Home /News /heatlh /

कॅन्सरची 'संजीवनी' मिळाली, पाहा असे घातक आजार ज्यांच्यावर लस ठरली 'चमत्कार'!

कॅन्सरची 'संजीवनी' मिळाली, पाहा असे घातक आजार ज्यांच्यावर लस ठरली 'चमत्कार'!

कॅन्सर अर्थात कर्करोगावर (Cancer) इलाज शोधणाऱ्या शास्त्रज्ञांना नुकतंच मोठं आश्चर्यकारक यश मिळालं आहे. कोणे एके काळी असाध्य आणि जीवघेणे ठरणारे आजार औषध आणि लसींद्वारे नष्ट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशाच काही आजारांविषयी आणि त्यांच्या उपचारांविषयी जाणून घेऊ या.

पुढे वाचा ...
मुंबई, 9 जून : कॅन्सर अर्थात कर्करोगावर (Cancer) इलाज शोधणाऱ्या शास्त्रज्ञांना नुकतंच मोठं आश्चर्यकारक यश मिळालं आहे. गुदद्वाराचा कॅन्सर (Anal cancer) असलेल्या 18 रुग्णांना अमेरिकेत चाचणी म्हणून एक औषध दिलं गेलं. सुमारे सहा महिन्यांच्या वापरानंतर, या रुग्णांमध्ये कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्याचं दिसून आलं. औषधांच्या माध्यमातून कॅन्सरचं पूर्णपणे निर्मूलन होण्याची ही पहिलीच घटना आहे. या औषधामुळे कॅन्सर पूर्ण बरा होण्याची आशा निर्माण झाली आहे. तथापि, कोणे एके काळी असाध्य आणि जीवघेणे ठरणारे आजार औषध आणि लसींद्वारे नष्ट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशाच काही आजारांविषयी आणि त्यांच्या उपचारांविषयी जाणून घेऊ या. देवी : देवी अर्थात स्मॉलपॉक्स (Smallpox) हा मानवाला ज्ञात असलेल्या सर्वांत घातक आजारांपैकी एक आजार (Disease) होता. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओच्या (WHO) म्हणण्यानुसार, हा आजार किमान 3000 वर्षांपासून अस्तित्वात होता. तो संपुष्टात येण्यापूर्वी त्यानं लाखो जणांचे प्राण घेतले होते. स्मॉलपॉक्स हा व्हॅरिओला विषाणूमुळे (Virus) होणारा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू ऑर्थोपॉक्स कुळातला आहे. `डब्ल्यूएचओ`नं 1967 मध्ये स्मॉलपॉक्स निर्मूलन योजना सुरू केली. 1980मध्ये स्मॉलपॉक्स हा असा पहिला संसर्गजन्य रोग ठरला, की तो संपुष्टात आल्याचं अधिकृतपणे घोषित केलं गेलं. 1796 मध्ये एडवर्ड जेनरने या आजाराविरुद्ध लस (Vaccine) विकसित केली. ही विकसित झालेली पहिली यशस्वी लस ठरली. स्मॉलपॉक्सचा शेवटचा ज्ञात नैसर्गिक रुग्ण 1977 मध्ये सोमालियात (Somalia) आढळला होता. कोविड -19 कोविड-19 (Covid-19) हा विषाणू नसून तो SARS-CoV-2 या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. 2019 मध्ये चीनमधल्या वुहान (Wuhan) येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर जगभरात या विषाणूमुळं खळबळ उडाली. यामुळे लाखो जणांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. लॉकडाउनमुळे जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. सुदैवानं हा आजार रोखण्यासाठी आता बाजारात अनेक लशी उपलब्ध झाल्या आहेत. अ‍ॅस्ट्राझेनेका, फायझर, मॉडर्ना, भारत बायोटेक यांसारख्या काही कंपन्यांनी कोरोनाप्रतिबंधक लस तयार केली आहे. त्यामुळे या विषाणूची तीव्रता आटोक्यात ठेवण्यास मदत झाली आहे; मात्र नवनव्या व्हॅरिएंट्समुळे (Variant) हा आजार पुन्हा जीवघेणा ठरण्याचा धोका आहे. मंकीपॉक्स गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीची दहशत कायम असताना आता मंकीपॉक्स (Monkeypox) हा रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा रोग वन्यप्राण्यांद्वारे पसरतो आणि तो सामान्यतः आफ्रिकेत (Africa) दिसून येतो; मात्र या वेळी या आजाराचे रुग्ण युरोपसह जगाच्या सर्व भागांत आढळून येत आहेत. विशेष म्हणजे, यात असे अनेक रुग्ण आहेत, जे कधीही आफ्रिकेत गेलेले नाहीत किंवा तिथल्या कोणत्याही नागरिकाच्या संपर्कात आलेले नाहीत. मंकीपॉक्स विषाणू स्मॉलपॉक्स कुळातला आहे. परंतु, तो स्मॉलपॉक्सपेक्षा कमी प्राणघातक आहे. त्याचे रुग्ण साधारणपणे पाच दिवस ते तीन आठवड्यांच्या काळात आपोआप बरे होतात. परंतु, 10पैकी एका व्यक्तीसाठी हा रोग धोकादायक ठरू शकतो. हा रोग झालेल्या रुग्णांना स्मॉलपॉक्सच्या अनेक लशींपैकी एक लस दिली जाते. