मुंबई, 4 सप्टेंबर : अवघ्या 40 व्या वर्षी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा (Sidharth Shukla) हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू (Death) झाल्यानं तरुणपिढीत हृदयविकाराचा (Heart Disease) धोका वाढल्याच्या विषयावर गांभीर्यानं चर्चा सुरू झाली आहे. आपल्या देशात दररोज हृदय विकाराच्या झटक्यानं 40 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील 900 लोकांचा मृत्यू होतो. यामागचे नेमके कारण काय याबाबत उहापोह होत असून, तज्ज्ञांच्या मते जीवनशैली (Lifestyle) हेच या मागचं मुख्य कारण आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत काही सल्ले दिले आहेत.
डॉक्टरांच्या मते, आशियातील भारतीयांमध्ये (Asian Indian) हृदय विकाराचा धोका इतरांपेक्षा चौपट अधिक असतो. भारतात हृदयाशी संबधित विकार होण्याचं वय 53 वर्षे आहे. तेच वय युरोपमध्ये 63 वर्षे आहे. भारतात 40 शीच्या आता हृदयविकाराने (Heart Attack) मरण पावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्टर तपन घोष यांच्या मते, चाळीशीच्या आत हृदय विकाराचा झटका येण्याचा संबंध टाईप ए पर्सनॅलिटीशीही (Type A Personality) आहे. अशी पर्सनॅलिटी असणारे लोक नेहमी आपणच पहिले आलो पाहिजे असा अट्टहास करणारे असतात. त्यांच्यामध्ये हृदय विकाराचा धोका अधिक असते. सिद्धार्थ शुक्लाही बिग बॉसचा (Big Boss) विजेता होता. त्यामुळे त्याची पर्सनलिटी ए टाईपची होती. अशा लोकांना अचानक तीव्र स्वरूपाचा हृदय विकाराचा झटका येऊ शकतो आणि 20 टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका येऊन जागीच त्यांचा मृत्यू होतो. यामागचे महत्त्वाचे कारण असते कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease). अशा आजारांसाठी कारणीभूत ठरतात मधुमेह, धुम्रपान आणि बिघडलेली जीवनशैली हे घटक.
आजकाल आयटी क्षेत्रात (IT) काम करणाऱ्या लोकांमध्ये अशा घटना अधिक आढळतात. कारण या क्षेत्रातील अनेक लोक दुसऱ्या देशाच्या वेळेनुसार काम करतात. आपल्याकडे जेव्हा झोपायची वेळ असते तेव्हा हे लोक काम करत असतात आणि आपण जागे होते तेव्हा हे लोक झोपतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला उनही लागत नाही. परिणामी त्यांच्या शरीरात ‘व्हिटामिन डी’चीही (Vitamin D) मोठी कमतरता असते.
अनेकदा लोक रात्री उशिरा घरी येतात, त्यामुळे त्यांचे जेवण उशिरा होतं. जेवण झाल्यावर लोक लगेच झोपतात आणि सकाळी उठून कामावर जातात. अशी जीवनशैली (Life style) अतिशय धोकादायक आहे. कमी वयात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू होण्यामागे ही जीवनशैलीही कारणीभूत आहे. त्यामुळे यात बदल करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. झोप कमी होणे, व्यायामाचा अभाव, आहारात पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो. त्यामुळे आपली जीवनशैली बदलली (Change Lifestyle) पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात. लवकर झोपणे, लवकर उठणे, व्यायाम करणे, संतुलित आहार घेणं अशी जीवनशैली आत्मसात केली तर हृदय विकाराचा धोका टाळता येईल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heart Attack