मुंबई, 29 जुलै : जगभर थैमान घालणारा मंकीपॉक्स भारतात घुसल्यानंतर दहशत निर्माण झाली आहे. केरळनंतर दिल्लीतही याचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली. उत्तर प्रदेशमध्ये याचे संशयित रुग्ण सापडले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातही आता मंकीपॉक्सने शिरकाव केला की काय अशी भीती वाटू लागली आहे. कारण महाराष्ट्रातही मंकीपॉक्सचे संशयित रुग्ण सापडले.
राज्यात मंकीपॉक्सचे 10 संशयित रुग्ण सापडले. ज्यांच्यात मंकीपॉक्ससारखी लक्षणं दिसून आली आहेत. त्यांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलोलॉजीमध्ये (NIV) पाठवण्यात आले. या नमुन्यांचा रिझल्ट आलेला आहे. 10 पैकी 9 नमुन्यांचा रिझल्ट आला असून याबाबत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार राज्यातील महासाथीच्या संभाव्य आजारांवर देखरेख ठेवणारे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, गेल्या महिन्यात एनआयव्हीला परीक्षणासाठी दहा नमुने पाठवण्यात आले होते. 9 नमुन्यांचा रिझल्ट निगेटिव्ह आहे. एका संशयित रुग्णाचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. याचा अर्थ अद्याप तरी राज्यात मंकीपॉक्स नाही.
देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण चार रुग्ण आहेत. त्यापैकी तीन केरळात आणि एक दिल्लीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारसह राज्य सरकारही अलर्ट झालं आहे.
केरळ, दिल्लीत मंकीपॉक्स
देशातील मंकीपॉक्सचे तीन रुग्ण केरळ तर एक रुग्ण दिल्लीत आहे. केरळच्या कोल्लममध्ये 14 जुलैला मंकीपॉक्सचं पहिलं प्रकरण समोर आलं. हाच भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण. त्याला तीव्र ताप होता आणि त्याच्या शरीरावर चकत्या होत्या. 12 जुलैला तो यूएईहून भारतात आला. यूएईमध्ये एका मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाच्या संपर्कात तो आला होता. त्यानंतर 18 जुलैला कन्नूररमध्ये दुसरा रुग्ण आढळला. 31 वर्षाचा हा रुग्णही दुबईतून आला होता. 13 जुलैला तो दुबईहून परतला आणि त्यानंतर हळूहळू त्याच्यात लक्षणं दिसू लागली. त्याच्यातील लक्षणंही पहिल्या रुग्णासारखीच होती. तर 22 जुलैला आढळलेला मलाप्पुरमधील तिसरा रुग्णही यूएईमधून परतला आहे. 6 जुलैला तो यूएईहून भारतात आला, 13 जुलैला त्याच्यात लक्षणं दिसू लागली.
हे वाचा - Explainer : कोरोना ते मंकीपॉक्स; कोणत्याही आजाराचा भारतातील पहिला रुग्ण केरळातच का आढळतो?
त्यानंतर देशातील चौथा रुग्ण सापडला तो दिल्लीत. या रुग्णाचे वय 34 वर्षे असून त्याने कधीच परदेश प्रवास केलेला नाही. पण हिमाचल प्रदेशमधील मनालीत एका लग्नाच्या आदल्या दिवशी बॅचलर पार्टीला त्याने हजेरी लावली होती. परदेश प्रवास नसलेला देशातील हा पहिला रुग्ण आहे.
मंकीपॉक्सची लक्षणं
शरीरावर पुरळ
खूप ताप
डोकेदुखी
स्नायू दुखणे
अशक्तपणा
लिम्फ नोड्स सुजणे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Maharashtra News, Virus