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. तसंच या रोगावर उपचारासाठी अनेक अ‍ॅंटीव्हायरल औषधंसुद्धा विकसित केली जात आहेत. त्यामुळे हा रोग महामारीचं रूप धारण करण्याची शक्यता कमी आहे. पोलिओ पोलिओ किंवा पोलियोमायलायटिस हा आजार पोलिओ (Polio) विषाणूंमुळे होतो. हा आजार झालेल्या रुग्णांना अपंगत्व आणि मृत्यूचा धोका असतो. एकदा हा आजार झाला तर त्यावर कोणताही इलाज नाही. परंतु, या आजाराविरुद्ध लशी विकसित झाल्या असल्याने, या आजाराचा धोका 99 टक्क्यांपर्यंत संपु्ष्टात आला आहे. पोलिओ विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो आणि पाठीच्या कण्याला (Spinal cord) संसर्ग होतो. त्यामुळे पक्षाघात होतो. सौम्य संसर्ग असलेले रुग्ण बरे होतात. परंतु, पोलिओच्या सुमारे 1 टक्का रुग्णांमध्ये रुग्णांना कायमचं अपंगत्व येतं. स्वस्त आणि प्रभावी लशींमुळे भारतासह बहुतेकशा देशांमध्ये पोलिओचं उच्चाटन झालं आहे. केवळ नायजेरिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अजूनही पोलिओचे नियमित रुग्ण आढळतात. उपलब्ध माहितीनुसार, पोलिओची पहिली प्रभावी लस 1952 मध्ये अमेरिकी शास्त्रज्ञ जोनास साल्क यांनी विकसित केली होती. 1957 मध्ये मानवावर तिचा पहिला प्रयोग केला गेला. येलो फीव्हर येलो फीव्हर (Yellow Fever) हा असा आजार आहे, की ज्यावर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. परंतु, अशा अनेक प्रभावी लशी आहेत, ज्या एका आठवड्यात 95 टक्क्यांपर्यंत रोगप्रतिकारशक्ती निर्माण करू शकतात. `डब्ल्यूएचओ`च्या मते, लशीचा एक डोस या आजारापासून आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकतो. येलो फीव्हरमध्ये त्वचा पिवळी पडते. त्याचा यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. त्यामुळे ताप, कावीळ, भूक न लागणं, थंडी वाजून येणं, स्नायू दुखणं आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणं दिसतात. एकदा हा आजार माणसाला झाला तर तो बरा होणं जवळपास अशक्य असतं. एका अंदाजानुसार, हा आजार झालेल्या 100 टक्के जणांचा मृत्यू होतो. डब्ल्यूएचओच्या मते, 2021 मध्ये आफ्रिकेतल्या 9 देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. रेबीज रेबीज (Rabies) हा एक संसर्गजन्य आजार असून, तो लशीद्वारे टाळता येऊ शकतो. परंतु, एकदा संसर्ग पसरला तर उपचार परिणामकारक ठरत नाहीत. यामुळे बहुतांश रुग्णांचा मृत्यू होतो. रेबीज हा प्राणी, त्यातही विशेषतः भटकी कुत्री चावल्याने किंवा त्यांच्या लाळेशी संपर्क आल्याने पसरतो. `डब्ल्यूएचओ`च्या मते, हा आजार 150हून अधिक देशांमध्ये आढळतो. उत्तेजित होणं, अवास्तव भीती, चिंता, गोंधळ, पाण्याची भीती वाटणं, तोंडातून फेस किंवा लाळ येणं ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. या आजारावर लस उपलब्ध आहे. कुत्रा (Dog) चावल्यास किंवा त्याचं नख लागल्यानंतर लस घेणं आवश्यक आहे. यासाठी अनेक लशी घ्याव्या लागतात. एड्स एचआयव्ही (HIV) म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा एड्स (AIDS) होण्यास कारणीभूत ठरतो. हा प्रामुख्यानं लैंगिक आजार आहे. याचे विषाणू माणसाच्या रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करतात. एचआयव्हीवर उपचार केले गेले नाहीत, तर एड्स होण्याचा धोका असतो. परंतु, एचआयव्ही झाला म्हणजे रुग्णाचं जीवन जग संपलं, असं नाही. एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला एड्सच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी काही वर्षं लागू शकतात. डब्ल्यूएचओ, सीडीसी यांसारख्या संस्थांच्या माहितीनुसार, 1981 पासून या आजाराचे रुग्ण सापडू लागले. तेव्हापासून जगभरात 7 कोटींहून अधिक नागरिक या आजाराच्या विळख्यात सापडले आणि सुमारे 3.5 कोटी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अर्ध-सहारा आफ्रिकेत दर 25 पैकी एक प्रौढ व्यक्ती एचव्हीआय बाधित आहे. एचआयव्ही एड्सवर कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाहीत. परंतु, औषधांच्या मदतीनं आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
First published:

Tags: Cancer

पुढील बातम्या