नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर: गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक तरुणांचा हार्ट ॲटॅकनं (Heart Attack) म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये सामान्य तरुणांचाच नाही तर प्रसिद्ध दिग्गज कलाकारांचा देखील समावेश आहे. हिंदी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांची ताजी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. शरीराबाबत प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची काळजी घेऊनही तरुणांना हार्ट ॲटॅक का येतात, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
तरुणांमध्ये वाढलेल्या हार्ट ॲटॅकच्या समस्येबाबत न्यूज18नं, एंडोक्राइन सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि कर्नाल येथील भारती हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध एंडोक्रायनोलॉजिस्ट (Endocrinologist) डॉ. संजय कालरा (Dr. Sanjay Kalra) यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली.
डॉ. कालरा यांच्या मते, आजकाल बदललेली दिनचर्या आणि लाइफस्टाइलमुळं हृदयविकारांचं प्रमाण वाढलं आहे. सुरुवातीला ही समस्या प्रामुख्यानं पुरुषांमध्ये दिसून येत होती. मात्र, आता महिलांमध्ये देखील हृदयविकारांचं प्रमाण वाढलं आहे. हार्ट ॲटॅक टाळण्यासाठी सामान्य लोक अनेक उपाययोजना करतात. जसं की, चांगला आहार घेणं, व्यायाम करणं आणि योग्य वेळी औषधोपचार घेणं.
मात्र, गेल्या काही दिवसात नियमित व्यायाम करणाऱ्या आणि योग्य आहार घेणाऱ्या पुरुषांना देखील हार्ट ॲटॅक आल्याचं निदर्शनास आलं आहे. यातील बहुतांश लोक त्यांच्या कामात उत्तम आहेत, त्यांच्या क्षेत्रात अग्रस्थानी आहेत आणि त्यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी, ऐषोआराम सर्व काही आहे, परंतु तरीही ते हार्ट ॲटॅकचे बळी ठरत आहेत. यामागे अनेक मोठी कारणं आहेत.
अनेक कारणांमुळं तरुणांना कमी वयातचं हृदयाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. डॉ. संजय कालरा यांच्या मते यामागे पाच प्रमुख कारणं आहेत. आजकालची तरुणाई आपल्या शरीराची खूप काळजी घेते. त्यासाठी पौष्टिक आहारही घेतात पण हे सर्व करत असताना त्यांच्याकडून नकळत काही चुका होतात. त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. जिममध्ये (Gym) जाणाऱ्या किंवा व्यायामाची आवड असणाऱ्या तरुणांमध्ये पहिला दोष दिसून येतो, तो म्हणजे त्यांचं एक्स्ट्रीम डाएट (Extreme diet).
आपण शरीरासाठी, सर्व प्रकारचे मॅक्रो (Macro Nutrients) आणि मायक्रो न्यूट्रियन्ट्स (Micro Nutrients) असलेला संतुलित आहार घेतला पाहिजे. मॅक्रो न्यूट्रियन्टचे तीन प्रकार आहेत: कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटिन्स. आपलं शरीर सुदृढ ठेवण्यात या तिन्हींच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. तर व्हिटॅमिन आणि मिनरल्स मायक्रो न्यूट्रियन्ट्स आहेत. प्रत्येक व्हिटॅमिन आणि मिनरल्सचीही आपलं शरीर घडवण्यात वेगळी भूमिका असते.
पण अनेक वेळा तरुण मुलं-मुली एक्स्ट्रिम डाएट किंवा फॅड डाएट स्वीकारतात. या नादात मॅक्रो किंवा मायक्रो न्यूट्रिएन्ट्स पूर्णपणे नाहीसे होतात. किटो डाएट याचं उत्तम उदाहरण आहे. असे डाएट घेतल्यानं तरुणांना वाटतं की त्यांचं वजन कमी होऊन ते सुंदर होत आहेत, शरीरात पूर्वीपेक्षा चांगले बदल होत आहेत. परंतु प्रत्यक्षात हे एक्स्ट्रिम डाएटचं हृदयासाठी खूप हानिकारक ठरू शकतात.
किटो डाएटचा विचार केला तर, त्यामुळं व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता येण्याची शक्यता असते. म्हणजेच, हृदयाच्या कंडक्शनमध्ये अचानक बदल होतात आणि त्यामुळं हृदय कधीही अचानक थांबते. त्यामुळं कोणतही डाएट सुरू करण्यापूर्वी तज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. शक्यतो तर आहार संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तरुण मुलं आणखी एक मोठी चूक करतात ती म्हणजे प्रोफेशनल गाइडन्सशिवाय व्यायाम करणं. अनेकदा मुलं वॉर्म-अप न करता व्यायाम करतात किंवा लवकर परिणाम मिळवण्याच्या इच्छेने अतिरिक्त व्यायाम करतात. या गोष्टी शरीरासाठी हानीकारक असतात. एखादी व्यक्ती जिनं यापूर्वी कधीही व्यायाम केलेला नाही, अचानक पहिल्या दिवशी 100 बैठका मारते किंवा 10 किमी चालते. यामुळं तिचे स्नायू, सांधे आणि हाडं दुखतात, हृदय आणि रक्तवाहिन्यांवर देखील परिणाम होतो. अशावेळी प्रोफेशनल लोकांची मदत फायद्याची ठरते.
