मुंबई, 12 जानेवारी : महाराष्ट्रातील अनेक भागांत सध्या कडाक्याची थंडी पडत असून सकाळी अनेकांना ब्लँकेटमधून बाहेरच यावंसं वाटत नाही. थंडीपासून वाचण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जातात. त्यातही रात्री झोपताना डोक्यावरून पांघरूण घेऊन अनेकजण झोपतात. पण तुम्हाला माहिती आहे का, डोक्यावरून पांघरूण घेऊन म्हणजेच स्वतःचा चेहरा पूर्णपणे झाकून झोपणं हे धोकादायक आहे. ‘एबीपी न्यूज’ने याबाबत वृत्त दिलंय.
कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी तुम्ही सर्व प्रकारच्या युक्त्या करीत असाल. अनेकजण तर दिवसा उबदार कपडे परिधान करतात, व रात्री झोपताना थंडीपासून वाचण्यासाठी डोक्यावर पांघरूण घेऊन झोपतात. अशी झोप घेतल्यानं छान वाटतं, उबदारपणा मिळतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण हिवाळ्यात चेहरा झाकून झोपल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, तसेच तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यावरही वाईट परिणाम होतो. चला तर, हिवाळ्यात चेहरा झाकून झोपल्यानं तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, हे जाणून घेऊ.
त्वचा काळी पडणं
हिवाळ्यात जेव्हा तुम्ही चेहरा झाकून झोपता, तेव्हा ब्लँकेटमधून ऑक्सिजन आत येत नाही, आणि आतमधील अशुद्ध हवा बाहेर जात नाही. ब्लँकेटमध्ये साचणाऱ्या अशुद्ध हवेमुळे तुमच्या त्वचेचा रंग फिका होऊ लागतो. त्यामुळेच हिवाळ्यात अनेकांची त्वचा काळी पडते.
पिंपल्स आणि मुरुमांची समस्या
चेहरा झाकून झोपल्यानं रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. रक्ताभिसरण योग्य होत नसल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुमांची समस्या निर्माण होते. या शिवाय चेहरा झाकून झोपल्यानं व्यवस्थित श्वास घेता येत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
फुफ्फुसांवर होतो परिणाम
तज्ज्ञांच्या मते, पायापासून डोक्यापर्यंत शरीर झाकून झोपल्यानं फुफ्फुसांवर सर्वांत वाईट परिणाम होतो. जर एखाद्या व्यक्तीनं महिनाभर दररोज 6 ते 8 तास असं केलं, तर त्याच फुफ्फुस आकुंचन पावू लागतं.
ऑक्सिजनची कमतरता
चेहरा झाकून झोपल्यानं ऑक्सिजनची कमतरता जाणवते, व त्यामुळे गुदमरल्यासारखे होते. झोप पूर्ण होत नाही. अशा स्थितीत दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटत नाही. एकाग्रतेमध्ये समस्या येते. दैनंदिन कामात रस राहत नाही.
डोकेदुखीची समस्या
चेहरा झाकून झोपल्यानं मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे डोकेदुखी, मळमळ आणि इतर समस्या उद्भवतात. ही समस्या 1 ते 2 दिवसांत बरी होते. परंतु पुन्हापुन्हा ही समस्या उद्भवत असल्यास ते आरोग्यासाठी चांगलं नाही.
हे वाचा - रात्री स्वेटर घालून झोपणे पडेल महागात! झोपेतच जडतील हे आजार
झोपताना डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची तुम्हालाही सवय असेल, किंवा कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी तुम्ही असं करीत असाल, तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुमच्या आरोग्यावर या सवयीचा वाईट परिणाम होण्याचा धोका आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Winter, Winter session