहे. पण इथेही कामाच्या तणावामुळे अनेक तरुणांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. त्यासाठी इथे एका वेगळ्या थेरेपीची मदत घेतली जात आहे. ही थेरेपी आहे जंगल थेरेपी. जपानच्या टोकियोशेजारी असलेल्या एका जंगलात तणावमुक्त होण्यासाठी जवळपास संपूर्ण जपानमधून मंडळी इथं येतात. टोकियोच नव्हे तर जपानच्या अनेक भागात अशा संस्था आहेत की ज्या अनेक तरुणांना आणि इतर वयोगटातल्या नागरिकांना जंगल थेरेपीतून तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी मदत करत आहेत. या थेरेपीमुळे लोक खुल्या वातावरणात मोकळा श्वास घेतात... ध्यानधारणा करतं तर कुणी संगीत ऐकून मानसिक समाधान मिळवतात. तिथे असं मानलं जातं की सकाळी उठून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं हे देखील एखाद्या थेरेपीप्रमाणे काम करतं. आयुष्य तणावमुक्त करण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची ही जपानी पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

तुम्ही काय करु शकता?

 • मुंबईसारख्या शहरातील तरुणांनी महिन्यातून किमान एकदा जवळपास एखाद्या ठिकाणी ट्रेकिंगला जाण्यास हरकत नाही.
 • शहराच्या मध्यवर्ती भागात संजय गांधी नॅशनल पार्क आहे. शहरापासून काही तासांवर शांत समुद्रकिनारे आहेत. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता. सोबत कुटुंबातील मंडळी किंवा समविचारी मित्र असतील तर वेळही चांगला जाईल.
 • अनेक जण गावातून शहरात नोकरीनिमित्त आलेले असतात. अशांनी जर अधूनमधून गावी फेरफटका मारला तर तेवढाच मोकळेपणा मिळेल.
 • सुट्टीदिवशी शक्य असल्यास ऑफिसची कामं किंवा ऑफिसचे विषय बाजूला ठेवा
 • ईमेल्स, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा अशा सोशल साईट्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा
 • प्रेरणादायी, विनोदी विषयांवरची, प्रवासवर्णनं असलेली पुस्तकं वाचा
 • आपला आवडता छंद जोपासा. चित्र काढा, एखादं वाद्य वाजवा, चित्रपट पाहा
 • नियमित व्यायामाची सवय ठेवा, मेडिटेशन करा आणि नियमितपणे मैदानी खेळ खेळा
 • आहारात सकस अन्नाचा समावेश करा. फास्ट फूड, जंक फूडपासून शक्य तितके लांब राहण्याचा प्रयत्न करा.
 • सर्वात महत्वाचं नेहमी प्रसन्न राहा... कारण प्रसन्न राहिल्यानं सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होते.

एकूणच 25व्या वर्षानंतर अनेक गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे त्यासाठी आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं गरजेचं आहे. त्यामुळे याच वयात कामाचं आणि ताणाचं योग्य नियोजन केल्यास जपानी लोकांप्रमाणेच तुम्हीही आनंदी आयुष्य जगू शकता.

First published:

Tags: Digital prime time, Health