मानसिक तणाव हा घटक हार्ट ॲटॅकचं तिसरे कारण ठरतं. जे व्यायामाला आयुष्याचा एक भाग मानतात आणि व्यायामाचा आनंद घेतात त्यांच्यासाठी व्यायाम हा घटक तणावमुक्तीचा काम करतो. पण, काही लोकांना सर्व गोष्टी एकदम गांभीर्यानं घेण्याची सवय असते. त्यांना प्रत्येक गोष्ट करताना ताण येतो. अशी व्यक्ती जिममध्ये सुद्धा तणावाखालीचं व्यायाम करते. त्यामुळं त्यांच्यामध्ये कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात. या हॉर्मोन्सचा हृदयावर परिणाम होतो.
आपल्या लाइफस्टाईलशी संबधित काही चुका देखील हार्ट ॲटॅकला कारणीभूत ठरतात. काही जास्त ताण घेतात, जास्त व्यायाम करतात मात्र, पुरेशी झोप घेण्याच विसरतात. डॉ. कालरा यांच्या मते, आपल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप अतिशय गरजेची आहे. जर आपण सहा तासांपेक्षा कमी झोप घेतली तर आपलं शरीर स्वत:ला रिकव्हर नाही करू शकत. जेव्हा आपण जागरण करतो तेव्हा आपलं हृदय जास्त वेगात काम करत. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल हृदयसुद्धा आराम करत म्हणजे काही प्रमाणात ते रिलॅक्स होत. जर आपण आपल्या हृदयाला व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ नाही दिला तर त्याच्यावर परिणाम होणं साहजिक आहे. ज्यांच्या झोपेच्या वेळा एकदम अनियमित आहेत त्या लोकांमध्ये देखील हार्ट ॲटॅकचं प्रमाण जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं नियमित पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे.
विविध प्रकारची व्यसनं केल्यानंही हृदयाच्या समस्याही निर्माण होतात. अमली पदार्थांचा हृदयावर जास्त परिणाम होतो. काही लोक प्रॉडक्टिव्हिटीसाठी अमली पदार्थ घेतात. परंतु, ही गोष्ट अतिशय घातक ठरू शकते. तंबाखू, जास्त दारू, सुपारी, अफूयुक्त पदार्थ यांचा हृदयावर वाईट परिणाम होतो. त्यामुळं अमली पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे.
शरीरामध्ये टेस्टेस्टेरॉन आणि कॉर्टिसॉल सारख्या हॉर्मोन्सचं किती प्रमाण आहे हे पाहण्यासाठी खेळाडूंची एक चाचणी केली जाते. जर एखाद्या खेळाडूची कॉर्टिसॉल पातळी जास्त असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो तणावाखाली आहे. असं आढळल्यास त्याचा व्यायाम आणि प्रशिक्षणाची तीव्रता कमी केली जाते. जर एखाद्या अॅथलीटच्या शरीरातील टेस्टेस्टेरॉन आणि कॉर्टिसॉलचं गुणोत्तर चांगलं असेल तर तो चांगली कामगिरी करू शकतो. असा खेळाडू आपल्याला पदक मिळवून देण्यास सक्षम असतो. खेळाडूंप्रमाणं सामान्य लोकांच्या आरोग्यामध्ये देखील कॉर्टिसॉल हॉर्मोन्सला महत्त्व आहे.
हार्ट ॲटॅकसाठी काही बायोलॉजिकल घटक देखील कारणीभूत असतात. कार्डियो मायोपॅथी हा एक हृदयाशी संबंधित विकार आहे. यामध्ये हृदयाचे स्नायू पूर्णपणे मजबूत नसतात. जर कार्डियो मायोपॅथी असलेल्या एखाद्या व्यक्तीनं ज्यास्त व्यायाम केला तर त्याला हार्ट ॲटॅक येण्याचा धोका जास्त असतो.
कोरोनरी आर्टरी एफएच कोलेस्ट्रॉल (Cholesterol) एमिया - ही यकृताशी संबंधित समस्या आहे. ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी खूप जास्त वाढून कोरोनरी आर्टरी (धमन्या) ब्लॉक होऊ लागतात. अशी समस्या असलेल्या लोकांना अतिशय कमी वयात हार्ट ॲटॅक येतो.
या विकारामध्ये एकदम हार्ट ॲटॅक येत नाही मात्र, हार्टचे व्हॉल्व्ह खराब होतात. त्यामुळं पल्मनरी हायपरटेन्शन हा आजार होतो. ज्यामध्ये फुफ्फुसांतील रक्तवाहिन्यांवरील दाब वाढतो. असं झाल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. व्हॉल्व्ह्युलर हार्ट डिसिजचे अनेक प्रकार आहेत. रियुमॅटिक हार्ट डिसिज असाच प्रकारचा विकार आहे. भारतात सध्या याचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालं आहे. कॉन्जेनेटल हार्ट डिसिज हा व्हॉल्व्ह्युलर हार्ट डिसिजचा एक प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीला जन्मजात हा विकार असू शकतो. यामुळं देखील हार्ट ॲटॅक येऊन व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Heart Attack