18 वर्षांची असताना 144 वर्षांची दिसायची 'ही' तरुणी; अखेर दुर्मीळ विकाराने मृत्यू

18 वर्षांची असताना 144 वर्षांची दिसायची 'ही' तरुणी; अखेर दुर्मीळ विकाराने मृत्यू

तिचं वय फक्त 18 वर्षं असलं, तरी हा विकार झाल्यामुळे ती 144 वर्षं वय असलेल्या जख्ख म्हातारीसारखी दिसत होती.

  • Share this:

हचिन्सन-गिल्फोर्ड प्रोजेरिया सिंड्रोम (Hutchinson-Gilford Progeria Syndrome) असं नाव तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला पटकन काही अर्थबोध होणार नाही; पण तुम्हाला असं सांगितलं, की हे एका विकाराचं नाव आहे आणि तो विकार 'पा' (Paa Movie) या बॉलिवूड सिनेमामध्ये (Bollywood Cinema) दर्शविण्यात आलेला आहे, तर त्या विकाराचं स्वरूप तुमच्या लगेच लक्षात येईल. हा विकार झालेल्या ब्रिटनमधल्या (UK) 18 वर्षांच्या एका तरुणीचं 17 जुलै 2021 रोजी निधन झालं. वेस्ट ससेक्समध्ये (West Sussex) राहणाऱ्या या तरुणीचं नाव अशांती स्मिथ (Ashanti Smith) असं होतं. तिचं वय फक्त 18 वर्षं असलं, तरी हा विकार झाल्यामुळे ती 144 वर्षं वय असलेल्या जख्ख म्हातारीसारखी दिसत होती.

अशांती स्मिथला तिचे आई-वडील प्रेमाने फिबी (Fiby) अशा नावाने हाक मारायचे. दुर्मीळ विकाराशी अखेरच्या क्षणापर्यंत झुंज देऊन आपल्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने तिच्याबद्दलच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. या सिंड्रोममुळे फिबीचं वय एका वर्षात जवळपास आठ वर्षांनी वाढायचं. त्यामुळे तिचा चेहरा म्हाताऱ्या स्त्रीसारखा (Old Woman) दिसू लागला होता. तिची आई लुइस स्मिथ (Louis Smith) हिने सांगितलं, की तिचं मन मात्र अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बालकांसारखं निरागस, निर्मळ होतं. आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे लुइस यांना अतीव दुःख झालं आहे; मात्र आता त्यांनी असा विकार असलेल्या अन्य मुलांना मदत करायचं ठरवलं आहे.

हे वाचा -  रेल्वे खात्यात नोकरीची संधी, परीक्षेची अट नाही, मिळणार 2 लाखांपर्यंत पगार

फिबीने अलीकडेच आपला 18वा वाढदिवस साजरा केला होता. तिच्या पश्चात आई-वडील आणि 25 वर्षांची बहीण हे कुटुंबीय आहेत. फिबीची आई लुइस यांनी सांगिलं, की मृत्यूच्या आधीही फिबीने कुटुंबीयांशी गप्पा मारल्या. आता आपल्या जाण्याची वेळ आली असल्याचं तिने सांगितलं. तिने आपलं सगळं आयुष्य एकदम मजेत जगलं (Positive Life) होतं. मरताना ती दुःखी होऊ इच्छित नव्हती.

फिबीला आपल्या विकाराबद्दल बऱ्यापैकी माहिती होती. त्यामुळेच आपण जास्त काळ जगू शकणार नाही, याचीही तिला कल्पना होती. त्यामुळेच कितीही त्रास असला, तरी ती कायम आनंदी राहायची, तसं राहायचा प्रयत्न करायची. कायमच लोकांना हसवणं आणि आपल्या सकारात्मक गोष्टींनी लोकांचं मन जिंकून घेणं ही फिबीची खासियत होती, असं लुइस यांनी सांगितलं.

आपण खूप सुंदर आहोत, असं ती सांगायची. जी कोणी व्यक्ती तिच्या संपर्कात यायची, ती व्यक्ती तिची जणू फॅनच होऊन जायची. सगळ्यांना आनंद देणारी फिबी आज या जगात नाही; मात्र तिच्या आठवणी कायम राहतील, असं सांगताना तिची आई लुइस यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात.

First published: July 24, 2021, 8:10 PM IST

ताज्या बातम्या