भोपाळ, 19 मे : एकिकडे कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर अनेकांना त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. तर आता दुसरीकडे मात्र कोरोना लशीचा चांगला असा परिणाम पाहायला मिळतो आहे. कोरोनापासून बचावासाठी घेण्यात आलेल्या लशीमुळे दहा वर्षांपासून असलेला आजार गायब झाला, असा दावा एका व्यक्तीने केला आहे. मध्य प्रदेशमधील एका शिक्षकाने कोरोना लस घेतल्यानंतर आपल्याला दहा वर्षांपासून असलेल्या समस्येतून मुक्तता झाल्याचा दावा केला आहे (10 year old disease disappeared after corona vaccination).
बडवानीतल्या भंवरगढच्या माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले काशीराम कनोजे. गेल्या दहा वर्षापासून त्यांच्या पायांच्या तळव्यांना खाज येत होती, जळजळ होत होती. यामुळे त्यांना उठणं, बसणं, झोपणंही अशक्य झालं होतं. जमिनीवर ते पाय टेकवूच शकत नव्हते. शाळेतही ते खुर्चीवर पाय ठेवून बसायचे.
हे वाचा - 'घरी जाऊन कोरोना लस देऊ शकाल का? तर आम्ही BMC ला परवानगी देतो' - मुंबई हायकोर्ट
दहा वर्षांत त्यांनी कित्येक डॉक्टर केले, कित्येक रुग्णालयं ते फिरले. पण काहीच फरक पडला नाही. समस्या कमी होणं तर दूर उलट अधिकच वाढत गेली. पाय जमिनीवर घासल्यानंतर किंवा तेलाने मालिश केल्यानंतर त्यांना तात्पुरता आराम मिळायचा. पण पुन्हा परिस्थिती जैसे थेच.
आज तकच्या रिपोर्टनुसार, 11 एप्रिलला जामानिया उपआरोग्य केंद्रात त्यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. त्याच्या पाच दिवसांनंतर त्याच्या पायांच्या तळव्यातील जळजळ कमी होऊ लागली आणि हळूहळू पूर्णपणे आराम मिळाला. कोरोना लस घेतली आणि जणू काही त्यांच्यावर जादूच झाली. दहा वर्षे जे शक्य झालं नाही ते पाच दिवसांत झालं. कोरोना लस घेतल्याच्या पाच दिवसांनंतर त्यांना आपल्या या समस्येपासून आराम मिळाला.
हे वाचा - मृत्यूनंतरही कोविड रुग्णावर केला 3 दिवस उपचार; नांदेडमधील डॉक्टरांचा प्रताप
आपण आपले जुने उपचार पूर्णपणे बंदच ठेवले होते. त्यामुळे कोरोना लशीमुळेच आपला हा आजार गायब झाला असा दावा त्यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Madhya pradesh